xtreme2day 01-07-2025 19:19:51 7788667
महाराष्ट्र राज्याचे 49 वे सचिव म्हणून राजेश कुमार यांनी स्वीकारला पदभार मुबंई (मंत्रालय प्रतिनिधी) - राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. आपल्या मुख्य सचिवपदाच्या कालावधीत सर्व विभागांच्या सचिवांच्या सहकार्याने सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करण्याला प्राधान्य दिले जाईल. लोकांची कामे त्या-त्या ठिकाणीच व्हावीत, त्यांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व क्षेत्रांमध्ये प्रगत असलेल्या महाराष्ट्राला अधिक उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कामाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा मुख्य सचिव पदाची सुत्रे हाती घेऊन त्यांनी व्यक्त केली. मुख्य सचिव राजेश कुमार (IAS 1988) यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे ४९ वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रशासकीय अधिकारी तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने सौनिक यांचा तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल, पुप्षगुच्छ, मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांचे शाल, पुप्षगुच्छ, देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक, राजेश कुमार यांच्या पत्नी श्रीमती अर्चना राजेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते.