Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित नागरिकांना मदत करण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला आता सामाजिक सहभागाचे बळ

Xtreme Today   03-11-2026 20:06:44   18093450

महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित नागरिकांना मदत करण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला आता सामाजिक सहभागाचे बळ 

 

  मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित नागरिकांना मदत करण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला आता सामाजिक सहभागाचे बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. कंपन्या, संस्था, देणगीदार आणि इतर सामाजिक घटकांच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारून तो गरजू रुग्णांसह विविध आपत्तींत बाधित नागरिकांच्या मदतीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे महागड्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना अधिक आर्थिक मदत देण्याबरोबरच दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीतही मदतीचा हात पुढे करता येणार आहे.

 

   या नव्या व्यवस्थेमुळे हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडविकार, मेंदूविकार यांसह विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया, महागडे आणि दीर्घकालीन उपचारांसाठी अधिक मदत उपलब्ध करून देता येणार आहे. गरजेनुसार औषधे, वैद्यकीय साहित्य आणि उपचारासाठी आवश्यक इतर बाबींसाठीही मदत करता येणार आहे. दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठीही या माध्यमातून विशेष मदत उभारता येणार आहे.

 

  मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या आढावा बैठकीत रुग्णांच्या उपचारासाठी सामाजिक दायित्वातून अतिरिक्त निधी उभारण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार, ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून कंपन्या, संस्था आणि देणगीदारांच्या सहभागातून उभारलेला निधी गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरता येणार आहे. रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, कंपन्या आणि सामाजिक संस्थांना गरजेनुसार एकत्र आणून विविध वैद्यकीय मदतीचे उपक्रमही राबविता येणार आहेत.

 

  बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करता येणार आहे. गरीब नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वितरण, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांना सहाय्य आणि सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजनही करता येणार आहे. आरोग्य जनजागृती, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित उपक्रमांनाही या माध्यमातून मदत करता येणार आहे.

 

  सामाजिक सहभागातून अधिक संसाधने उभारून गरजू रुग्ण आणि आपत्तीग्रस्त नागरिकांपर्यंत मदत पोहोचविणे हा या सोसायटीचा व्यापक उद्देश आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती असो किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती, अशा संकटांच्या काळात सामाजिक संस्थांच्या सहभागातून मदतीचे उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. गरजेनुसार विविध मदतीचे उपक्रम राबविता येणार असल्याने भविष्यात मदतीची व्याप्ती वाढविता येणार आहे.

 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या नव्या व्यवस्थेमुळे गरजू रुग्ण आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीचा आणखी एक आधार उपलब्ध होणार आहे. कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या लोकसहभागातून अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचविता येणार आहे. या उपक्रमासाठी दात्यांनी पुढे येऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती