Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाध्वजारोहण; तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर आतील कुशावर्ते येथे झाले ध्वजारोहण

Xtreme Today   31-10-2026 19:12:33   682599765

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  महाध्वजारोहण; तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर आतील कुशावर्ते येथे झाले ध्वजारोहण

 

— दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

आज दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांनी गुरू ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे !


आज ३१ ॲाक्टोबर २०२६ पासून 

त्र्यंबकेश्वर- नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा !

 *************************************

  

 गुरू ग्रह ज्या काळात सिंह सिंह राशीत असतो त्या काळामध्ये त्र्यंबकेश्वर- नाशिकमध्ये ‘ सिंहस्थ कुंभमेळा ‘ भरत असतो. यावेळी गुरू ग्रह वक्री-मार्गी झाल्यामुळे तीन वेळा गुरू ग्रह सिंह राशीत राहणार आहे. म्हणून यावेळी ‘ त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा ‘ भरणार आहे.

                 कुंभमेळ्याविषयी एक कथा सांगितली जाते. जेव्हा देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून धन्वंतरी हातात अमृत कुंभ घेऊन बाहेर आले. जो कोणी अमृत प्राशन करील तो अमर होणार होता. अमृत कुंभ दानवांच्या हाती लागू नये म्हणून देवांनी इंद्रपुत्र जयंत यास अमृत कुंभ पळवून नेण्यास खूण केली. जयंत धन्वंतरींच्या हातातून अमृत कुंभ घेऊन पळाला. मग देव- दानवांनी बारा दिवस आणि बारा रात्री युद्ध केले. या युध्दकाळात पृथ्वीवर चार ठिकाणी अमृत कुंभातून अमृताचे थेंब पडले. ती चार ठिकाणे म्हणजे प्रयागराजक्षेत्री गंगा-यमुना- सरस्वती त्रिवेणी संगम, नाशिक- त्र्यंबकेश्वरक्षेत्री गोदावरी,हरिद्वारक्षेत्री गंगा आणि उज्जैनक्षेत्री क्षिप्रा या नद्या होत. अमृतकुंभाचे रक्षण करण्यासाठी जयंतास गुरू, चंद्र आणि सूर्य यांनी मदत केली.

    बारा वर्षात गुरू- सूर्य ज्या राशीत असतांना ज्याक्षेत्री अमृताचे थेंब पडले त्या राशीत गुरू- सूर्य आले असतांना त्त्या त्या क्षेत्री कुंभमेळा भरतो. कुंभमेळा सुरू असता त्या नदीत स्नान केले तर ते अमृतस्नान समजले जाते. त्यामुळे पापक्षालन होते अशी श्रद्धा असते. याज्ञवल्क्य ऋषींनी म्हटले आहे की नदीस्नानाने आपल्याहातून नकळत घडलेले पापच जाते. कळत घडलेले पाप जात नाही. साधू, संत ,संन्यासी श्रद्धाळू भाविक मोठ्या संख्येने कुंभमेळ्यामध्ये नदीस्नान करण्यासाठी येत असतात. 

   गुरू ग्रह वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असतांना गंगा-यमुना-सरस्वती त्रिवेणी संगमावर प्रयाग क्षेत्री कुंभमेळा भरतो.यावेळी माघ महिना असेल तर तो महाकुंभमेळा समजला जातो. मकर संक्रांती, अमावास्या, वसंत पंचमी, महाशिवरात्र या दिवशीचे नदीस्नान महापुण्यकारक समजले जाते. यानंतर २०३६-३७ला असा योग येणार आहे.

