जीवनाला दिशा देण्याचे काम माहिती व जनसंपर्क विभागाने केले- डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर
xtreme2day
31-07-2024 20:13:55
1988203
जीवनाला दिशा देण्याचे काम माहिती व जनसंपर्क विभागाने केले -डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर
उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार
पुणे (प्रतिनिधी) - आयुष्याला दिशा देण्यात माहिती व जनसंपर्क विभागाचा सर्वात मोठा वाटा असून महासंचालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गेल्या २६ वर्षाच्या कालावधीत स्नेह आणि जीवनातील समाधान दिले, असे भावपूर्ण उद्गार पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी काढले.
गेल्या २६ वर्षाच्या शासकीय सेवेनंतर आज डॉ. पाटोदकर सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याच्या निमित्ताने आयोजित सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, संशोधन अधिकारी मयुरा पाटोदकर, डॉ. प्रताप पाटील, श्री. शाम टेकाळे, सहायक संचालक श्री. जयंत कर्पे, पत्रकार श्री. गोविंद देशपांडे,शब्बीर शेख, डॉ. पाटोदकर यांची कन्या प्रत्यूषा तसेच कुटूंबीय, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क विभागात काम करताना विशेषत: क्षेत्रीय स्तरावर काम करताना राज्यातील माध्यम प्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे सांगून डॉ. पाटोदकर म्हणाले, शासकीय सेवेत वर्ग १ ते वर्ग ४ हे सर्वच शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असतात व शासकीय कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होतात. प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेऊन काम केल्यास कोणतीही अडचण येत नाही. उपसंचालक म्हणून काम करताना सर्वांचा कुटुंबप्रमुख म्हणून काम करत सर्वांनाच समान न्याय देण्याचा प्रयत्न केला.
जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर अनेकांचे सहकार्य लाभले, या सर्वांमुळे शासकीय सेवेत चांगले काम करता आले. सर्वांचा हा स्नेह पुढील जीवनात नवी ऊर्जा देण्याचे कार्य करेल, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. पाटोदकर यांनी १९९५ पासूनचे अनुभव सांगून त्यांच्या आयुष्यात सहकार्य लाभलेल्या प्रत्येक अधिकारी, सहकारी यांचे आभार मानले. कार्यक्रमात कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार यांनी मनोगत व्यक्त केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.