Xtreme Today 28-10-2026 18:53:40 58063548
IAS-IPS जोडप्याची माया; 30 महिन्यांत 40 व्हिला, कॉटेज खरेदी; मालमत्ता पुन्हा त्याच कंपनीला लीजवर जयपूर (क्राइम रिपोर्टर) - राजस्थान केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांची आयपीएस पत्नी प्रशाखा माथूर वादात सापडले आहेत. या जोडप्यासह त्यांची दोन्ही मुलं, सासू-सासऱ्यांनी अडीच वर्षात एकाच कंपनीकडून ४० व्हिला-कॉटेज खरेदी केले आहेत. उदयपूर आणि अलवरसारख्या ठिकाणी अग्रवाल यांच्या कुटुंबानं कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली आहे. गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून शिखर अग्रवाल आणि त्यांची आयपीएस पत्नी प्रशाखा माथूर यांच्या कुटुंबानं एकाचवेळी रिसॉर्ट आणि व्हिला खरेदी केल्याचं वृत्त दैनिक भास्करनं दिलं आहे. सगळ्यांची नोंदणी कुटुंबाच्या वेगवेगळ्या सदस्यांच्या नावे करण्यात आली आहे. या सगळ्याची माहिती आपण IPF आणि रिटर्नमध्ये दिल्याचं आयएएस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. ४० व्हिला आणि कॉटेज खरेदीसाठी अग्रवाल यांच्या कुटुंबानं एकूण ६ कोटी १६ लाख रुपये खर्च केले. यातील २० कॉटेज उदयपूरच्या बुझाडा येथील अनंता रिसॉर्टमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये खरेदी करण्यात आली. तर अलवरच्या अजबगढ येथील अनंता रिसॉर्टमधील २० व्हिलांची नोंदणी मार्च २०२६ मध्ये करण्यात आली. गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे उदयपूरच्या देभरमध्येही अनंता नावानं हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून खरेदी केलेल्या मालमत्ता अग्रवाल यांनी पुन्हा त्यांनाच भाडेतत्त्वावर दिल्या. बुझाडातील २० कॉटेज वर्षाला ४ लाख रुपये प्रति कॉटेज दरानं, तर अजबगढ येथील २० व्हिला वार्षिक ५ लाख रुपये प्रति व्हिला दरानं भाड्यानं देण्यात आले. त्यामुळे या मालमत्तांमधून भाड्यापोटी वर्षाला १.८० कोटी रुपयांचा दर निश्चित झाला. उदयपूरच्या बुझाडा येथील अनंता रिसॉर्टमध्ये शिखर अग्रवाल आणि प्रशाखा माथूर यांनी १०-१० कॉटेज खरेदी केली आहेत. प्रत्येक कॉटेजची किंमत १५ लाख रुपये आहे. तर अलवर येथील अनंता रिसॉर्टमध्ये शिखर आणि प्रशाखा यांच्या नावावर ८-८ व्हिला आहेत. त्यांची नोंदणी १६.५ लाख रुपये प्रति व्हिला दरानं झालेली आहे. अजबगढमध्ये कुटुंबाच्या दोन्ही मुलांनीही व्हिला खरेदी केले आहेत. मुलगा शिवप्रियानं १४ लाख प्रति व्हिला दरानं ३ व्हिला खरेदी केले आहेत. तर दुसरा मुलगा प्रशिखनं एक व्हिला १६.५ लाख रुपये आणि ४ व्हिला १५.१५ लाख रुपयांत खरेदी केले आहेत. याशिवाय प्रशाखा माथूर यांचे आई-वडील मंजुळा आणि रघुवंश माथूर यांनी संयुक्तपणे ४ व्हिला खरेदी केले आहेत. त्यांची किंमत १६.५ लाख रुपये प्रति व्हिला इतकी आहे.