मराठी मातीचा सुगंध असणारी संवेदनशील अभिनेत्री स्मिता पाटील असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोरं येतंय आभाळ .... !!
xtreme2day
17-10-2024 12:24:09
5984642
मराठी मातीचा सुगंध असणारी संवेदनशील अभिनेत्री स्मिता पाटील
असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोरं येतंय आभाळ .... !!
ती बाजिंदी होती… ती स्त्रीच्या मनातील घुस्मटलेल्या भावनांचा आवाज होती … ती स्त्रीमुक्तीचा चेहरा होती … ती रुपेरी पडद्यावर अभिजात अभिनयाची चमक घेऊन प्रेक्षकांचे डोळे दिपवणारी वीज होती. तिच्याबद्दल बोलताना, तिच्या जन्मदिनानिमित्त तिच्या कारकिर्दीचं पुनरावलोकन करताना नेमकी सुरुवात कुठून करावी हा फार मोठा प्रश्न होता. कारण दूरदर्शन असो कि रंगभूमी, मराठी चित्रपट असो कि हिंदी चित्रपट सृष्टी, कलात्मक चित्रपटातील भूमिका असो कि व्यावसायिक चित्रपटातील या सगळ्याच क्षेत्रात तिचा वावर इतका लीलया होता कि त्याविषयी बोलायचं ठरवलं तर शब्द थिटे पडावेत आणि तरीही तिच्यावरच्या या लेखनप्रपंचाचं धारिष्ट्य माझ्या हातून होतंय. ती ... काळ्या - सावळ्या रंगाची, शेलाट्या बांध्याची, तरतरीत नाकाची आणि टपोऱ्या डोळ्याची. सावळ्या रंगात देखील आकर्षून घेणारं सौंदर्य असू शकतं हे मुर्तिमंतरित्या सिध्द करणारी ... स्मिता ... स्मिता शिवाजीराव पाटील!
स्मिता पाटील बद्दल मला कायमच एक गूढ आकर्षण होतं. ती कायमच मला एका रहस्यमय कादंबरीतील गूढतेचं वलय पांघरलेली नायिका भासली. एखाद्या गावात उजाड पडलेली वास्तू असते. गावातले जाणते लोक त्या वास्तूबद्दलचा इतिहास चवीनं सांगताना "त्या वास्तूत प्रवेश करू नका बरं, कारण तिथं गेलेला माणूस कधीच परत येत नाही" आणि हे ऐकूनही त्या वास्तूत प्रवेश करायची, एकदा का होईना ती आतून बघून येण्याची इच्छा प्रकर्षानं होणं, मनाचं सारखं तिकडेच ओढ घेणं त्यावेळी जी मनाची अवस्था होते ना ... थोडी भीती, खूपसं आकर्षण, अनामिक ओढ ... अगदी तशी अवस्था होते स्मिताविषयी बोलायचं म्हंटलं कि! 'स्मिता पाटील' नावाची ही व्यक्ती (व्यक्तीच म्हणेन, कारण कोणताही लिंगभेद स्मिता सारख्या व्यक्तीला लागूच होत नाही.) खरंच अस्तित्वात होती, के ते आपल्याला पडलेलं एक गूढ स्वप्न होतं? असा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारावा इतकंच तिचं अल्प अस्तित्व या पृथ्वीतलावर होतं. 'ती आली म्हणता म्हणता तिचा नीटसा परिचय होण्याआधीच ती जीवाला चटका लावून गेलीही!' असं कोणी करतं का? आणि जीवाला असा चटका लावून जायचंच होतं तर मग आलीस तरी का? पण हे प्रश्न आपण कोणाला विचारायचे? स्वतःला ? स्मिताला कि देवाला? हा एक शेवटपर्यंत उरणारा एक अनुत्तरित प्रश्न आहे.
तिच्या व्यक्तिमत्वाच्या छटा तर इतक्या कि एका क्षणी ती प्रगल्भ स्त्री आहे हे मान्य करत असतानाच ती अशी काही बालिश कृती करायची कि वाटायचं मघाशी प्रगल्भ वाटणारी स्त्री हि तीच का? कदाचित लोकांना असं गोंधळलेल्या अवस्थेत बघायला तिला गंमत वाटत असावी. नाही तर बघा ना, वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणातील बडं प्रस्थ आणि आई विद्याताई पाटील या प्रसिध्द समाजसेविका, मात्र वडिलांचा राजकीय वारसा असताना आणि आईचा समाजसेवेचा वारसा असतानाही या कन्येनं मात्र चंदेरी दुनियेची वाट धरली. एक अशी दुनिया जिथं सगळंच मृगजळ आहे आणि या दुनियेचं अस्तित्व ही अल्पायुषी. पण तिनं तरीही या दुनियेत प्रवेश केला आणि नुसता केला नाही तर आपल्या अल्पायुष्यात अशी कारकीर्द केली जी साधण्यासाठी एखाद्या अभिनेत्रीला कैक वर्षे लागावीत.
