xtreme2day 04-01-2025 20:27:12 9508972
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड सुदर्शन घुलेला आज पहाटे अटक पुणे (क्राईम रिपोर्टर) - बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड सुदर्शन घुलेला अखेर आज पहाटे पुण्यात अटक झाली आहे. हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे अशी दोघांची नावं आहेत. अद्यापही या प्रकरणातील कृष्णा आंधळे सापडलेला नाही. सीआयडीच्या तपासात डॉ. संभाजी वायभसे यांचं नाव समोर आलेलं आहे. वायभसे आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी काल नांदेडमधून ताब्यात घेतलं. गेल्या पाच दिवसांपासून पोलीस वायभसेंचा शोध घेत होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल २६ दिवसांनी तो तपास यंत्रणांच्या हाती लागला. सीआयडी, एसआयटी, स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर एका डॉक्टरच्या टिपमुळे घुले पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यासोबतच सुधीर सांगळेलाही अटक झाली. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे असं त्याचं नाव आहे. देशमुख हत्या प्रकरणानंतर पंचक्रोशीतला एक डॉक्टर त्याच्या पत्नीसह नॉट रिचेबल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संभाजी वायभसे असं या डॉक्टरचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या एका नातेवाईकाचं निधन झालं. पण संभाजी वायभसे त्या नातेवाईकाच्या अंत्यविधीलाही अनुपस्थित होता. त्यामुळे तपास यंत्रणांचा संशय बळावला. गेल्या ५ दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. डॉ. वायभसे त्याच्या पत्नीसह केरळला गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सीआयडीचं एक पथक तिकडे गेलं. अखेर काल संध्याकाळी वायभसेला नांदेडमधून अटक करण्यात आली. त्याला चौकशीसाठी बीडला आणण्यात आलं. सुदर्शन घुलेचे वायभसेशी जवळचे असल्याची माहिती तपासातून समोर आल्यानं वायभसेची कसून चौकशी करण्यात आली. एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली या चौकशीवेळी उपस्थित होती. देशमुखांच्या हत्येनंतर फरार झालेल्या आरोपींनी वायभसेशी संपर्क केलेला होता. त्यानं आरोपींना पैशांची मदत केली असल्याचा संशय पोलिसांना होता. चौकशीत वायभसेनं पोलिसांना महत्त्वाची टिप दिली. त्यानंतर तपास यंत्रणांनी पुण्यातील बालेवाडी गाठली. तिथल्या एका घरावर छापा टाकण्यात आला. घुले आणि सांगळे तिकडेच लपून बसले होते. सुदर्शन घुलेच्या नावावर गेल्या १० वर्षांत १० गुन्ह्यांची नोंद आहे. यातील ८ गुन्हे केज तालुक्यात, १ धारुर आणि १ अंबाजोगाईमधील आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणातून सरपंच देशमुख यांची हत्या झाली. याच प्रकरणात प्रकल्प असलेल्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली होती. खंडणी, मारहाण आणि खून अशा तिन्हीही एफआयआरमध्ये घुलेचं नाव आहे.
9za1eh
vpyth9
ur7ddu
4ov4l8
nejgr7