उन्नती सोशल फाउंडेशनच्या "स्वर निनाद" मैफिलीने जिंकली रसिकांची मने
Xtreme Today
21-09-2026 20:34:04
765405
उन्नती सोशल फाउंडेशनच्या "स्वर निनाद" मैफिलीने जिंकली रसिकांची मने

पुणे (प्रतिनिधी ) - राजकीय, सामाजिक बांधिलकी सोबतच प्रभागातील सांस्कृतिक चळवळीला बळकटी देण्यासाठी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित " स्वर निनाद " या मैफिलीला परिसरातील रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रविवार दि. २० रोजी सायंकाळी उन्नतीच्या प्रांगणात झालेल्या या रंगारंग मैफिलीत गीतकार, संगीतकार आणि गायिका म्हणून परिचित असलेल्या भारती न्यायाधीश आणि त्यांच्या शिष्य कलावंतांनी शास्त्रीय, सुगम आणि चित्रपट गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
विशेष म्हणजे या मैफलीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका विधी समिती सदस्या तथा प्रभागातील नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांनी या मैफिलीत " ओंकार प्रधान रुप गणेशाचे " ही संत तुकाराम महाराज यांची रचना सादर करुन आपल्या राजकीय व्यक्तीमत्वात दडलेल्या कलाकाराची ओळख अधोरेखित केली. सदरील मैफिलीचा प्रारंभ " आले रे गणपती आज दारी रे " या गणेशस्तवनाने करण्यात आला. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील यमन, भूप, बिहाग, काफि, भीमपलास या रागातील बंदीशी सादर करण्यात आल्या.
अभिजात संगीताच्या या सुरेल स्वराविष्कानंतर काही सुगम आणि चित्रपट गीतांव्दारे उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप भारती न्यायाधीश यांनी गायलेल्या " वंदे मातरम् " ने करण्यात आला. रसिकांच्या प्रतिसादात रंगलेल्या या मैफलीत इरा, शौर्यवी, राघवी, ध्वनी, अथर्व, आस्मी, ओजस्वी, पयोधी, सौम्या , गार्गी, श्रीयान हे बालकलावंत आणि सुलभा माने, प्रभा बसवंते, रेखा देवपूरकर, सुचिता सिदनाळे, सुनीता सावळे या ज्येष्ठ महिला शिष्य कलावंतांनी वैविध्यपूर्ण गाणी सादर केली. सर्व कलावंतांना तबल्यावर चैतन्य डांगे तर संवादीनीवर भारती न्यायाधीश यांनी समर्पक साथसंगत केली.मैफिलीच्या निवेदनाची बाजू भामिनी महाले यांनी समर्थपणे सांभाळली. उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे तसेच पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे, उद्योजक धनंजय भिसे यांच्याहस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.