आंतरराष्ट्रीय पातळीवर विज्ञान साहित्याला आणि संशोधनाला नवे आयाम देणारा अवलिया डॉ. जयंत नारळीकर
xtreme2day
20-05-2025 16:54:10
34509851
आंतरराष्ट्रीय पातळीवर विज्ञान साहित्याला आणि संशोधनाला नवे आयाम देणारा अवलिया डॉ. जयंत नारळीकर

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यात निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. . त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. डॉ. नारळीकरांच्या आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले होते. तेथूनच त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली.
जयंत नारळीकर यांनी विज्ञानातील अनेक बदल, नवे शोध जगापुढे मांडले. मुलांमध्ये विज्ञान रुजावे. त्यांची विज्ञानाची कक्षा रुंदावी यासाठी त्यांची खास तळमळ होती. विज्ञान किचकट नाही तर सुलभ भाषेतून शिकवण्यासाठी ते साहित्याच्या पंढरीत रमले. घरातूनच त्यांना विज्ञानाचं बाळकडू मिळालं होतं.
जयंत नारळीकर यांना पूर्वीपासूनच अंतरिक्ष, अंतराळाची ओढ होती. खगोलविज्ञानात त्यांचा पूर्वीपासून ओढा होता. त्यातूनच त्यांनी आकाशाशी नाते जोडले. पण विज्ञानातील या घडामोडी बालगोपाळांपासून अबालवृद्धांपर्यंत सहज आणि सोप्या भाषेत पोहचाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केला. विज्ञान किचकट नाही तर सोपं असल्याचे त्यांनी समोर आणले. त्यांनी लेखणीतून महाराष्ट्राला विज्ञान साक्षर करण्यासाठी लेखणी झिजवली. त्यांनी विज्ञान साहित्यविश्वाचे नवे दालन सर्वांसाठी उघडलेच नाही तर ते समृद्ध केले. पाश्चात्य देशातील लोकांमध्ये जसा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तसा आपल्याकडील लोकांचा असावा ही त्यांची प्रांजळ भावना होती. लोकांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून जागरुकता यावी आणि त्यांच्यात विज्ञानाची आवड असावी हा त्यांचा लिखाणाचा हेतू होता.
1979 मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांचा यक्षांची देणगी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याने विज्ञान साहित्याच्या चौकटी बदलल्या. हॉयल-नारळीकर सिद्धांतामुळे त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले. विज्ञान कथा लिहिताना त्यांनी ती बोजड, तांत्रिक अथवा कंटाळवाणी वळण टाळले. उलट त्यात साहित्य विनोदाची पेरणी केली. त्यामुळे एक मोठा वर्ग विज्ञानाकडे वळाला. त्यांच्या या पुस्तकांची मराठी तरुणाईलाच नाही तर अबालवृद्धांना भुरळ घातली नसती तर नवल. नारळीकरांसारखा प्रख्यात वैज्ञानिक लिखाण करतो, ही मराठी वाचकांसाठी साहित्य मेजवाणीच ठरली. मराठी साहित्याला या विज्ञान कथांनी नवी उभारी आणि भरारीच दिली असे नाही तर महाराष्ट्राचा विज्ञानवादी दृष्टीकोन भक्कम होण्याचा पाया यामधून घातला गेला. शास्त्रीय बैठकीसह त्यांनी साहित्य विश्वात विज्ञानाची पणती तेवत ठेवली. विज्ञानाची गोळी कडू लागत असेल तर तिला साखरेचे कोटिंग म्हणजे कथेचे रुप देणे योग्य ठरेल असे त्यांचे मत होते. त्यांनी विज्ञानकथा लिहिण्यामागील त्यांचा हेतू स्पष्ट केला होता. त्यांच्या कथेचे शीर्षकच अगदी मनातील कुतुहल चाळवणारे ठरत असे. तितक्याच या कथा सोप्या आणि खोल अर्थ समजावून सांगत असतं.
त्यांनी यक्षांची देणगी, कृष्णविवर, उजव्या सोंडेचा गणपती, गंगाधरपंतांचे पानिपत, धूमकेतू, पुनरागमन, दृष्टीआड सृष्टी, धोंडू, पुत्रवती भव, ट्रॉयचा घोडा, नौलखा हाराचे प्रकरण, अखेरचा पर्याय अशा भुरळ घालणाऱ्या विज्ञान कथा लिहिल्या. त्यांचे गारूड एका पिढीवरच नाही तर कित्येक पिढ्यांवर राहिल यात शंका नाही.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.