Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 व्यक्ती विशेष

लता मंगेशकर जयंती विशेष

xtreme2day   28-09-2024 19:27:24   18973315

पंछी बनू उडती फिरू : निसर्गाचे प्रेम व प्रेमातील निसर्ग

लता मंगेशकर जयंती विशेष 

 

मोकळ्या हवेत नायिका पिंजर्‍यातील पक्षी मोकळे करते. आकाशात ते स्वैर भरारी मारतात आणि पाठोपाठ तसेच संगीतही आपल्या कानावर पडते. लताचा अप्रतिम मोकळा खळाळत्या झर्‍यासारखा स्वर उमटतो, शैलेंद्रचे शब्द प्रकट होतात, 

‘पंछी बनू उडती फिरू, मस्त गगन मे

आज मै आझाद हू दुनिया की चमन मे

चोरी चोरी (1956) मधील हे केवळ एक गाणे नाही. तर शैलेंद्र-लता-शंकर जयकिशन या त्रिकुटाने जी 12 गाण्यांची मालिकाच हिंदी चित्रपटांत दिली त्यातली पहिली साखळी आहे फक्त. सगळी बंधनं तोडून नायिका बाहेर पडली आहे. ही उन्मुक्त अवस्था तिच्या मनाचीही आहे. प्रेमाला अतिशय पोषक अशी तिची मानसिकता तयार झाली आहे. निसर्गाशी तादात्म पावताना शैलेंद्रने जी उंची गाठली आहे ती केवळ अद्वितीय

 

ओ मै तो ओढूंगी बादल का आंचल

ओ मै तो पेहनूंगी बिजली की पायल

ओ छीन लूंगी घटाओं से काजल

ओ मेरा जीवन है नदियों की हलचल

दिल से मेरे लहेर उठी ठंडी पवन में

आज मै आझाद हू दुनिया की चमन मे

 

या सगळ्या गाण्यात कुठेही प्रियकाराचा उल्लेख नाही. कुठेही ती प्रेमात पडली असा संदर्भ येत नाही. पण स्वाभाविकच लक्षात येते की पुढची अवस्था प्रेम हीच असणार.

 

छोटी बहन (1959) मध्ये नंदाच्या तोंडी या मालिकेतील दुसरं गाणं येतं 

 

‘बागों मे बहारो मे इठलाता गाता आया कोई, 

नाजूक नाजूक कलियों के दिल को धडकाता आया कोई’

 

इथे पहिल्यांदा निसर्गाच्या सान्निध्यात प्रेयसीला प्रियकराची चाहूल लागते. कदाचित शैलेंद्रच्या डोक्यात हा विषय कायम घोळत असणार. म्हणून लता आणि शंकर-जयकिशन सोबत असले की त्याच्या शब्दांना वेगळाच रंग चढतो आणि प्रेम, निसर्ग यांतून अशा गाण्यांची निर्मिती होत राहते.

 

‘अपने हुये पराये’ (1964) मध्ये माला सिन्हाच्या तोंडी याच्या पुढची भावना शैलेंद्रने मांडली आहे. 

 

‘बहार बनके वो मुस्कुराये हमारे गुलशन मे

बाद-ए-सबा तू न आये तो क्या

काली घटा तू न छाये तो क्या’

 

पण 50-60 च्या दशकातील गाण्यात ज्या पद्धतीनं शंकर जयकिशनच्या संगीतात शब्दांना- लताच्या  स्वरांना न्याय देणारा नाजूकपणा होता तो आता आढळत नाही. आता पार्श्वसंगीतात वाद्यांचा गोंगाट वाढत गेलेला आढळतो. आणि एका साच्यात गाणे पुढे सरकत जाते असा भास होतो. 

 

पुढची भावना अर्थात प्रेमात प्रत्यक्ष पडल्याची आहे. निसर्गाच्या साक्षात्काराने निर्माण झालेली उत्फुल्लीत मनोवृत्ती, प्रेमाची लागलेली चाहूल, प्रियकराचं आयुष्यात आगमन. आता स्वाभाविकच  ‘मेरी जो मेरी जो, प्यार किसी से हो ही गया है, दिल क्या करे’ (यहूदी- 1958) हेच शब्द येणार. मीनाकुमारी-दिलीपकुमार यांचा हा गाजलेला चित्रपट. या गाण्यात एक गोड तक्रार शैलेंद्रने शब्दात मांडली आहे. ‘न होते मुकाबिल, न दिल हारते हम, ये अपनी  खता है गीला क्या करे’ यातूनच एका अल्लड प्रेयसिची मानसिकता समोर येते.  