                  ******************************************

     गुरू ग्रह सिंह राशीत आणि सूर्य कर्क- सिंह राशीत असताना गोदावरीकाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्री सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ३१ ॲाक्टोबर २०२६( आश्विन कृ. ६ शके १९४८ ) ते २४ जानेवारी २०२७( पौष कृ. २ शके १९४८) , २५ जून २०२७ ( ज्येष्ठ कृ. ६ शके १९४९ ) ते २६ नोव्हेंबर २०२७ ( कार्तिक कृ. १३ शके १९४९ ), २८ फेब्रुवारील२०२८( फाल्गुन शु. ३ शके १९४९ ) ते २४ जुलै २०२८ ( श्रावण शु.३ शके १९५० ) या कालात नाशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्री सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. वक्री-मार्गी गतीमुळे गुरू ग्रह तीन वेळा सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याला ‘ त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा ‘ असे म्हणतात.

              गुरू ग्रह सिंह राशीत सूर्य मेषेला असता क्षिप्राकाठी उज्जैन क्षेत्री कुंभमेळा भरतो. वैशाख पौर्णिमा ही महत्त्वाची मानली जाते. यानंतर १३ एप्रिल २०२८ ते १४ मे २०२८ उज्जैन क्षेत्री कुंभमेळा भरणार आहे.

 गुरू ग्रह कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असता गंगानदीकाठी हरिद्वार क्षेत्री कुंभमेळा भरतो. यानंतर १३ एप्रिल २०३३ ते १३ मे २०३३ हरिद्वार क्षेत्री कुंभमेळा भरणार आहे. सर्वसाधारणपणे बारा वर्षांनी पुन्हा त्याच राशीत गुरू ग्रह आल्याने त्याच ठिकाणी पुन्हा कुंभमेळा भरत असतो. 

                  *****************************************

त्र्यंबकेश्वर- नाशिक सिंहस्थ कुंभमेळा

    या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ३१ जुलै २००३ ते २७ ॲागस्ट २००४ आणि १४ जुलै २०१५ ते ११ ॲागस्ट २०१६ या कालात गुरू ग्रह सिंह राशीत आल्याने त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरला होता. आता यावेळच्या त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर ७ ॲाक्टोबर २०३८ ते ४ मार्च २०३९, २ जून २०३९ ते ४ नोव्हेंबर २०३९ आणि ६ एप्रिल २०४० ते २९ जून २०४० या कालात गुरू ग्रह सिंह राशीत आल्याने पुन्हा त्र्यंबकेश्वर- नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे, तोही त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे. 

              सिंहस्थ कुंभपर्व कालात गोदावरी नदीमध्ये स्नान केले असता पुण्य प्राप्त होते असे प्राचीन ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. म्हणून लाखो भाविक सिंहस्थ कुंभपर्वकालात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी त्र्यंबकेश्वर- नाशिक येथे येत असतात. तसेच विशिष्ट दिवशी अमृतस्नान ( शाहीस्नान ) केल्याने विशेष पुण्यप्राप्त होते अशी श्रद्धा आहे. 

               ध्वजारोहण— सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ शनिवार ३१ ॲाक्टोबर २०२६ ( आश्विन कृष्ण ६ शके १९४८ ) रोजी दुपारी १२-०२ वाजता होणार आहे. (१) प्रथम अमृत स्नान सोमवार २ ॲागस्ट २०२७ ( आषाढ सोमवती अमावास्या शके १९४९ ) रोजी होणार आहे. (२) द्वितीय अमृत स्नान मंगळवार ३१ ॲागस्ट २०२७ ( श्रावण अमावास्या शके १९४९ ) रोजी होणार आहे. (३) तृतीय अमृत स्नान शनिवार ११ सप्टेंबर २०२७ ( भाद्रपद शुक्ल परिवर्तिनी एकादशी शके १९४९ ) रोजी होणार आहे. (४) सिंहस्थ समाप्ती सोमवार २४ जुलै २०२८ ( श्रावण शुक्ल तृतीया शके १९५० ) रोजी होणार आहे. 

        सन २०२६ — अमृत स्नानाचे काही दिवस

       (१) ३१ ॲाक्टोबर २०२६, शनिवार, आश्विन कृ. ६ दुपारी १२-०२ ध्वजारोहण,सिंहस्थ प्रारंभ.

       (२) ५ नोव्हेंबर २०२६ , गुरुवार, आश्विन कृ.११ रमा एकादशी .

       (३) २० नोव्हेंबर २०२६, शुक्रवार , कार्तिक शु. ११ प्रबोधिनी स्मार्त एकादशी.

       (४) २१ नोव्हेंबर २०२६, शनिवार , कार्तिक शु. १२ प्रबोधिनी भागवत एकादशी.

       (५) २३ नोव्हेंबर २०२६, सोमवार, कार्तिक शु. १४ वैकुंठ चतुर्दशी.

       (६) २४ नोव्हेंबर २०२६, मंगळवार, कार्तिक पौर्णिमा त्रिपुराची पौर्णिमा.

       (७) ४ डिसेंबर २०२६, शुक्रवार, कार्तिक कृ. ११ उत्पत्ती एकादशी .

       (८) १५ डिसेंबर २०२६, मंगळवार, मार्गशीर्ष शु.६ चंपाषष्ठी.

       (९) २० डिसेंबर २०२६, रविवार, मार्गशीर्ष शु. ११ मोक्षदा एकादशी.

      तसेच पौर्णिमा, अमावास्या, व्यतिपातयोग, वैधृतीयोग हे दिवस सुद्धा अमृतस्नानासाठी योग्य आहेत.

                                 ********************************

 

                        त्र्यंबकेश्वर माहात्म्य

            सिंहस्थे तु समायाते नद्यस्तीर्थानि देवता:।

            तीर्थ राजे कुशावर्ते स्नातुमायांसि यत्नत: ॥

             त्र्यंबकक्षेत्रमेवात: सिंहस्थेतु विशिष्यते ।

             यंत्र गोदा समुद्भूता सर्व पाप प्रणाशिनी॥

         पुराणात गोदावरी नदीच्या उगमस्थानाचे महत्त्व वर्णन केले आहे. गौतमी गंगेस गोदा ही संज्ञा त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावरच प्राप्त झाली.’ गोदा’ म्हणजे गौतमस्य गां जीवनम् ददाति इति गोदा । गौतम ऋषींच्या गायीस जीवदान मिळून गौतम ऋषींना गोहत्येच्या पातकापासून जिने मुक्त केले, असा त्याचा अर्थ आहे. गौतम ऋषींनी ज्या कुशावर्त तीर्थात स्नान केले ते कुशावर्त तीर्थराज त्र्यंबकेश्वरीच आहे. भगवान गौतम ऋषींनी पवित्र दर्भांनी गंगेचा ओघ अडवून स्नान केले म्हणून यास ‘ कुशावर्त ‘ असे म्हणतात. त्र्यंबकेश्वर हे द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक जागृत स्थान आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांनी महर्षी कश्यपांनी सांगितल्याप्रमाणे श्राद्धादिक कर्म, स्नान त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे केले होते. अनेक शैवपंथीय साधू संत सिंहस्थकालात त्र्यंबकेश्वर येथे येऊन अमृतस्नान करीत असतात.

                            ********************************************

                   नाशिक माहात्म्य

      नासिकं च प्रयागं च नैमिषं पुष्करं तथा ।

       पंचमं च गया क्षेत्रं षष्ठं क्षेत्र न विद्यते ॥

       ब्रह्मांड पुराणामध्ये नासिक, प्रयाग, पुष्कर, नैमिष आणि गया ही पाच प्रमुख तीर्थक्षेत्रे सांगितली आहेत. गोदावरी नदी तीरावर श्री सिंहस्थ तीर्थक्षेत्र नासिक चार युगांपासून विराजमान आहे. या तीर्थक्षेत्राला कृतयुगामध्ये पद्मनगर, त्रेतायुगामध्ये त्रिकंटक, द्वापारयुगामध्ये जनस्थान आणि कलियुगामध्ये नासिक या नावाने प्रसिद्ध आहे. 

