पुण्यातील खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला हा नवा भाग मेट्रोनं जोडणार; केंद्र सरकारने दिली मान्यता
xtreme2day
27-12-2025 19:19:40
53052918
पुण्यातील खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला हा नवा भाग मेट्रोनं जोडणार; केंद्र सरकारने दिली मान्यता
पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-2 ला मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण मंजुरीमुळे पुणे शहराचे मेट्रो नेटवर्क 100 किलोमीटरच्या पुढे जाईल, ज्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येसाठी हा प्रकल्प विकासाची नवी दिशा ठरणार आहे.
या फेज-2 मध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या मार्गांना मान्यता मिळाली आहे. लाईन 4 हा मार्ग खराडी – हडपसर – स्वारगेट ते खडकवासला असा असेल. आणि लाईन 4A हा मार्ग नळस्टॉप – वॉरजे ते माणिक बाग यांना जोडेल. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 31.636 किमी असून, यावर एकूण 28 एलिव्हेटेड स्थानके विकसित केली जाणार आहेत.
दोन्ही प्रकल्पाचा अंदाजित खर्च तब्बल 9,857.85 कोटी रुपये आहे. हा निधी केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार आणि बाह्य निधी संस्था यांच्या संयुक्त योगदानातून उभारला जाईल. प्रकल्पाचा कालावधी 5 वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे. पुणे मेट्रोचा फेज-२ शहरातील मुख्य भागांना जोडणारा 'गेम चेंजर' ठरणार आहे. खराडी येथील मोठे IT हब, हडपसर येथील औद्योगिक पट्टा आणि महत्त्वाचे स्वारगेट जंक्शन आता सरळ मेट्रो कनेक्टिव्हिटीने जोडले जातील. हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या CMP (Comprehensive Mobility Plan) चा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच या नव्या मार्गांमुळे शहरातील सध्याची लाईन 1 आणि लाईन 2 शी जोडणी होणार आहे. यामुळे पुणे शहरात मल्टिमोडल नेटवर्क अधिक सुलभ होईल, म्हणजेच मेट्रो, रेल्वे आणि बससेवा एकमेकांना जोडल्या जातील. भविष्यात या मार्गांचा लोणी काळभोर आणि सासवड पर्यंत विस्तार होण्याचीही शक्यता आहे.
याशिवाय पुणे मेट्रो लाईन 3 (हिंजवडी-शिवाजीनगर कॉरिडॉर) आता बाणेरपर्यंत विस्तारित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूककोंडीतून प्रवास करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांचा आणि सामान्य नागरिकांचा प्रवास अतिशय सुखकर होणार आहे. पुण्यातील आयटी हब आणि मध्य शहर यांना जोडणाऱ्या 'हिंजवडी- शिवाजीनगर- विठ्ठलवाडी' मेट्रो कॉरिडॉरच्या प्रवाशांसाठी या मार्गाचा फायदा होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग आता बाणेरपर्यंत विस्तारित होणार आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.