 

प्रेमात पडलेली नायिका प्रेमामुळे आनंदी जगण्याचाच मंत्र शिकते. आणि मग या प्रेमाची व्याप्ती केवळ शारिर प्रेमापुरती न राहता आख्ख्या आयुष्यालाच व्यापून राहते. म्हणून मग ती आपल्या नात्याचा उल्लेख करता करता म्हणते

 

‘वो रंग भरते है जिंदगी मे बदल रहा है मेरा जहा

कोई सितारे लूटा रहा था किसी ने दामन बिछा दिया

किसी ने अपना बना के मुझको  मुस्कूराना सिखा दिया

अंधेरे घर को बना के रोशन चराग जैसे जला दिया’

 

‘पतिता’ (1953) मधले हे गाणे आजही ऐकताना प्रेमाचा टवटवीतपणा जाणवतो. आणि मुख्य म्हणजे हे सगळे ती व्यक्त करते आहे निसर्गाच्या सान्निध्यात आणि त्याच प्रतिमा वापरून. 

अशीच दोन गाणी ’नया घर’ (1953) मध्ये गीताबालीच्या तोंडी शंकर जयकिशनने दिली आहेत. ‘ये समां और हम तूम’ आणि ‘जा जा जारे जा रे जा, गम के अंधरे तू जा’. गीताबालीचा नखरा गाण्यातूनही व्यक्त झाला आहे. 

 

आत्तापर्यंतच्या या गाण्यांत नायिका एकटीच आहे. किंवा फार तर ती आपल्या मैत्रिणींना आपल्या मनातील भावना सांगत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्याच प्रतिमा वापरून प्रियकराच्या साथिनं आपल्या प्रेमाची कबुली ती देते हालाकु (1956) मध्ये. मीना कुमारी-अजीत वरचे हे सुंदर गाणे आहे

 

‘ये चांद और सितारे, ये साथ तेरा मेरा

शबे जिंदगी का न अब हो सबेरा

आ ऽऽऽ दिलरूबा आ ऽऽ दिलरूबा’

 

प्रेमाची द्वंदगीतं म्हणजे शंकर जयकिशनचा हातखंडाच. पण हे एकट्या लताचेच गाणे आहे. नायक उपस्थित आहे पण तो गात नाही. या गाण्यातही प्रेमाची भावना अतिशय सुंदर पद्धतीनं फुलवली आहे. 

 

दुसरं गाणं ‘लव्ह मॅरेज’ (1959) चं आहे. माला सिन्ह आणि देव आनंद वर चित्रित या गाण्यात देव आनंद नुसता हसून साथ देतो आहे पण असं वाटतं की तोही सोबत गातच आहे.

 

कहे झुम झुम रात ये सुहानी

पिया हौले से छेडो दोबारा

वोही कलकी रसिली कहानी

 

गाण्यातल्या एका कडव्यात ‘देख रही हू मै एक सपना, कुछ जागी सी कुछ सोयी सी’ असे शब्द येतात आणि पाठोपाठ पडद्यावर मालासिन्हाचे स्वप्नाळू डोळे येतात. तिचा पदर हलकेच ओढणारा देवआनंद तिला जणू स्वप्नातून जागेच करतो आहे असं वाटतं. 

 

जून्या गाण्यांना एका गोष्टीचा फायदा मिळाला. तो म्हणजे त्या काळी सिनेमा कृष्ण धवल होता. त्यामुळे काव्यात्मक अशा कित्येक छटा काळ्या-पांढर्‍याच्या दरम्यान पकडता येतात. ज्या की रंगीत मध्ये करकरीत होवून जातात. (म्हणूनच राजकुमार (1964) मधील ‘आ जा आयी बहार’ हे साधनाचं रंगीत गाणं या मालिकेत गृहीत धरलं नाही. शैलेंद्र-लता-शंकर जयकिशनचं असूनही. कृष्ण धवल गाण्यातली तरलता इथे नाही. )

 

रूप की रानी चोरों का राजा (1962) मध्ये याच मालिकेतील एक अफलातून गाणं आहे. 

 

‘तूम तो दिल के तार छेड करे हो गये बेखबर

चांद के तले जलेंगे हम, ए सनम रातभर’

 

हे गाणं तलतच्या आवाजात अतिशय सुंदर आहे. पण सोबत लताच्या आवाजातही आहे. देव आनंद-वहिदा रहमान यांच्यावर चित्रीत हे गाणं म्हणजे आधीच्या काळी ‘दो पहलू दो रंग’ अशा मालिकेतील गाण्याचा एक उत्तम नमुना. त्यात एकच गाणं गायक आणि गायिका यांच्या आवाजात स्वतंत्र असायचं. हे गाणं तसंच आहे. 

 

प्रेमाची पहिली अवस्था ज्यात फक्त निसर्ग आहे (पंछी बनू उडती फिरू), मग दुसरी अवस्था ज्यात नायिका एकटीच आहे आणि आपली प्रेम भावना निसर्गाच्या सान्निध्यात व्यक्त करते आहे (‘बागों मे बहारो मे’ पासून ते ‘जा जा जा रे जा रे जा’ पर्यंत). तिसरी अवस्था ज्यात नायिका एकटी नाही, सोबत नायकही आहे (‘ये चांद ये सितारे’ पासून ते  ‘तूम तो दिल के तार छेड कर’ पर्यंत). 

 

आता पुढची जी अवस्था आहे ती सुखाच्या परमोच्चक्षणी नायिकेला एक अनामिक अशी भिती वाटते आहे. तिला वाटते आहे की आपल्या सुखाला कुठे नजर लागते की काय? आणि तिच्या तोंडून स्वर उमटतात

 

‘तेरा मेरा प्यार अमर

फिर क्यूं मुझको लगता है डर’

 

असली नकली (1963) मधील हे गाणं साधनावर चित्रित आहे. साधना कट नसलेली साधा अंबाडा घातलेली साधना या गाण्यात विलक्षण गोड दिसली आहे. 

 

प्रेमाची पुढची  अवस्था अर्थात विरहाची. 1953 च्या ‘शिकस्त’ मध्ये नलिनी जयवंतच्या तोंडी हे गाणं शैलेंद्रने दिले आहे. 

 

कारे बदरा तू न जा न जा बैरी तू बिदेस न जा

घननन मेघ मल्हार सुना रिमझिम रस बरसा जा

 

माथे का सिंदूर रूलाये लट नागिन बन जाये

लाख रचाऊ उनबिन कजरा आसुअन से धूल जाये

 

निसर्गाच्या सान्निध्यात फुललेलं प्रेम, निसर्गाच्या सान्निध्यातच त्याची चरमसिमा आणि निसर्गाच्या सान्निध्यातच विरहाची वेदना अशा प्रकारे प्रेमाचे रंग शैलेंद्र-लता-शंकर जयकिशन या त्रिकुटाने रंगवले आहेत.

 

या सगळ्या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे एकातही नायिका नृत्य करताना दाखवली नाही. नर्गिस, मालासिन्हा, नंदा, मीना कुमारी या तशा नृत्यासाठी प्रसिद्ध नव्हत्याच. पण वहिदा रेहमान सारखी नृत्यनिपूण नायिका असतानाही  तिच्या वाट्याला नृत्य येत नाही. फक्त स्वाभाविक अशा हालचाली ती करते आहे. इथे प्रेमात मुग्ध झालेली हरवलेली गुंग झालेली नायिकाच पडद्यावर येत राहते. तिच्या काळजात भावनांचं नृत्य चालू आहे. शब्दांतून स्वरांतून जी स्वाभाविकता उमटते तिला योग्य तो न्याय देत नायिकाही नृत्य न करता साध्या हालचालींमधून तसे विभ्रम दाखवते फक्त.   

 

एखादा कवी असा काही विचार आपल्या गाण्यात करतो आणि त्याला गायिका, संगीतकार सतत 12 वर्षे साथ देत 12 गाणे देतात हे विलक्षण आहे. लताच्या आवाजात तो नैसर्गिक गोडवा आहे आणि सोबत या आवाजाला प्रीतीचे  अस्तरही आहे. वाद्यांच्या गदारोळात पुढे गाणं गुदमरून टाकणारा शंकर जयकिशन या गाण्यांसाठी मात्र कमालीचा हळवा होतो हे पण विशेष. 

 

अशी ही आगळी वेगळी 12 गाण्यांची 12 वर्षातील मालिका.

(या त्रिकुटाची अशी अजून काही गाणी आहेत. पण ही केवळ निसर्ग आणि प्रेम अशी गाणी नाहीत. प्रेमाची गाणी आहेत इतकंच खरं. जास्तीची गाणी रसिकांच्या नोंदीसाठी केवळ यादी)

1. बादल (1951), उनसे प्यार हो गया 

2. काली घटा (1951), इला बेली यारे 

3. पुनम (1952) दिन सुहाने मौसम प्यार का 

4. बादशहा (1954), गुल मुस्कुरा था 

5. राजहट (1956) मेरे सपनों मे आना रे, आ गयी लो आ गयी 

6. शरारत (1959) तेरा तीर ओ बे पीर 

7. जिस देश मे गंगा बेहती है (1960) ओ बसंती पवन पागल 

8. दिल अपना और प्रीत पराई (1960) मेरा दिल अब तेरा ओ साजना, अंदार मेरा मस्ताना 

9. राजकुमार (1964) आ जा आई बहार 

10. लव्ह इन टोकियो (1966) कोई मतवाला आया मेरे द्वारे 

11. आम्रपाली (1966) नील गगन की छांव मे 

12. गबन (1967) आये रे दिन सावन के.

 

          -आफताब परभनवी. 

 

(साभार - पुर्वप्रसिद्धी - अक्षरनामा, गाता रहे मेरा दिल, शनिवार, 22 एप्रिल 2017)


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती