Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

दुबई आणि थायलंडमधून सायबर फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या सौरभ उर्फ गणेश काळे या मुख्य सूत्रधाराला अटक; पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी कारवाई

xtreme2day   13-06-2026 21:54:22   16780415

दुबई आणि थायलंडमधून सायबर फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या सौरभ उर्फ गणेश काळे या मुख्य सूत्रधाराला अटक; पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी कारवाई

 

पिंपरी- चिंचवड (क्राईम रिपोर्टर) - दुबई आणि थायलंडमधून सायबर फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक केली आहे. सौरभ उर्फ गणेश काळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी कारवाई करत इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्कुलरच्या मदतीने त्याला थायलंडमधील बँकॉक विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं.

 

 

देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ऑनलाइन टास्क फ्रॉड प्रकरणाच्या तपासादरम्यान या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. जून 2024 मध्ये या प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार गणेश काळे हा दुबईतून नेटवर्क चालवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भारतातील नागरिकांना मोठ्या कमाईचं आमिष दाखवून त्यांची बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक तसेच इंटरनेट बँकिंगची माहिती मिळवत होता. या खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीतील कोट्यवधी रुपयांची रक्कम विविध ठिकाणी वळवली जात होती.

 

सायबर पोलिसांच्या तपासात गणेश काळे याने दुबईमध्ये स्वतःचं कार्यालय उभारल्याचंही उघड झालं आहे. त्याचे चीनसह इतर विदेशी नागरिकांशी थेट संबंध असल्याचं तांत्रिक तपासातून समोर आलं आहे. टास्क फ्रॉड, बनावट शेअर मार्केट गुंतवणूक योजना आणि डिजिटल अरेस्टसारख्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांद्वारे त्याने नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हिंजवडीतील 18 लाख रुपयांच्या आणि सायबर पोलीस ठाण्यात दाखल 2 कोटी 66 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. सप्टेंबर 2025 मध्ये तो दुबईहून बँकॉकला पळून गेला होता. मात्र, पोलिसांच्या अचूक नियोजनामुळे त्याला बँकॉकमध्ये पकडण्यात यश आलं. 

 

 मुंबई विमानतळावर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या सायबर पोलिसांच्या पथकानं त्याला 11 जून रोजी ताब्यात घेतलं असून, त्याच्या चौकशीतून महाराष्ट्रासह देशातील अनेक मोठ्या सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत. ही कारवाई गुन्हे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती