श्रीक्षेत्रअयोध्येत दीपावलीनिमित्त दहाव्या दीपोत्सवाचा भव्य सोहळा; 56 घाटावर 30 लाखांहून अधिक पणत्यानी झाली उजळण !
Xtreme Today
07-11-2026 20:31:31
671294032
श्रीक्षेत्रअयोध्येत दीपावलीनिमित्त दहाव्या दीपोत्सवाचा भव्य सोहळा; 56 घाटावर 30 लाखांहून अधिक पणत्यानी झाली उजळण !
अयोध्या, उत्तर प्रदेश (आलोक पांडे आणि टीम) : दीपावलीनिमित्त अयोध्या नगरीत शनिवारी लाखो मातीच्या पणत्यांनी दीपोत्सवाचा झगमगाट पाहायला मिळाला. दहाव्या दीपोत्सवाचे औचित्य साधून सरयू नदीच्या काठावरील ५६ घाटांवर ३० लाखांहून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या आहेत.
या भव्य सोहळ्याच्या माध्यमातून अयोध्येचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा सादर करण्यात आला. पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेल्या घाटांवर भक्ती आणि परंपरेचे मनोहारी दर्शन घडले. त्यामुळे श्री अयोध्याधामच्या आध्यात्मिक वैभवात आणखी भर पडली.
पवित्र अयोध्यानगरीत आज दहाव्या दीपोत्सवाचा भव्य सोहळा साजरा होत आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांचे पूजन करून आरती केली.
यापूर्वी उपराष्ट्रपतींचे अयोध्याधाम येथील महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
सकाळी साकेत महाविद्यालयापासून पारंपरिक नृत्य आणि संगीताच्या सादरीकरणासह आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. दीपोत्सवाचे मुख्य केंद्र असलेल्या राम की पैडी येथे ३५ हजारांहून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने ३० लाखांपेक्षा जास्त मातीच्या पणत्या मांडण्यात आल्या आहेत. शनिवारी पहाटेपासूनच पणत्यांमध्ये तेल भरणे आणि त्यामध्ये वाती ठेवण्याचे काम सुरू झाले होते.
श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरातही एक लाख मातीच्या पणत्या प्रज्वलित करून मंदिर परिसर उजळून टाकण्यात येणार आहे. या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह आकर्षक प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा भव्य दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी घाटांवर गर्दी केली.
रामायणातील महत्त्वपूर्ण प्रसंगांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमही कलाकारांनी सादर केले. देखण्या रंगमंचीय सादरीकरणातून रामायणातील प्रमुख प्रसंग जिवंत करण्यात आले.
दहाव्या दीपोत्सवासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक संत-महंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती या सोहळ्यात सहभागी झाल्या.
अयोध्या ही केवळ स्मार्ट सिटी किंवा सोलर सिटी नसून आध्यात्मिक नगरी – उपराष्ट्रपती राधाकृष्णन
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, "दीर्घ कालावधीनंतर एका संताच्या हाती राज्याचे मुख्यमंत्रीपद आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य कुटुंबातून आलेले असून त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे. गेल्या १२ वर्षांपासून ते अत्यंत उत्तम पद्धतीने देशाचे नेतृत्व करीत आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या ही केवळ स्मार्ट सिटी किंवा सोलर सिटी नसून आध्यात्मिक नगरी असल्याचे सांगितले. आज मंदिरात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतल्यानंतर मला अभिमान वाटतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनले आहे."
रामभक्तांवर गोळीबार करणाऱ्यांनी अयोध्येत येण्यापूर्वी माफी मागावी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांचे पूजन व आरती केल्यानंतर रामकथा पार्क येथे आयोजित भव्य सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या नगरीच्या परिवर्तनाचा आढावा घेतला. अनेक शतकांच्या संघर्षानंतर अयोध्येत आज सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
रामजन्मभूमी आंदोलनातील अनेक दशकांच्या संघर्षाची आठवण करून देताना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी कारसेवक आणि संत-महंतांच्या ऐतिहासिक बलिदानाचा उल्लेख केला. यापूर्वी या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "पूर्वी अयोध्येत विमानतळ उभारणेही शक्य झाले नव्हते. आज अयोध्येत महर्षी वाल्मीकी यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहिले आहे.
आज मी येथे तुम्हाला एक आश्वासन देण्यासाठी आलो आहे. ज्यांनी पूर्वी आपली उपेक्षा केली, अपमान केला, प्रभू श्रीरामांच्या भक्तांवर गोळीबार केला आणि संत-महंतांचा अपमान करून त्यांच्यावर लाठीमार केला, अशा लोकांनी भविष्यात अयोध्येत यायचे असेल तर सर्वप्रथम माफी मागूनच यावे. त्यांनी प्रभू श्रीरामांच्या भक्तांची आणि संत-महंतांची माफी मागावी. आपल्या पूर्वीच्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप व्यक्त करावा."
६ नोव्हेंबरपासून पाच दिवस दीपावलीचा उत्सव
यंदाच्या पाच दिवसीय दीपावली उत्सवाला ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीपासून सुरुवात झाली. ७ नोव्हेंबर रोजी छोटी दिवाळी साजरी करण्यात आली. ८ नोव्हेंबर रोजी मुख्य दीपावली उत्सव आणि लक्ष्मीपूजन होणार आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा, तर १० नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.