'एपीके फाइल'ने 43 कोटींची लूट; 3 हजारांपेक्षा अधिक गुन्हे असणारी टोळी पकडली, मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई
xtreme2day
26-06-2026 19:42:37
34426935
'एपीके फाइल'ने 43 कोटींची लूट; 3 हजारांपेक्षा अधिक गुन्हे असणारी टोळी पकडली, मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई (क्राईम रिपोर्टर) - विविध बँका, महानगर गॅस; तसेच इतर आर्थिक संस्थांच्या नावाने एपीके फाइल पाठवून त्याआधारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक झाली. हे सहा जण नवी दिल्ली, झारखंड, बिहार येथील असून, देशभरातील ३,२०६ गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आढळला आहे. प्राथमिक तपासात या टोळीने आतापर्यंत ४३ कोटी रुपये कमाई केल्याचे उघड झाले आहे. या टोळीत आणखी आरोपींचा समावेश असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी सांगितले.
मोबाइल क्रमांक, बँक खाती; तसेच इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले असता सहा आरोपींचा सहभाग आढळला. त्यानुसार आरिफ अस्तुन अन्सारी, शेख बेलाल नौशाद, मेहबूब नौशाद आलम, साजिद मन्सूर अली, मोहन कुशल महतो, सुनील कुमार दशरथ सोरेन यांना अटक केली. सायबर पोर्टल वरील तपासात देशभरातील ३,२०६ गुन्ह्यांत या आरोपींचा समावेश असून, महाराष्ट्रात ५१७ आणि मुंबईत या आरोपींविरुद्ध ९३ तक्रारी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
महानगर गॅसच्या नावाने गॅस कनेक्शन बंद करण्याचा संदेश एका व्यक्तीला पाठवला. गॅस बिल अपडेट करण्यासाठी एपीके फाइल डाउनलोड करून या व्यक्तीला १० रुपये पाठविण्यास सांगितले. फाइल डाउनलोड करताच त्याचा मोबाइल हॅक झाला आणि बँक खात्यातून दोन लाख ३५ हजार रुपये काढण्यात आले. याबाबत पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी या टोळीकडून ११ मोबाइल आणि एक लॅपटॉप जप्त केल्या आहेत. यात आरटीओ, महानगर गनच्या नावाने १११ बनावट एपीके फाइल सापडल्या आहेत. त्यांनी पाठविलेल्या एपीके फाइल ८,६०९ जणांनी डाउनलोड केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून दिसून येत आहे. एपीके फाइलद्वारे मोबाइल हॅक केल्यानंतर खात्यातून पैसे काढताना ओटीपी; तसेच इतर संदेश येतात. गुगल फायरबेस आणि होस्टिंगर सर्व्हरमधून सव्वाकोटी एसएमएस या गुन्हेगारांना पाठवल्याचे डेटावरून दिसले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.