हृदयविकारांविरुद्ध एकजुटीचा हुंकार; पुण्यात २९ नोव्हेंबरला ‘हृदयम्’ राष्ट्रीय परिषद
Xtreme Today
12-10-2026 19:14:03
116827603
हृदयविकारांविरुद्ध एकजुटीचा हुंकार; पुण्यात २९ नोव्हेंबरला ‘हृदयम्’ राष्ट्रीय परिषद
पुणे (प्रतिनिधी) - तरुणांमधील हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी पुण्यात 'हृदयम्' या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात होणार आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ८२७५३८७८९७, ९४२२११५८४४, ९५५२५०९०५२ आणि ९४०४३३६१३१ या क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आरोग्य भारती (पश्चिम महाराष्ट्र प्रांत), भागीरथी मेडिकल फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत असून, २८ नोव्हेंबर रोजी तिचे ऑनलाइन सत्र पार पडेल. ‘एक हृदय, अनेक शाखा, एकच ध्येय’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फार्मसी, योग, सार्वजनिक आरोग्य आणि आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रांतील तज्ज्ञ एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. उपचारांमधील समन्वय वाढवून रुग्णकेंद्रित आणि पुराव्यांवर आधारित आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. परिषदेच्या उद्घाटनाला राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाच्या (NCISM) अध्यक्षा डॉ. मनीषा कोठेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते, ‘मारबिसम’चे (MARBISM) अध्यक्ष डॉ. मुकुल पटेल आणि आरोग्य भारतीचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील जोशी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या शास्त्रीय सत्रांमध्ये डॉ. सुहास हरदास (पुणे), डॉ. राजशेखर व्ही. सनापेती (बेळगाव), डॉ. बिपिन एस. जैन (पालघर), डॉ. सविता रवींद्र (बेंगळुरू) आणि डॉ. गांधार मांडलिक (नाशिक) हे तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन निबंध, ई-पोस्टर, वैज्ञानिक मॉडेल आणि रील्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान अर्ज करता येतील. तसेच ‘कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ अँड इनोव्हेशन’ या संकल्पनेवर आधारित आरोग्य व संलग्न उद्योगांचे विशेष प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. या परिषदेत तीन हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याचा अंदाज असून, वैद्यकीय व्यावसायिक, प्राध्यापक आणि नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत वैद्य संतोष गटणे, डॉ. मनोज चौधरी, डॉ. सुरेश पाटनकर, डॉ. शरद आगरखेडकर, डॉ. गिरीश कामत, दीपक अष्टपुत्रे आणि अमेय वाघ यांनी ही माहिती दिली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.