उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा सर्वच दिशांना मेट्रोचे जाळे विस्तारले जात असल्याने पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार
xtreme2dayउत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा सर्वच दिशांना मेट्रोचे जाळे विस्तारले जात असल्याने पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाणे अधिक सोपे आणि वेगवान होणार आहे. म
10-04-2026 22:08:37
13462909
उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा सर्वच दिशांना मेट्रोचे जाळे विस्तारले जात असल्याने पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार
पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाणे अधिक सोपे आणि वेगवान होणार आहे. मेट्रो प्रवासाबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, यामुळे पुणेकरांचा रोजचा प्रवास पूर्णपणे बदलून जाणार आहे. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणाऱ्या पुणेकरांनी मेट्रोला दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आता प्रशासनाने विस्तारीकरणाचा वेग वाढवला आहे.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुणे मेट्रोचा आवाका केवळ शहरापुरता मर्यादित न राहता तो आता थेट चाकणपर्यंत नेण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे. पीएमआरडीए सोबत समन्वय साधून हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री स्तरावरून देण्यात आले आहेत. यामुळे शहराबाहेरील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा सर्वच दिशांना मेट्रोचे जाळे विस्तारले जात असल्याने पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल.
गेल्या वर्षभरात पुणेकरांनी मेट्रोला दिलेली पसंती आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. 2025-26 या वर्षात सुमारे 7 कोटी 8 लक्ष नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. दररोज सरासरी 2 लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत असून, येत्या वर्षभरात ही संख्या 3 लाखांवर नेण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे. वनाज ते रामवाडी या मार्गावर सर्वाधिक म्हणजे 60 टक्के प्रवासी वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, डिजिटल युगात पुणेकर मागे नसून सुमारे 25 टक्के प्रवासी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिकीट काढत आहेत, अशी माहिती हार्डीकर यांनी दिली.
शहरातील मेट्रो जाळे विस्तारण्यासाठी विविध टप्प्यांवर कामे सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमधील भक्ती शक्ती चौकापर्यंतच्या विस्तारीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, डिसेंबर 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच पुणेकरांची प्रतिक्षा असलेल्या स्वारगेट ते कात्रज या दक्षिण विस्ताराचे काम 2029 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस महामेट्रोने व्यक्त केला आहे. वनाज ते चांदणी चौक या मार्गाचे कामही येत्या 3 ते 4 वर्षांत पूर्ण होईल, अशी चिन्हे आहेत. या सर्व प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाला गती देण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे मेट्रोच्या संदर्भात सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे आता प्रवाशांना तिन्ही मेट्रो मार्ग बदलणे एकाच ठिकाणी शक्य होणार आहे. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन हे मध्यवर्ती केंद्र (जंक्शन) म्हणून विकसित केले जात आहे. यामुळे प्रवाशांना लाईन 1, लाईन 2 किंवा लाईन 3 यांपैकी कोणत्याही मार्गावर जायचे असल्यास सिव्हिल कोर्ट येथे मेट्रो बदलता येईल.विशेष म्हणजे, तिन्ही लाईनवर प्रवासासाठी एकच 'क्यूआर कोड' आधारित तिकीट चालेल, यासाठी महामेट्रोचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे प्रवाशांना वारंवार तिकीट काढण्याच्या कटकटीतून मुक्ती मिळणार आहे.
महामेट्रोने शिवाजीनगर ते येवलेवाडी दरम्यान मेट्रो मार्गिका विस्ताराचा एक महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला असून, या प्रकल्पामुळे दक्षिण पुण्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. सुमारे 20 किलोमीटर लांबीचा हा मेगा प्लॅन तयार झाला असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास केवळ वेगवानच होणार नाही, तर तो अधिक सुखकरही होणार आहे. कोंढवा, येवलेवाडी आणि उंड्री यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांतील वाहतूक कोंडीतून आता लवकरच कायमची सुटका होणार आहे. महामेट्रोच्या या नवीन प्रस्तावानुसार, शिवाजीनगर ते येवलेवाडी दरम्यान साधारण 20 किलोमीटर लांबीची उन्नत म्हणजेच इलेव्हेटेड मेट्रो मार्गिका उभारली जाणार आहे. सध्या या भागातील नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा प्रस्तावित विस्तार म्हणजे केवळ एक स्वतंत्र मार्ग नसून, तो हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचा पुढचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच PPP तत्त्वावर साकारला जात आहे. आता या मार्गिकेला पुढे नेऊन थेट दक्षिण पुण्याशी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे, शिवाजीनगर ते येवलेवाडी या दरम्यानची ही मेट्रो मार्गिका कॅम्प आणि पुलगेट मार्गे जाणार आहे. यामुळे शहराचा जुना मध्यवर्ती भाग आणि दक्षिणेकडील उपनगरे एकमेकांना थेट जोडली जातील.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.