'समांतर चित्रपटाचे जनक' श्याम बेनेगल!
xtreme2day
25-12-2024 08:31:57
17559019
'समांतर चित्रपटाचे जनक' श्याम बेनेगल!

'चित्रपट' म्हंटलं कि, 'मनोरंजन' हाच अर्थ बहुतांश रित्या घेतला जातो. खरं तर यात बऱ्याच अंशी तथ्य असलं तरी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही निर्माते - दिग्दर्शक असेही होऊन गेले ज्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच केलं नाही तर समाज मनाचा आरसा दाखवण्याचंही काम केलं. सामान्य माणसाच्या जीवनाचं प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर चित्रित केलं. त्यातील काही चित्रपट तर असे होते कि ज्यांनी प्रबोधन, उदबोधन आणि प्रसंगी मंथन करायला देखील भाग पाडलं आणि चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून, सामाजिक चौकटीचा आशय बदलणारं ते एक प्रभावी माध्यम होऊ शकतं हे सिध्द केलं.
ज्यांनी या श्रेणीतील चित्रपट तयार केले, दिग्दर्शित केले असे निर्माते - दिग्दर्शक किती प्रतिभावंत आणि द्रष्टे असतील हे वेगळं सांगायला नकोच! याच श्रेणीतील एक अग्रगण्य नाव म्हणजे - श्याम बेनेगल! त्यांनी नेहमीच्या पठडीपेक्षा खूपच वेगळ्या धाटणीचे चित्रपट निर्माण करून केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून मसालेदार चित्रपट निर्माण करणाऱ्या प्रवाहाला एक समांतर प्रवाह तयार केला. त्यामुळं त्यांना 'समांतर चित्रपटाचे जनक' असं देखील म्हंटलं गेलं. पण त्यांना मात्र हे मान्य नव्हतं. ते म्हणाले कि, "समांतर चित्रपट ही संकल्पनाच चुकीची आहे. पण मी वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार केले हे मात्र खरं."
१९७३ साली बीग बी अमिताभ चा 'जंजीर' प्रदर्शित झाला आणि चित्रपट सृष्टीच्या नव्या युगाला आरंभ झाला. झाडाभोवती नायिकेच्या मागे घिरट्या घालणारा नायक आता एकाच वेळी १०-१२ गुंडाना ढिशूम ढिशुम करत चारी मुंड्या चीत करू लागला. प्रेक्षकवर्गही नायकाच्या या बदललेल्या प्रतिमेवर जाम फिदा झाला आणि सिनेयुगाच्या या बदलत्या पार्श्वभूमीवर 'अंकुर' हा श्याम बेनेगल यांचा पहिलाच चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाला. हे सगळं विशद करण्याचं कारण म्हणजे, ज्या वेळी 'जंजीर' सारख्या मसालेदार चित्रपटांनी गल्ला भरण्याचं काम केलं, त्याचवेळी समाजातल्या समस्यांवर, घडामोडींवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करून चित्रपटसृष्टी समृध्द करण्याचं काम श्याम बेनेगल यांच्यासारख्या दृष्ट्या निर्माते-दिग्दर्शकांनी केलं. 'अंकुर' हा चित्रपट जमीनदार आणि त्याच्याकडे काम करणारा मजूर वर्ग यांच्यातल्या परस्पर संबंधांवर आणि संघर्षावर बेतलेला होता. मूक-बधिर नवऱ्याचा सांभाळ करणारी लक्ष्मी, जमीनदार सूर्याचं तिच्यावर जडलेलं प्रेम आणि नंतर होणारा विदारक शेवट असं या चित्रपटाचं कथानक होतं. श्याम बेनेगल यांचा हा चित्रपट आजही एक यशस्वी समांतर चित्रपट म्हणून ओळखला जातो. बेनेगल यांच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि 'शबाना आझमी' नावाची सक्षम अभिनेत्री रुपेरी पडद्याला लाभली. शबाना आझमींना ‘अंकुर’मधल्या ‘लक्ष्मी’च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
श्याम बेनेगल यांचा प्रत्येक चित्रपट म्हणजे या क्षेत्रात कारकीर्द करू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी एक अभ्यासक्रम आहे असं म्हंटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. या दृष्टीनं बेनेगल यांच्या कारकिर्दीकडं पाहिलं तर त्यांच्या निर्मिती - दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या चित्रपटांची यादी वाचताना आणि त्यांचं अवलोकन करताना या माणसाचा आवाका किती मोठा होता याची प्रचिती येईल. 