       षष्ठी वर्ष सहस्त्राणि भागिरथ्यवगाहनम् ।

       सकृतगोदावरी स्थानं सिंहस्थेच बृहस्पतौ ॥ ( पद्मपुराण)

        — साठ हजार वर्ष भागीरथी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जे पुण्य फल प्राप्त होईल तेवढे संपूर्ण पुण्य फल सिंहस्थ कालामध्ये श्रीगोदावरी नदीमध्ये एकदा स्नान केल्याने प्राप्त होते असे पद्मपुराणामध्ये सांगितले आहे. 

अनेक वैष्णवपंथीय साधू संत सिंहस्थ कालामध्ये नासिक रामघाटावर येऊन अमृतस्नान करीत असतात.

                          ************************************************

                             अध्यात्मशास्त्र

               अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मा या विषयाचे शास्त्र ! अध्यात्म म्हणजे आत्म्यालिषयी ज्ञान ! शं.वा. दांडेकर यांनी अध्यात्मशास्त्राची व्याख्या ‘ अंतिम सत्य शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेले अनुभवाचे मंथन ‘ अशी केली आहे. नित्य आणि अनित्य काय हे शोधून काढण्याच्या दृष्टीने जे शास्त्र त्यांकडे बघते ते अध्यात्मशास्त्र होय. अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मज्ञानाचे शास्त्र होय. उपनिषदे हे अध्यात्मज्ञानाचे भांडारच आहे. सर्व विश्वाला व्यापणारे अव्यक्त अविनाशी तत्त्व कोणते , त्याचा विचार करणे आणि त्या अव्यक्तातून उगम पावणा-या व त्यातच पुन्हा विलीन होणा-या चराचर विश्वाचे ज्ञान करून घेणे याला वेदान्तामध्ये अध्यात्मशास्त्र म्हणतात. ईश्वर- चैतन्य-परब्रह्म स्वरूपाची ओळख करून घेणे हे अध्यात्मशास्त्राचे परमोच्च ध्येय होय. विवेक, वैराग्य, शमादिषट्क आणि मुमुक्षत्व ही चार तत्त्वे ज्यांच्या अंगी आहेत तेच अध्यात्मशास्त्राचे अधिकारी आहेत. संत महंत हीच साधना करीत असतात. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गोदावरी स्नानासाठी त्र्यंबकेश्वर- नासिकक्षेत्री येत असतात.

                          भक्ती आणि श्रद्धा

                  दरवर्षी कुंभमेळ्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी लोक भक्ती आणि श्रद्धेने येत असतात. 

भज् म्हणजे सेवायाम् म्हणजेच भगवंताची सेवा करणे होय. ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्टेचा अनुराग , प्रेम म्हणजे भक्ती ! मनाची वृत्ती आध्यात्मिक साधनेने द्रवीभूत होऊन ईश्वराकडे प्रवाहित होणे म्हणजे भक्ती करणे असेही सांगितले जाते. भक्ती ही साधनरूप नसून साध्य आहे, ती आनंदरूप आहे हे सर्व प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. श्रद्धा हा एक मानसिक गुण आहे. श्रत् सत्यम्। तत् सत्यम् अस्यां धीयते सा श्रद्धा ॥ श्रत् म्हणजे सत्य ! जिच्यात सत्य ठेवले आहे ती श्रद्धा ! भगवत् गीतेत म्हटले आहे की ‘ ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो घडत असतो. श्रद्धा मन:स्वास्थ्य टिकण्यास मदत करते. मात्र विपरीत श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा ! विचार करूनच श्रद्धा ठेवावी. ईश्वर म्हणजे चैतन्य ! ईश्वर चराचरात आहे म्हणजेच चैतन्य चराचरात आहे. हे सर्व समजून घेतले पाहिजे. श्रद्धेने लाखो लोक सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सामील होतं असतात. भक्तांचा महासागर येथे पहायला मिळत असतो.विशेष लेख -

 

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  महाध्वजारोहण; तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर आतील कुशावर्ते येथे झाले ध्वजारोहण

 

(विशेष लेख - संजय जोशी)

 

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती