Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

जमिनीच्या वादातून आजोबांनीच केली नातवाची गोळ्या झाडून हत्या; अभय मराठे मृत्यू प्रकरणाला हत्येचं नवीन वळण, 83 वर्षीय आजोबांसह 5 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल

Xtreme Today   06-10-2026 18:59:22   94318354

जमिनीच्या वादातून आजोबांनीच केली नातवाची गोळ्या झाडून हत्या; अभय मराठे मृत्यू प्रकरणाला हत्येचं नवीन वळण, 83 वर्षीय आजोबांसह 5 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल 

 

पुणे (क्राइम प्रतिनिधी) - जमिनीच्या वादातून आजोबांनीच नातवाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यामुळे अभय मराठे मृत्यू प्रकरणाला हत्येचं नवीन वळण मिळालं आहे. 83 वर्षीय आजोबांसह 5 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचं नाव अभय माणिक मराठे, (वय 32) असं आहे. ही घटना काल सोमवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास, भुशी गावाच्या हद्दीतील मोतीराम हॉटेलमध्ये घडल्याचं पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलं होतं. 

 

सुरुवातीला हा प्रकार अपघाती गोळीबार असल्याचं समोर आलं होतं. मात्र, पोलिसांच्या तपासात जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं समोर आलं असून, अभय यांची हत्या करण्यात आल्याची माहिती एसपी संदीप सिंह गिल यांनी दिली आहे. या प्रकरणी 83 वर्षीय मोतीराम राजीव मराठे यांच्यासह हिरामण मोतीराम मराठे, मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळ्यातील भुशी गावात अभय मराठे यांचे सुरुवातीला अपघात वाटलेलं हे प्रकरण आता हत्येमध्ये बदललं गेलं आहे. रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने अभयचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या तपासातून आजोबांनीच नातवाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.

 

अभय मराठे यांना तीन भाऊ आहेत. मात्र, त्यांचे आणि आजोबांशी वेगवेगळ्या कारणांमुळे आधीपासूनच पटत नव्हतं. मोतीराम मराठे आणि त्यांचे नातू अभय मराठे यांच्यात जमिनीवरुन वाद सुरू होता. काल सोमवारी रोजी त्यांच्यात एक व्यवहारातून वाद झाले. अभय मराठे हा आजोबांच्या अंगावर धावून गेला होता. यातूनच आजोबा यांनी आपल्या परवानाधारक रायफलमधून थेट नातवाच्या छातीत गोळी घातली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या गुन्ह्यानंतर मोतीराम मराठे यांना वाचवण्यासाठी घरच्यांनी देखील प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हॉटेल मोतीराममधील कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर अभय मराठे यांचा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर काढून लपवल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पोलिसांचा आरोप आहे. प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा पोलिसांकडून सुरू आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती