Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

'देऊळ बंद २'मधून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले; शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा -लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे

xtreme2day   24-05-2026 21:06:04   21530940

'देऊळ बंद २'मधून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले; शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा -लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे 

 

मराठी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट देऊळ बंद 2 सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. हा २०१३ मधील “देऊळ बंद” या लोकप्रिय चित्रपटाचा सिक्वेल आहे. “देऊळ बंद 2” ला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत असून सकाळच्या शोला देखील मोठी गर्दी झाली होती. काही प्रेक्षकांनी चित्रपटातील अध्यात्मिक बाजूचे कौतुक केले, तर सोशल मीडियावर काहींनी कथानक आणि विज्ञानाच्या मांडणीवर मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपटातून श्रद्धा, विज्ञान, शेतकरी जीवन आणि अध्यात्म यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. एका शेतकऱ्याच्या जीवनातील संकटे आणि देवावरील विश्वासाची परीक्षा हा कथानकाचा मुख्य भाग आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रभाव आणि समाजातील वास्तव यांचा संगम चित्रपटात पाहायला मिळतो.

 

'देऊळ बंद २'मधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. 'शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेल'; असं लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे. मी दिग्दर्शित केलेला 'देऊळ बंद' हा पहिलाच सिनेमा होता. मी आणि प्रणित कुलकर्णी यांनी मिळून तो केला होता. आता आम्ही दुसरा भाग घेऊन आलोय. सध्या आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न सिनेमातून मांडत आहोत. ' देऊळ बंद २ ' ज्या कारणासाठी बनवला आहे, त्या भावनेपर्यंत मी पोहोचलोय, असं मला वाटतं. शेतकरी आत्महत्या थांबलीच पाहिजे; त्यावर भाष्य करणारा आणि ती थांबवण्यासाठी प्रयत्नशील असलेला असा हा सिनेमा आहे. 

 

'देऊळ बंद' यशस्वी झाल्यानंतर 'मुळशी पॅटर्न' बनवण्याचं माझं स्वप्न होतं. माझी संहिता तयार होती, पण त्यावेळी 'दिग्दर्शक' म्हणून माझं फारसं नाव नव्हतं. त्यामुळे निर्माता पटकन मिळत नव्हता. 'देऊळ बंद'च्या यशामुळे मला ओळख मिळाली आणि मग 'मुळशी पॅटर्न'ला निर्माता मिळाला. त्यानंतर 'सरसेनापती हंबीरराव, 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर २' असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करत गेलो. या सगळ्यात अनेक वर्ष गेली. मात्र, देऊळ बंदचा पुढचा भाग यावा अशी माझी पत्नी, निमति आणि मोहन जोशी यांची इच्छा होती. त्यामुळे मागची दीड-दोन वर्ष फक्त त्याच सिनेमाला दिली. माझं कुटुंब वारकरी परंपरेतलं आहे. घरात पूजा, वारी सगळं पाहिलं; पण मी स्वतः फारसा देवधर्मात रमणारा नव्हतो. आर्थिक अडचणींमुळे मी 'देऊळ बंद' स्वीकारला. माझ्या पहिल्या सिनेमाचा नायक राघव शास्त्री हा नास्तिक होता. नास्तिक माणूस देवाशी जास्त प्रामाणिकपणे भांडू शकतो, प्रश्न विचारू शकतो. या सिनेमामुळे माझ्यातही श्रद्धा निर्माण झाली आणि मी स्वामी समर्थांना मानू लागलो. 'देऊळ बंद २'मध्ये शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाला मी वेगळ्या पद्धतीनं हाताळलं आहे. मला रडकं चित्रण करायचं नव्हतं. उलट थेट, आक्रमक आणि संवादात्मक पद्धतीनं हा विषय मांडायचा होता. सरकार, समाजसेवक, शेतकरी, नेते अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत; पण आत्महत्त्यांचा आकडा कमी होत नाही. त्यामुळे मी ठरवलं, की यावेळी देवाच्या भाषेत सांगू या. गरुड पुराणात आत्महत्या हे मोठं पाप मानलं गेलं आहे. त्या श्रद्धेच्या आधारानं एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला, तर तेच या सिनेमाचं मोठं यश असेही  प्रवीण तरडे यांनी सांगितलं. 

 

एकाच वेळी 33 पास सलग चित्रीकरण करताना आलेल्या अनुभवाबद्दल प्रवीण म्हणाला की, मोठ्या गोदामात आम्ही चित्रीकरण करत होतो. ते लोकेशन महागडं असल्यामुळे दिलेल्या वेळेत चित्रीकरण पूर्ण करायचं होतं. आम्ही इनडोअर सेटवर दिवसाचा प्रकाश तयार केला होता, त्यामुळे बाहेर काय सुरू आहे याचं मला भानच नव्हतं. सलग ३३ तास संपूर्ण टीम चित्रीकरणात मग्न होती. गावाकडचे काही लोक ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून आले होते. कुणाला सकाळी म्हशीचं दूध काढायला जायचं होतं, कुणाला गायी घेऊन शेतात जायचं होतं. त्यामुळे एकेक करून लोक निघून जाऊ लागले. पण माझ्या भीतीमुळे सेटवर कुणी मला सांगत नव्हतं. शेवटी प्रॉडक्शन टीमनं चालक, मित्रमंडळी आणि सेटवर आलेल्या पाहुण्यांनाही ज्युनिअर आर्टिस्टचे कपडे घालून उभं केलं. हे मला माहीत नव्हतं. नंतर मोहन सरांनी सांगितलं की, 'तुझ्या भीतीनं सगळे उभे राहिलेत. जरा त्यांचाही विचार कर. ३३ तास झाले; आपण सलग चित्रीकरण करतोय.' तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मी चित्रीकरण पूर्ण केलं.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती