xtreme2day 31-07-2024 19:41:56 8970654
महाराष्ट्राच्या कोल्हापूरचा पठ्ठ्या ; ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये भारताला तिसरं पदक मिळणार ! नवी दिल्ली (क्रीडा प्रतिनिधी) - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन कांस्यपदकं पटकावली आहेत. नेमबाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही दोन्ही पदकं भारताच्या झोळीत पडली आहे. सर्वप्रथम मनू भाकेर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. त्यापाठोपाठ मनू भाकेर व सरबजोत सिंह या नेमबाजांच्या जोडीने भारताला १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकवून दिलं. आता आणखी एका नेमबाजाने भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळाडू ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे हा ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. ऑलिम्पिकमधील थ्री पोजिशनिंग ५० मीटर रायफल स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत तो ५९० गुणांसह सातवा आला आहे. आता स्वप्निलला स्पर्धेच्या अंमित फेरीत त्याचं नेमबाजी कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून या फेरीत त्याने त्याची सर्वोत्तम कामगिरी दाखवली तर भारताच्या खात्यात तिसरं पदक जमा होऊ शकतं. कोल्हापूर व महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्वप्निलकडून मोठ्या अपेक्षा आहेत. स्वप्नील उद्या (गुरुवार, १ ऑगस्ट) अंतिम फेरीत खेळणार आहे. दुपारी १ वाजता अंतिम फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेत नेमबाजाला तीन पोजिशन्समध्ये नेम साधावा लागतो. यामध्ये नीलिंग म्हणजेच गुडघ्यावर बसून नेम साधणे, पोटावर झोपून निशाणा साधणे आणि उभा राहून निशाणा साधायचा असतो. याच स्पर्धेत भारताचा आणखी एक खेळाडू प्राथमिक फेरीत उतरला होता. परंतु, अवघ्या एका गुणाने त्याने अंतिम फेरीची संधी गमावली आहे. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर असं त्याचं नाव असून तो ५८९ गुणांसह ११ व्या स्थानावर राहिला. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर हा पहिल्या दोन फेऱ्यांनंतर आठव्या क्रमांकावर होता. मात्र स्टँडिंग शूट संपल्यानंतर तो आठव्या क्रमांकावरून ११ व्या क्रमांकावर घसरला होता. उभा राहून निशाणा साधण्याच्या फेरीत तो थोडा मागे पडला. या फेरीतील पहिल्या आठ नेमबाजांना अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. ऐश्वर्यने ही संधी थोडक्यात गमावली.