तिच्यात एक स्पार्क होता, तिच्या देहबोलीतून तो जाणवायचा. ताठपणे डौलात चालणं आणि आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी समोरच्या व्यक्तीला पार आरपार भेदणं हे वैशिष्ट्यच होतं तिचं. मला नीटसं आठवत नाही पण तिच्यावर लिहिलेल्या एका लेखामध्ये वाचलेला हा किस्सा आहे, जो माझ्या स्मरणात राहिला. तो असा कि महाविद्यालयीन जीवनात असताना, मैत्रिणीसोबत पायी चालत जाताना स्मिताची चप्पल तुटली. ती शिवण्यासाठी त्या दोघी रस्त्यावर असलेल्या एका चांभाराकडं गेल्या, तेव्हा स्मिता आपल्या मैत्रिणीला म्हणाली कि, "आयुष्य असं सामान्य माणसासारखं जगण्यात मला अज्जीबात रस नाही. आयुष्यात माणसानं असं काही करावं कि सगळ्या जगानं त्याला ओळखावं आणि कायम स्मरणात ठेवावं. मी तसंच काहीसं करणार!" हे जसंच्या तसं मला आठवत नाही, पण त्याचा आशय मात्र हाच होता आणि बघा नं अजून नीटसे पंखही न फुटलेल्या त्या षोडशवर्षीय कन्येनं आपलं हे विधान खरं करून दाखवलं. आज तिला जाऊन अनेक दशकं लोटली आणि तरीही ती सगळ्यांच्या स्मरणात आहे.
१७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे इथं जन्मलेल्या स्मितानं पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं आणि पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतून अभिनयाचे धडे गिरवले. राष्ट्र सेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने १९७४ साली अरुण खोपकर यांच्या एफटीआयआयच्या ‘तीव्र मध्यम ‘ या डिप्लोमा फिल्ममध्ये सर्वप्रथम काम केले. तर दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ‘वृत्तनिवेदिका’ या नात्यानं केली. जड - जवाहिरांची पारख ही फक्त जोहरीलाच असते, या न्यायानं सुप्रसिध्द निर्माते - दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी स्मितामध्ये दडलेल्या प्रतिभावान अभिनेत्रीला ओळखलं आणि आपल्या 'चरणदास चोर' या चित्रपटात तिला अभिनयाची संधी दिली. या चित्रपटाद्वारे स्मिताचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या पहिल्याच चित्रपटातील स्मिताच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिले नाही. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटीलचे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलनी विविध स्त्री व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.
स्मिता खऱ्या अर्थानं एक 'संपूर्ण अभिनेत्री' होती. तिच्या अभिनय कारकिर्दीकडं एक संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकला तर हे विधान अतिशयोक्ती नाही हे तुम्हाला खात्रीनं पटेल. टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील वृत्तनिवेदिका असो कि , ‘भारत दर्शन ‘ या सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग. जब्बार पटेल दिग्दर्शित 'जैत रे जैत', 'उंबरठा' हे चित्रपट आणि चंद्रकांत जोशी दिग्दर्शित 'सूत्रधार' या चित्रपटांमधील वेगळ्या जॉनर च्या भूमिका असोत कि , श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘कोंडुरा ‘, मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’, गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘आक्रोश’, आणि ‘अर्धसत्य’, सईद मिर्झा दिग्दर्शित ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है ‘, रवीन्द्र धर्मराज दिग्दर्शित ‘चक्र ‘, के. ए. अब्बास ‘द नक्सलाईटस ‘, सागर सरहादी दिग्दर्शित ‘बाजार’, टी. एस. रंगा दिग्दर्शित ‘गिध्द ‘, केतन मेहता दिग्दर्शित ‘मिर्च मसाला ‘, उपलेन्दू चक्रवर्ती दिग्दर्शित ‘देबशिशू ‘ यासारख्या समांतर चित्रपटातील भूमिका असोत. तजुर्बा, दिल ए नादान, आवाम, नझराना, आखिर क्यू, अमृत, अनोखा रिश्ता, शक्ती, नमकहलाल यासारख्या व्यावसायिक चित्रपटातील भूमिका असोत कि , बदले की आग, भीगी पलके, चटपटी, दर्द का रिश्ता, घुंगरु, हादसा, कयामत, आज की आवाज, आनंद और आनंद, पेट प्यार और प्यास, जवाब, गुलामी, मेरा घर मेरे बच्चे, वारीस यासारख्या मसालेदार चित्रपटातील भूमिका. बीज आणि वासनाकांड यासारखी वेगळ्या प्रवाहातील नाटकं किंवा 'छिन्न' यासारख्या व्यावसायिक नाटकातील भूमिका , अॅलेक पद्मसी दिग्दर्शित ‘रिक्वेस्ट कॉन्सर्ट ‘ या एकपात्री नाटकातील भूमिका! एक 'संपूर्ण अभिनेत्री' म्हणून स्वतःची यशस्वी ओळख निर्माण करण्यासाठी एखाद्या अभिनेत्रीला आणखी कोणती पावती द्यावी लागणार? स्मिता पाटील निर्विवादपणे संपूर्ण अभिनेत्री होती हे तिची कारकीर्द सांगते.
बरं ती अल्पायुष्यी ठरणार आहे हे नियतीला अगोदरच माहित असल्यामुळं तिनं स्मिताची कारकीर्द समृध्द करण्यासाठी जे जे म्हणून सर्वोत्तम होतं ते ते सगळं तिच्या पायाशी आणून ठेवलं आणि स्मितानं देखील नियतीनं तिच्या पदरात पाडलेल्या दानाचं अक्षरशः सोनं केलं. वयाच्या २० व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता जवळजवळ ७५ चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी ठरली. १९८४ मध्ये आंतरराष्ट्रीय नायिका म्हणून तिची ओळख प्रस्थापित झाली. बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘मंथन’ आणि ‘भूमिका’ या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. स्मिता पाटीलने मग मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि तेलगू अशा एकूण आठ भाषांतील चित्रपटात भूमिका साकारल्या. तिचं अनुभव विश्व विस्तारलं. १९७५ साली डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘ सामना ‘ या चित्रपटात या टोपीखाली दडलयं काय या गाण्यात डॉ. श्रीराम लागू यांच्या फ्लॅशबॅकमधील युवती तिने साकारली. श्याम बेनेगल दिग्दर्शित मंथनमधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘भूमिका ‘( १९७७) मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणाऱ्या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. दलित, शोषित स्त्रियांच्या, बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. या अभिनेत्रीनं प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणाऱ्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रीनं एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. कलात्मक चित्रपटात ८० च्या दशकात कायमच अभिनेत्री शबाना आझमी यांच्या अभिनयासोबत स्मिताच्या अभिनयाची तुलना केली गेली. महेश भट्ट दिग्दर्शित 'अर्थ ' आणि शाम बेनेगल दिगदर्शित 'मंडी' या चित्रपटात या दोघी तुल्यबळ अभिनेत्री एकत्र आल्या. मात्र रसिकांनी आणि समीक्षकांनी केलेल्या त्यांच्या तुलनेचा या दोघींवरही प्रभाव जाणवला नाही. उलट या दोघींच्या पडद्यावरील जुळलेल्या केमेस्ट्रीमुळे दोन अत्यंत उत्कृष्ट कलाकृतींची पर्वणी रसिकांना मिळाली.
स्मिता पाटील ही एक संपूर्ण अभिनेत्री केवळ यामुळंच ठरत नाही तर तिच्या कारकिर्दीला कळस ठरणारे अनेक पैलू आहेत जे तिला केवळ संपूर्ण अभिनेत्री नाही तर सहस्रकातील एक अलौकिक अभिनेत्रीचा दर्जा देऊन जातात. ते म्हणजे कॉस्टा गॅव्हाराससारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शकानं १९८४ साली फ्रान्समध्ये पॅरीस आणि ला रोशेल अशा दोन्ही ठिकाणी स्मिता पाटीलच्या चित्रपटांचे महोत्सव आयोजित केले. अशा प्रकारचा चित्रपट महोत्सव आयोजित केली जाणारी स्मिता पाटील आशियातील पहिली अभिनेत्री आहे. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिता ला मिळाला होता. मॉन्ट्रियल येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करण्याचा बहुमान स्मिता पाटीलला मिळाला. १९८५ साली नैरोबी येथे झालेल्या जागतिक महिला परिषदेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी स्मिता पाटीलला मिळाली. स्मिता पाटीलने आपल्या कर्तृत्वाने जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थिती अनुभवली. याशिवाय ‘मंथन’ आणि ‘चक्र ‘ या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्म फेअरचा विशेष अभिनेत्री पुरस्कार, ‘जैत रे जैत’ साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, ‘भूमिका ‘ आणि ‘चक्र’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार, याखेरीज राष्ट्रीय एकता पुरस्कार, आशीर्वाद अवॉर्ड, जायंटस अवॉर्ड असे स्मिता पाटीलने असंख्य पुरस्कार पटकावले आणि या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले होते.
एकीकडे स्मितानं 'आज रपट जाये तो हमे ना उठय्यो' म्हणत अमिताभसोबत पावसाच्या सरीत चिंब होताना रसिकांच्या मनाची नाजूक तार छेडली, तर दुसरीकडं 'इस डाकखाने में नहीं, सारे जमाने में नही, कोई सनम इस नाम का कोई गली इस नाम कि, कोई शेहर इस नाम का, हमने सनम को खत लिखा ...' असं म्हणत प्रेमभंगाच्या अनुभवातून गेलेल्या प्रेयसीच्या दुखऱ्या मनाला स्पर्श केला. एकीकडे म्हणत 'मी रात टाकली, मी कात टाकली, मोडक्या संसाराची बाई लाज टाकली' असं म्हणत सामाजिक अत्याचारानं घायाळ झालेल्या स्त्रीच्या मनात बंडाची ठिणगी पेटवली तर दुसरीकडं 'गगन सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश देई अभय' असं म्हणत नैराश्यानं ग्रासलेल्या मनाला आशेचा किरण देखील दाखवला. अशा या चतुरस्त्र अभिनेत्रीला जन्मदिनानिमित्त मानाचा मुजरा.
लेखन व संकलन : श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.