“जगी नांदावी सुखी शांती, सर्वांनी आचरावी बंधूप्रीति”, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
xtreme2day
11-10-2024 20:09:48
3786672
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
(जन्म :२९ एप्रिल १९०९– मृत्यू : ११ ऑक्टोबर,१९६८)
“जगी नांदावी सुखी शांती, सर्वांनी आचरावी बंधूप्रीति”
आपल्या लिखाणातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जगाला विश्व मानवतेचा, बंधुभावनेचा मार्ग दाखविला. त्यामुळेच सर्व धर्माचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आत्कृष्ट झाले. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी विचारसरणी असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. तुकडोजी महाराजांची " ग्रामगीता ' म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे, ग्रामसंस्कृती आणि ग्रामविकासाचे नितळ रूप होय. आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा विचार त्यांनी आपल्या 'ग्रामगीता' या काव्यातून रुजविला व त्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळे स्थापली. व्यायामाचे महत्त्व सांगण्यासाठी आदेश रचना या ग्रंथाची रचना केली. राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन केला. ग्रामगीता म्हणजे गाव-खेड्यांसाठी जणू दुसरी श्रीमद भगवद गीता म्हणावी लागेल. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा. ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, मानवतेचे तेज झळाळावे, या तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धी आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली. संत तुकडोजी महारांजांनी वरखेड या गावी त्याचे गुरु आडकोजी महाराज यांच्याकडून अध्यात्मिक दिक्षा घेतली. तुकडोजी महाराजांनी लहानपणी आत्म-अनुभूतीसाठी कठोर तपश्चर्या आणि आध्यात्मिक व्यायाम केले होते. त्यांनी समाजसुधारणेच्या दृष्टीकोनातून धर्म, समाज, राष्ट्र आणि शिक्षणात सुधारणेसाठी अनेक लेख लिहिले होते. कारण त्यांचा धार्मिक पंथ आणि विचारसरणींचा गाढा अभ्यास होता. त्यातूनच राष्ट्रनिर्माणाचा संकल्प त्यांनी केला होता. तुकडोजी महाराजांचे कवित्व अस्सल आहे. कीर्तने व खंजिरी भजने यांच्या माध्यमातून समाजसेवा हेच तुकडोजींचे ध्येय होते. त्यासाठी परंपरागत अनिष्ट रूढी, जातिधर्मपंथभेद, अंधश्रद्धा इ. समाजघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांसमोर मांडले. त्यामुळे सर्व धर्माचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. व्यायामाचे महत्व सांगण्यासाठी आदेशरचना हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक होते. तुकडोजी महाराजांचे नाव तुकडोजी आहे कारण त्यांनी त्यांचे बालपण भजन गाताना मिळालेल्या दानावर व्यतीत केले. त्यांचे नाव त्यांचे गुरू अडकोजी महाराजांनी दिले होते. ते स्वतःला 'तुकड्यादास' म्हणायचे. समाजातील मूलभूत समस्यांना जाणून त्यावर उपाय करणं, हे तुकडोजी महाराजांच्या कार्याचं वैशिष्ट्य होय. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 'गुरुकुंज' आश्रम इथे त्यांना 'राष्ट्रसंत' ही उपाधी दिली. संतपरंपरा बघता तुकडोजी महाराजांचा काळ तसा अलीकडचा. म्हणजे त्यांच्याच काळात भारत स्वतंत्र झाला. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे दोन्ही काळ अनुभवले. तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय कार्यातच आपले जीवन समर्पित केले. विश्वधर्म, विश्वशांती परिषदेसाठी १९५६ मध्ये ते जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान मोहित झाले. १९६६ मध्ये प्रयाग येथे विश्वहिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते. सर्व धर्म-पंथ-जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भाषणातून प्रगट करीत होते. त्यांच्या विचारांचे स्वरूप जागतिक होते. आपल्या मानवतावादी वैश्विक विचारांनी संपूर्ण मानवजातीला एक करणाऱ्या राष्ट्रसंतांची समग्र जीवन गाथा म्हणजे राष्ट्र विकासासाठी अखंडपणे धडपडणारी लोकगाथाच आहे. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत. प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा, वाईटरूढी,व्यसने यांचा त्याग करा. अश्या आशयाचे थोडा वेळ भाषण केले कि, हातातील खन्जरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होवून जाई.
महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. तुकडोजी महाराजांनी सुमारे ५० ग्रंथांची निर्मिती केली असून, त्यांचे अप्रकाशित वाङ्मयही बरेच आहे.
तुकडोजी महाराजांनी गीताप्रसाद, बोधामृत, लहरकी बरखा, अनुभव प्रकाश, ग्रामगीता, सार्थ आनंदमृत, सार्थ आत्म्प्रभाव हे ग्रंथ लिहिलेले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषेदेच्या संस्थापक उपाध्यक्षांपैकी एक होते. त्यांनी बंगाल दुष्काळ (१९४५), चीन युद्ध (१९६२) आणि पाकिस्तानचा हल्ला (१९६५), कोयना भूकंप विनाश (१९६२) या काळात राष्ट्रीत हेतू लक्षात घेऊन अनेक आघाड्यांवर मदत व पूनर्वसन करण्याचं काम केलं होतं. त्यांच्या शेवटच्या काळात ते कर्करोगाने त्रस्त होते. जीवघेणा रोग बरा करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले गेले, परंतु राष्ट्रसंतांनी ११ ऑक्टोबर १९६८ रोजी गुरुकुंज आश्रमात आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांची महासमाधी त्यांच्या गुरुकुंज आश्रमासमोरच बांधलेली आहे, जी आम्हाला त्यांच्या कृती आणि निःस्वार्थ भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथी निमित विनम्र अभिवादन!
लेखन व संकलन : श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम), माजी आमदार, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.