xtreme2day 03-02-2025 20:19:08 22987105
बीसीसीआयच्या सचिन तेंडुलकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार ! मुंबई (क्रीडा प्रतिनिधी) - भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांना बीसीसीआयकडून खास पुरस्कार दिला जाणार आहे. शनिवारी बीसीसीआयच्या वार्षिक समारंभात सचिन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. २०१४ साली सचिन यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते या पुरस्काराचे मानकरी ठरणारे तेंडुलकर हे ३१ वे क्रिकेटपटू असणार आहेत. बीसीसीआयने भारताचे पहिले कर्णधार सीके नायडू यांच्या सन्मानार्थ १९९४ साली हा पुरस्कार सुरू केला होता. जगातील सर्वाधिक शतके आणि धावा असे असंख्य विक्रम सचिन यांच्या नावावर आहेत. २०२३ साली रवी शास्त्री, फारुख इंजिनीअर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १९८९ साली सचिन तेंडुलकर यांनी भारताकडून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १ टी २० सामनाही खेळला आहे. एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा तर कसोटी सामन्यात १५९२१ धावा त्यांच्या नावावर आहे. शतकांच शतक पूर्ण करणारे ते पहिले फलंदाज आहेत. त्यांनी कसोटीत ५१ तर एकदिवसीय सामन्यात ४९ शतके झळकावली आहेत. गोलंदाज म्हणूनही त्यांनी २१० विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारे ते जगातील पहिले फलंदाज आहेत. सचिन यांनी वयाच्या १६ व्या वर्षी १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताकडून पहिला सामना खेळला होता. त्यांनी ६ विश्वचषकात सहभाग घेतला. भारतासाठी विश्वचषक जिंकणे हे त्यांचे स्वप्न होते. २०११ साली त्यांचे हे स्वप्न साकार झाले. ज्यावेळी सचिन भारतीय संघातून क्रिकेट खेळत त्यावेळी त्याचा खेळ पाहण्यासाठी अख्खा भारत टीव्ही समोर बसत असे. त्यांची विकेट गेल्यानंतर टीव्ही बंद केली जात होती. इतकी प्रचंड लोकप्रियता त्यांना लाभली होती. काही काळासाठी त्यांनी भारतीय संघाचे कर्णधारपदही सांभाळले होते. शारजाहमध्ये एकदिवसीय सामन्यात सचिनने झळकवलेली शतके, २००३ विश्वचषकातील फलंदाजी, कसोटीत ऑस्ट्रेलियातील द्विशतक असे असंख्य सुवर्णक्षण सचिनने चाहत्यांचा मनावर कोरले आहेत.