Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 धडाकेबाज

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी सरकारचा मेगा प्लॅन; देवेंद्र फडणवीस उतरणार फिल्डवर, राज्यभर दौरा करणार

Xtreme Today   22-09-2026 20:05:36   273984656

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी सरकारचा मेगा प्लॅन; देवेंद्र फडणवीस उतरणार फिल्डवर, राज्यभर दौरा करणार 

 

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. दुष्काळाची परिस्थिती, पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भातील पहिली अधिसूचना काढली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री स्वतः फिल्डवर उतरणार आहेत. ते काही भागांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. 

 

राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. दुष्काळ कोणत्या भागात आहे आणि त्या भागात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासंदर्भातील अधिसूचना शनिवारपूर्वी काढण्यात येणार आहे. एखादा भाग पहिल्या टप्प्यात राहिला तर पुढील टप्प्यात त्याचा समावेश केला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्यापासून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून केली जाणारी मदत तसेच केंद्र सरकारकडून मागण्यात येणाऱ्या मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्या दृष्टीने माहिती संकलित केली जाणार आहे. 

 

राज्यातील काही भागांना मुख्यमंत्री स्वतः भेट देणार असून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी बांधावर जाण्यास सुरुवात झाली असून, आमदारांनाही आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी आणि तक्रारी थेट मांडता येणार आहेत. तसेच केंद्र सरकारकडे देखील मदत मागितली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. मात्र, केंद्राच्या मदतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य सरकार हातावर हात ठेवून वाट बघत बसणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. केंद्राकडून मदत मिळण्यास वेळ लागला तरी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

 

दुष्काळाबाबतची अधिसूचना तीन दिवसात काढणार आहोत, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एनडीआरएफची मदत येईल तेव्हा येईल. तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी मीडियाशी संवाद साधताना दिली. कर्नाटकने दुष्काळ घोषित केला नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी एनडीआरएफच्या नियमाने कारवाई केली जाते. तेव्हाच तो दुष्काळ मानला जातो. पण त्याची आधीसूचना आधी काढतात. ती आपण तीन दिवसात काढणार आहोत. कर्नाटकाने काही तालुक्यांची अधिसूचना काढली आहे. कालच त्यांनी घोषणा केली आहे. दुष्काळाचं डेटा कलेक्शन सुरू आहे. आकडेवारी आल्यावर आम्ही दुष्काळाची आधीसूचना काढू असं कर्नाटकाच्या उपमुख्यत्र्यांनी जाहीर केलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती