xtreme2day 30-10-2025 22:26:25 895803889
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी एक पाऊल पुढे टाकलं; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना, अध्यादेश निघाला मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसह प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडत आहे. ही बैठक पूर्ण होण्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना केली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी स्वत: मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी असणार आहेत. या समितीने येत्या 6 महिन्यात शेतकरी कर्जमाफीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफीसाठी ही समिती सरकारला शिफारसी सुचवणार असल्याची माहिती आहे. या समितीच्या स्थापनेबाबतचा जीआर समोर आला आहे. एकूण 9 जणांची ही समिती आहे. या समितीत विविध बँकांचे सदस्य आहेत. अल्पकालीन आणि दीर्घकालीन शिफारशी सुचविण्याचे काम समिती करणार आहे. समितीत महसूल, वित्त, कृषी, सहकार आणि पणन या विभागांचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबईचे अध्यक्ष तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी या समितीत सामील आहेत.
tagsm4
yo1o3p