Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 व्यक्ती विशेष

मराठी कवितेचे युगप्रवर्तक : कवी केशवसुत

xtreme2day   08-10-2024 16:36:51   2558901

मराठी कवितेचे युगप्रवर्तक : कवी केशवसुत

(जन्म :७ ऑक्टोबर १८६६– मृत्यू :७ नोव्हेंबर १९०५).

“एक तुतारी द्या मज आणुनि

फुंकिन मी जी स्वप्राणाने

भेदुनि टाकिन सगळी गगनें

दीर्ध जिच्या त्या किंकाळीने

अशी तुतारी द्या मजलागुनी”

अशा शब्दांत क्रांतीचा मंत्र पोहोचवतानाच ‘सतारीचे स्वर दिड दा दिड दा’ असे  मधुर गुंजन करणारे आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले  उर्फ केशवसुत यांची आज जयंती.  कवी केशवसुत हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकाचा मनोधर्म जाणला होता, आत्मसातही केला होता. म्हणूनच ते कवितेचे युगपरिवर्तन करू शकले. ‘नव्या शिपायाचा’ बाणा पत्करून त्यांच्या कवितेने व्यक्तिस्वातंत्र्याची, समतेची, क्रांतीची, नव्या मनूची “तुतारी” फुंकली.  आधुनिक मराठी कवितेत केशवसुतांचा मान पहिला का आहे, तर त्यांनी रूढी-परंपराग्रस्त जग उलथून टाकण्याचा, समानतेची वागणूक देण्याचा आपल्या कवितेचा युगधर्मच आहे असे मानले. केशवसुतांनी इंग्रजी कवितांचे अवलोकन करून कवितेविषयी नवी दृष्टी स्वीकारली व ती मराठीमध्ये रूजवली. चाकोरीबद्ध कवितेला स्वच्छंद, मुक्त रूप दिले. सर्वसामान्य माणसांची सु्खदु:खे, भावभावना, वासना-विकार यांना कवितेत मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान दिले; कवितेला वास्तवतेचे भान दिले. इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. 

त्या शूराने भगवा झेंडा हिंदुस्थानी नाचविला                                                                                                               निजराष्ट्राचे वैभव नेले एकसारखे बढतीला..                                                               आणि तुवा रे ! त्वां नीचाने पाठ आपुली दावुनिया                                                                                     रणातुनी पौबारा केला, शेपुट भ्याडा वळवुनिया !"

 आज इतक्या वर्षांनंतरही या ओळींतील आशय बोथट जाणीवा जागृत करून जातो. काळ लोटला, चेहरे बदलले, मात्र माणसाची वृत्ती तीळमात्र ही बदलली नाही. वर्षातून दोन दिवस ध्वजवंदन करण्यापलीकडे आपण देशासाठी काय करतो ? म्हणूनच 'नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे' असं केशवसुत 'नवा शिपाई' या कवितेत स्वत:बद्दल म्हणतात.                                                                                                                केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे; असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते; अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी काव्यातील सुनीत हा छंदःप्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली. केशवसुतांनी आपल्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात एकशे बत्तीस कविता लिहिल्या. हे अमर्याद क्षितिज आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या युगाच्या पाऊलखुणा नुकत्याच दिसायला लागल्या होत्या. जॉन स्टुअर्ट मिलसारख्या विचारवंताने ‘ऑन लिबर्टी’ या ग्रंथामधून हा विचार अधोरेखित केला होता. केशवसुतांच्या आत्मपर कविता या दृष्टीने विचारात घ्यायला हव्यात. त्यांनी प्रेभभावनेचा मुक्त आविष्कार केला आहे. शरीर प्रेमाला त्यांनी नाकारलेले नाही. कविता करण्याचा त्यांचा हा छंद फारच अल्प वयापासून होता. वयाच्या १४-१५ वर्षापासून त्यांना चांगले श्लोक, आर्या रचता येत असत. काव्याबरोबर त्यांना चित्रे रेखाटण्याचाही छंद होता. पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचव्या-सहाव्या इयत्तेत असताना वर्गातील अभ्यासाकडे लक्ष न देता ते टिळक, आगरकर, इ. ची चित्रे वहीत रेखाटित असत. पुढे त्यांनी चित्रकलेचा नाद सोडला. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी एक नाटक व ग्रंथ लिहून दक्षिणाप्राइज कमिटीकडे पाठविला होता; परंतु त्याची विशेष दखल घेतली गेली नाही. पुढे त्यांनी काव्य हेच जीवनाचे ध्येय मानले आणि अनेक कविता रचल्या. आजही त्यांच्या जवळपास १३५ कविता उपलब्ध आहेत. आयुष्याच्या शेवटीशेवटी आपली काव्यशक्ती नष्ट झाल्याची जाणीव त्यांस झाली होती, असे त्यांच्या एका पत्रावरून वाटते. काव्याशिवाय एक गद्य नाटकही त्यांनी लिहिले होते पण ते अप्रसिद्ध आहे. काही इंग्रजी कविताही त्यांनी रचल्या होत्या.केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी १९१६ मध्ये प्रकाशित केला. गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर, काव्यविहारी यांसारखे कवी स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत. ‘तुतारी-मंडळ’ या नावाचे एक मंडळही स्थापन झाले होते. गूढ अनुभूती व तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ (१८९३) ही त्यांची कविता विशेष गाजली. अशा या महान कवीचे ७ नोव्हेंबर १९०५ रोजी निधन झाले. कवी केशवसूत यांना जयंती निमित विनम्र अभिवादन!

लेखन व संकलन : श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम) , माजी आमदार ,मराठवाडा पदवीधर मतदार केंद्र 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती