मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी
xtreme2day
06-04-2026 21:10:19
96384352
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी
पुणे, दि. ६ एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील क्रीडा विकासाला गती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत असून, त्यासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी दि. १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या योजनेद्वारे क्रीडा प्रशिक्षण व्यवस्था बळकट करणे, पायाभूत सुविधा विकसित करणे, स्पर्धांचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार तसेच करिअर मार्गदर्शन यांसारख्या विविध घटकांचा समावेश करून सर्वांगीण क्रीडा विकास साधण्याचा उद्देश आहे. तसेच खेळाडूंच्या क्षमता वृद्धीसाठी देशी-विदेशी संस्थांचा सहयोगही घेतला जाणार आहे.
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स, हॉकी, शुटींग व रोईंग या चार क्रीडा प्रकारांसाठी पुणे जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, २५ वर्षांखालील (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत) महाराष्ट्रातील खेळाडूंना अर्ज करता येणार आहे.
राज्यस्तरावर पदकप्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर (SGFI, AITA, Khelo India National) सहभाग असलेल्या खेळाडूंच्या मागील दोन वर्षांतील कामगिरीच्या आधारे निवड करण्यात येईल.
ॲथलेटिक्स, हॉकी व शुटींग या खेळांसाठी निवड चाचणी दि. १५ व १६ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी (वेटलिफ्टिंग हॉल), पुणे येथे होणार आहे. तर रोईंग या क्रीडा प्रकारासाठी चाचणी आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई., दापोडी येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
इच्छुक खेळाडूंनी [email protected] या ई-मेलवर अर्ज सादर करावा. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड चाचणीच्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रे, त्यांची सत्यप्रती व तीन ओळखपत्र आकाराचे फोटो सोबत आणावेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. १३ एप्रिल २०२६ असून, अधिक माहितीसाठी श्री. सुरेश काकड (८८८८८०६१५८), श्रीमती मनीषा माळी (७३९१९६८१९२) व श्रीमती अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.