Xtreme Today 24-11-2026 18:46:22 416372473
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस करण्यात येत असल्याची माहिती आहे.भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल सादर करण्यात आला आहे. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना 7 ते 10 वर्षांच्या कारावासाची शिफारस करण्यात आली आहे. किमान 10 कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवली आहे. यात अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षे कारावास आणि 50 लाखांपर्यंत दंड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना 5 कोटींपर्यंत दंड आणि 8 वर्षांसाठी बंदी घालण्याची तसेच परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. परीक्षा गैरप्रकारांचे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. उत्तर तालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास हरकतीसाठी भरलेले शुल्कही परत मिळणार आहे. दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. उमेदवारांसाठी आधार किंवा MahaID द्वारे एकदाच नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस देखील केली आहे. परीक्षा प्रक्रियेत मोठे प्रशासकीय बदल सुचवले आहेत. तसेच यासोबतच रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी Integrated Requisition Portal विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे, जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (Venue Bank) तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या निवडी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस देखील केली आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्यासाठी 4 सप्टेंबर 2026 रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचा दुसरा अहवाल 23 नोव्हेंबर 2026 रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे. या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत.