Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

भारतीयांची चांदी, रोजगाराची महासंधी; 2026 मध्ये तब्बल 72,000 कामगारांना रशियात मिळणार नोकरी

xtreme2day   23-12-2025 21:48:17   153480883

भारतीयांची चांदी, रोजगाराची महासंधी; 2026 मध्ये तब्बल 72,000 कामगारांना  रशियात मिळणार नोकरी

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - रशियाने तब्बल 72,000 भारतीय कामगारांना आपल्या देशात बोलावण्याची योजना आखली आहे. यामुळे भारतीय तरुणांसाठी रशियात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नुकत्याच झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान या विषयावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.

 

 

 रशियातील 'मोस्कोव्स्की कोम्सोमोलेट्स' या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रशियाने या वर्षासाठी परदेशी कामगारांचा कोटा 2,35,000 निश्चित केला आहे. या कोट्यातून भारताला अधिकृतपणे 71,817 कामगारांना रशियात काम करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, दिल्ली आणि मुंबईतील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संख्या संपूर्ण भारतातून येणाऱ्या अर्जांच्या तुलनेत खूपच कमी आहे. काही ठिकाणी तर रशियाकडून 10 लाख भारतीयांना व्हिसा देण्याचा दावा केला जात आहे, परंतु रशियाच्या मंत्रालयाने हा दावा अवास्तव असल्याचे सांगून फेटाळून लावला आहे.

 

 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विशेष प्रतिनिधी बोरिस टिटोव यांनी सांगितले आहे की, कमीतकमी 42,000 भारतीय रशियाची राजधानी मॉस्को आणि इतर मोठ्या शहरांमध्ये येतील. टिटोव यांनी हेही स्पष्ट केले की, नेमकी किती लोक येतील हे अजून निश्चित नाही, पण हा आकडा 40,000 पेक्षा कमी नसेल अशी अपेक्षा आहे. पुतिन यांच्या विशेष प्रतिनिधींनी जारी केलेल्या परवानग्यांची आकडेवारीही दिली आहे. त्यांनी सांगितले की, 2022 मध्ये 8,000 भारतीयांना परवानग्या मिळाल्या होत्या. 2023 मध्ये हा आकडा 14,000 झाला आणि 2024 मध्ये तो वाढून 36,000 झाला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, गेल्या तीन वर्षांत रशियात येणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या वेगाने वाढली आहे. 

 

 

बोरिस टिटोव यांनी भारतीयांची रशियात काम करण्याचा वाढता कल अधोरेखित केला आहे. त्यांनी सांगितले की, भारत रशियातील कामगारांची कमतरता भरून काढण्यास मदत करेल. ते म्हणाले की, भारतीय लोक खूप हुशार आहेत. दुबईसारखे शहर मुख्यत्वे भारतीय कामगार आणि विकासकांनीच उभारले आहे, असे उदाहरण त्यांनी दिले. मात्र, काही अहवाल अशा चिंता वाढवत आहेत की, रशियन अधिकारी भारतसोबतच्या कामगार कराराचा वापर करून भारतीयांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात पाठवत आहेत. अशा प्रकारचे आरोप अलीकडेच अनेक भारतीयांनी रशियावर केले आहेत. तसेच, काही ठिकाणी रशियात काम करण्यासाठी गेलेल्या भारतीयांना जबरदस्तीने सैन्यात भरती केले जात असल्याच्याही बातम्या येत आहेत, ज्यामुळे चिंता वाढली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती