तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतामधील संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करणार - मुख्यमंत्री फडणवीस
xtreme2day
14-02-2026 20:34:21
2581471
तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतामधील संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करणार - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतादरम्यान २०१३ मध्ये झालेल्या सहकार्याच्या सामंजस्य कराराचे २०२३ मध्ये नूतनीकरण करण्यात आले असून या दरम्यान दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय देवाणघेवाण झाली आहे. आपण दोन वेळच्या जपान दौऱ्यात वाकायामा आणि #कोयासन येथे भेट दिली. कोयासन विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक आहे. जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारताशी मैत्री अधिक दृढ केली. त्यांच्या कार्यकाळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले. मुंबईत ४० कि.मी. लांबीची भूमिगत मेट्रो, २२ कि.मी. लांबीचा देशातील सर्वात मोठा समुद्री पूल उभारण्यात आला. नागपुरात बामियान येथील गौतम बुद्धांच्या पुतळ्याची प्रतिकृती उभी करण्याबाबत राज्यपालांना प्रस्ताव दिला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आणि वाकायामा दरम्यान कराराचे २०२८ मध्ये नूतनीकरण करून नवनवीन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस आहे. ‘वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’. महाराष्ट्र-वाकायामा मधील संबंध नव्या उंचीवर जातील. ठाणे येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) च्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमातून उद्योग आणि आर्थिक सहकार्याला चालना मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जपानला भेट द्यावी असे वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी सांगितले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.