xtreme2day 04-07-2024 22:03:02 3436923
बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू आणि भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक स्वप्नील धावडे यांचा ताम्हिणी घाटातील धबधब्यात मृत्यू पुणे (प्रतिनिधी) - ताम्हिणी घाटात एक तरुण धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्नील धावडे नावाचा हा तरुण मुलांना ट्रेकिंगसाठी ताम्हिणी घाटात घेऊन गेला होता. तिथे ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. हे सारं त्याच्यासोबत गेलेल्या मुलांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं. त्यांचा वाहून जातानाचा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी भारतीय सैन्य दलातही सैनिक म्हणून कार्य केले होते. ताम्हिणी घाटातून सर्वजण निघण्याच्या तयारीत असताना स्वप्नील यांना पाण्यात उडी घेण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी निघण्यापूर्वी एकदा पाण्यात उडी घेण्याचं ठरवलं. ते धबधब्याच्या बाजुला उभे झाले आणि त्यांनी पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत सारं ठीक सुरु होतं. पण, पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. स्वप्नील यांनी बाजुला असलेल्या दगडांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला पाण्याचा प्रवाह इतका होता की ते त्या सोबत वाहून जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा दगडाला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र त्यांची पकड बसली, पण ते वर येतील त्यापूर्वीच खळखळत्या पाण्याने त्यांना वाहून नेलं. पिंपरी चिंचवड परिसरातील स्वप्नील धावडे हे एक वर्षापूर्वीच आर्मीमधून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते भोसरी परिसरामध्ये स्विमिंग आणि व्यायामाचे ट्रेनिंग देण्याचे काम करत होते. शनिवारच्या सुमारास ताम्हिणी घाटामध्ये असणाऱ्या प्लस व्हॅली परिसरामध्ये ते ३२ जणांचा ग्रुप घेऊन ट्रेकिंगसाठी गेले होते. दिवसभर ट्रेकिंग केल्यानंतर निघण्याच्या वेळी त्यांनी या पाण्यात उडी घेतली. या व्हिडिओमध्ये स्वप्नील धावडे हे वाहून जातानाचा क्षण कैद झाला.