Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्रिकेट

दुलीप ट्रॉफी २०२६साठी ईशान किशन खांद्यावर कर्णधारपद, वैभव सूर्यवंशी उपकर्णधार; शमीचीही एन्ट्री, टीम जाहीर

Xtreme Today   29-07-2026 22:09:30   16735333

 

दुलीप ट्रॉफी २०२६साठी ईशान किशन खांद्यावर कर्णधारपद, वैभव सूर्यवंशी उपकर्णधार; शमीचीही एन्ट्री, टीम जाहीर

 

मुंबई (क्रीडा प्रतिनिधी) - देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी २०२६साठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची धुरा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, संघ निवडीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवला ईस्ट झोनचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. त्यामुळे मैदानावर फलंदाजीसोबतच नेतृत्वाची जबाबदारी पार पाडण्याची मोठी संधी त्याला मिळणार आहे. दरम्यान, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

 

ईस्ट झोन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ईशान किशनकडे देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा त्याला चांगला अनुभव आहे. मागील वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली झारखंडने पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाचा ६९ धावांनी पराभव केला होता. याशिवाय आयपीएल २०२६च्या सुरुवातीच्या सात सामन्यांमध्येही ईशानने सनरायझर्स हैदराबादचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे आता दुलीप ट्रॉफीत ईस्ट झोनला विजेतेपद मिळवून देण्याचं आव्हान त्याच्यासमोर असेल. 

 

वैभव सूर्यवंशीने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. आता त्याच्या कारकीर्दीत आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला आहे. ईस्ट झोन संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी वैभवकडे सोपवण्यात आली आहे. अवघ्या १५व्या वर्षी एवढ्या मोठ्या स्पर्धेत नेतृत्वाच्या भूमिकेत उतरण्याची संधी त्याला मिळणार आहे. त्यामुळे वैभवसाठी ही स्पर्धा केवळ फलंदाजीच्या दृष्टीनेच नव्हे, तर नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. तसेच वेगवान गोलंदाजी विभागात अनुभवी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबत मुकेश कुमारलाही संघात स्थान मिळालं आहे. शमी आणि मुकेश या दोघांकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असल्याने ईस्ट झोनची वेगवान गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. शमीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरू शकते. भारतीय संघातून तो सध्या बाहेर असला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून पुन्हा निवड समितीचं लक्ष वेधण्याची संधी त्याच्याकडे असेल.

 

गोलंदाजी आणि फलंदाजीसोबतच ईस्ट झोनच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश आहे. शाहबाज अहमद आणि अनुकूल रॉय हे संघाला संतुलन देऊ शकतात. त्यांच्यासोबत अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार घरामी, कुमार कुशाग्र आणि विराट सिंह यांसारख्या खेळाडूंवरही फलंदाजीची जबाबदारी असेल. 

 

संघ असा असेल : ईशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार घरामी, शाहबाज अहमद, सूरज सिंधू जायस्वाल, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, कुमार कुशाग्र, शिखर मोहन, अनुकूल रॉय, विराट सिंह, शुभ्रांशू सेनापती, डेनिश दास आणि अभिजीत सरकार.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती