Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मंत्रालय

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु

xtreme2day   05-03-2025 20:34:38   33895168

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अर्जप्रक्रिया सुरु

 

पुणे (मंत्रालय प्रतिनिधी) - भारतातील युवा वर्गाला आंतरवासितेच्या (इंटर्नशीप) माध्यमातून रोजगारक्षम बनण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गतवर्षीपासून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री इंटर्नशीप  योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर १२ मार्च २०२५ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

गतवर्षी ऑक्टोबर २०२४ मधील सदर योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एचडीएफसी बँक, आयशर, एनटीपीसी, मारुती सुझकी, आयसीआयसीआय बँक, पावरग्रीड, मणप्पुरम फायनान्स लिमिटेड, मुथूट फायनान्स, ज्युबिलन्ट अॅग्री अॅन्ड कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, इंडियन ऑइल, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशा भारतातील विविध मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. याद्वारे एक लाखाहून अधिक इंटर्नशीपच्या संधी उमेदवारांना उपलब्ध आहेत.

 

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेचा लाभ घेण्याकरिता कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाहून कमी असणारे २१ ते २४ वयोगटातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. तथापि, पदव्युत्तर पदवीधारक, सध्या पूर्णवेळ शिक्षण घेणारे, कौशल्य प्रशिक्षण, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशीप) प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशीप) प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेले अथवा नोकरी करणारे उमेदवार याकरिता पात्र असणार नाहीत. 

 

उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन कमाल ३ कंपन्यांमधील इंटर्नशीपकरिता अर्ज सादर करावा. पात्र उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये १२ महिन्यांच्या इंटर्नशीपची संधी उपलब्ध होणार आहे. याकरिता प्रशिक्षणार्थींना दरमहा ५ हजार रुपये आर्थिक साहाय्य तसेच ६ हजार रुपये एकरकमी प्रदान करण्यात येणार आहेत.

 

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी कळविले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती