xtreme2day 24-12-2025 20:05:03 4042529
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाला 9 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश सातारा (क्राईम रिपोर्टर) - डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाला 9 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सातारा येथील 27 वर्षीय संग्राम बळीराम बाबर याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बाबर हा ज्या कंपनीचा संचालक म्हणून दाखवला गेला होता, त्याच खात्याचा वापर करून यापूर्वीही ज्येष्ठ नागरिकांची 5.65 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत पीडित शिक्षकाला त्यांच्या घरातच 'डिजिटल अरेस्ट' करून ठेवण्यात आले होते. आरोपींनी आपण नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक शर्मा बोलत असल्याचे भासवले. तुमच्या नावे असलेल्या बँक खात्यातून प्रतिबंधित 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) ला मनी लाँडरिंगद्वारे पैसे पाठवले जात आहेत, अशी भीती त्यांना घालण्यात आली. तुमच्या नावे असलेल्या बँक खात्यातून प्रतिबंधित 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) ला मनी लाँडरिंगद्वारे पैसे पाठवले जात आहेत, अशी भीती त्यांना घालण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. इतकेच नव्हे तर, व्हिडिओ कॉलवर गणवेशातील तोतया पोलीस अधिकारी आणि बनावट 'आरबीआय' वॉरंट दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. तपासासाठी तुमचे सर्व पैसे सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात वर्ग करावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून 9 कोटी रुपये उकळण्यात आले. जेव्हा त्यांनी बँकेत जाऊन ही मोठी रक्कम ट्रान्सफर केली. तेव्हा बँकेच्या सतर्क कर्मचाऱ्याने त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मी गौतम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.