'अंकुर' प्रमाणंच देहविक्रीला नावं ठेवणारेच कसा त्याचा आधार घेतात आणि स्वार्थ साधतात याचं नग्न सत्य दाखवणारा 'मंडी' सारखा चित्रपट, एका मराठी अभिनेत्रीची कहाणी दाखवणारा 'भूमिका' सारखा चित्रपट, महाभारताची पार्श्वभूमी असलेला 'कलयुग' सारखा चित्रपट, जमीनदारांकडून ग्रामस्थांचं शोषण केलं जातं यावर भाष्य करणारा 'निशांत' सारखा चित्रपट, वर्गीस कुरियन यांच्या दुग्धचळवळीवर आधारित 'मंथन' सारखा चित्रपट ... बेनेगल यांचे हे सर्व चित्रपट समाजातील घडामोडींवर आणि त्याच्या मानवी मनावर होणाऱ्या भावनिक परिणामांवर भाष्य करतात. हे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक दिग्मूढ झाल्याशिवाय रहात नाही. कल्पनारम्य कथा माणसाला काही काळ आनंद देतात, परंतु जीवनाचं वास्तवदर्शी चित्रण माणसाला एक विचार देतं, एक असा विचार जो माणसामध्ये अमुलाग्र 'परिवर्तन' घडवतो.... होय 'परिवर्तनच'! कारण 'बदल' तात्पुरता असतो पण 'परिवर्तन' कायमस्वरूपी असतं. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांनी हा विचार समाजाला दिला आणि म्हणूनच एक निर्माता - दिग्दर्शक म्हणून जसं चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान अमूल्य आहे त्याहीपेक्षा जास्त योगदान समाजातील एक घटक म्हणून त्यांचं राहिलं आहे.
‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ , ‘आरोहण’ , ‘सूरज का सातवा घोडा’, ‘मम्मो’, यांसारख्या चित्रपटांबरोबरच 'सरदारी बेगम' हा त्यांचा उर्दू चित्रपट देखील चर्चेत राहिला. तर ‘झुबैदा’ हा सिनेमाही चर्चेत होता. 'नेताजी सुभाषचंद्र बोस - द फॉरगॉटन हिरो' आणि 'वेल डन आब्बा' हे त्यांचे अलीकडच्या काळातील चित्रपट देखील उल्लेखनीय होते. केवळ चित्रपटच नव्हे तर चित्रपटनिर्मितीच्याही आधी त्यांनी जवळपास एक हजार जाहिराती तयार केल्या होत्या. शिवाय 'The Discovery of India' या पंडित नेहरू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित हिंदी भाषेत रूपांतरण केलेली 'भारत एक खोज' ही बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली मालिका टेलिव्हिजनच्या इतिहासातील 'क्लासिक' मालिकांमध्ये गणली जाते. अगदी पुराण काळापासून म्हणजेच रामायण, महाभारतापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या काळात, घडलेल्या घटना या काही भागांमध्ये बसवून त्याची गोष्ट सांगणं हे आव्हानही श्याम बेनेगल यांनी लीलया पेललं. चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट ‘दादासाहेब फाळके' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर १९७६ साली 'पदमश्री' आणि १९९१ साली भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पदमभूषण' देऊन त्यांना गौरवण्यात आलं. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांना तब्बल १८ वेळेस राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'कमाल', 'महत्तम', 'सर्वोत्तम', 'सर्वोत्कृष्ट', 'प्रचंड', 'भव्य' या सगळ्या सर्वोच्च श्रेणीतील उपमाही जिथे थिट्या पडाव्यात असं श्याम बेनेगल यांचं कर्तृत्व होतं.
जाहिरात, मालिका आणि चित्रपट यांची निर्मिती आणि दिग्दर्शन एकाच व्यक्तीनं करणं हे कदाचित शक्य होऊ शकतं. परंतु त्या कायम स्मरणात राहतील आणि ज्यांची उदाहरणं दिली जातील, ज्यांच्याकडे अभ्यासाच्या दृष्टीनं संदर्भ म्हणून पाहिलं जाईल असं काम करणं म्हणजे केवळ अशक्य गोष्ट आहे. परंतु ‘श्याम बेनेगल’ नावाच्या माणसानं आपल्या कर्तृत्वानं ही गोष्ट सिध्द करून दाखवली आणि म्हणूनच त्यांचं नसणं आपल्याला कायम जाणवत राहील. त्यांची पोकळी कधीही भरून निघणार नाही, परंतु त्यांचं कार्य या क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्या नवोदितांना कायम एक योग्य दिशा आणि प्रेरणा देण्याचं कार्य करेल यात शंकाच नाही. चित्रपटसृष्टीच्या विश्वात समांतर चित्रपटांचा 'अंकुर' फुलवत रसिकांना 'मंथन' करायला लावणाऱ्या या दृष्ट्या निर्मात्या दिग्दर्शकास भावपूर्ण श्रध्दांजली !
लेखन व संकलन : श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.