Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

ज्येष्ठ पत्रकारांसाठी आर्थिक उन्नतीचा मार्ग 'एसजेए'च्या माध्यमातून विकसित होणार - श्रीकृष्ण आयाचित

Xtreme Today   25-10-2026 16:46:58   48652533

ज्येष्ठ पत्रकारांसाठी आर्थिक उन्नतीचा मार्ग 'एसजेए'च्या माध्यमातून विकसित होणार - श्रीकृष्ण आयाचित

   

'सीनिअर जर्नालिस्ट असोशिएशन'चा 

मुंबईत 'मंथन' कार्यक्रम उत्साहात   

मुंबई (प्रतिनिधी ) : ज्येष्ठ पत्रकारांच्या कल्याणासाठी आपली असोसिएशन प्रयत्नशील असली पाहिजे. त्यासाठी आर्थिक उन्नतीचे मार्ग आपणच शोधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन 'यूएनआय'चे ज्येष्ठ पत्रकार व सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनचे मुंबई प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण आयचित यांनी केले. ते बुधवारी (ता. 21) मुंबई येथे झालेल्या 'असोसिएशन' च्या  'विचार मंथन' कार्यक्रमात बोलत होते.  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते.

 

असोसिएशनचे विश्वस्त व  राष्ट्रीय उपाध्यक्ष मिलिंद वैद्य, संस्थापक विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस संजय कुमार जोशी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, असोसिएशनचे शिक्षण व विकास संचालक प्राध्यापक भूषण ओझर्डे, नवनिर्मिती व विकास संचालक शिरिष शिवणगीकर, सल्लागार ॲड.ओंकार माने, सदस्य संदीप पवार ,उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष यशवंत पावशे,  उत्तर महाराष्ट्र विभागाचे सरचिटणीस सुनील गीते, नासिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके, रायगड जिल्हा अध्यक्ष पाटील, कोकणचे उद्योजक संतोष पाटील, अहिल्यानगरचे असीफ शेख आदींनी विचार मांडले. कार्यक्रमास विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी तसेच ज्येष्ठ पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

श्री.आयाचित बोलताना म्हणाले की, " सर्व पत्रकारांच्या असंख्य अडचणी वर्षानुवर्षे आहे तशाच आहेत.  पत्रकारांना आपले आर्थिक स्रोत स्वतःच बळकट करायला हवेत.असोसिएशन त्यासाठी प्रयत्न करीत आहे, ही समाधानाची बाब आहे. प्रिंटिंग क्षेत्रातील निरनिराळ्या संधी व तत्सम विविध क्षेत्रांत असोसिएशनच्या माध्यमातून काम करता येईल."

 

 

देशस्तरावर पत्रकार कल्याण महामंडळ स्थापावे - 

 

विश्वस्त व राष्ट्रीय उपाध्यक्ष मिलिंद वैद्य यांनी पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने 'पत्रकार कल्याण महामंडळ' स्थापन केले पाहिजे, अशी मागणी आपण केली होती.  असे सांगून आपल्या असोसिएशनने या मागणीचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे सुरू केला असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, " सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन फक्त एक संघटन नाही तर, एक मोठा समाज, परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी यांच्यासाठी काम करताना सरकारी स्तरावर होणारी उपेक्षा थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्याची गरज आहे. अन्यथा 'लोकशाहीचा हा चौथा स्तंभ' इतिहास जमा होईल. केंद्र व राज्य सरकारकडे भिक नव्हे, तर हक्काने मागण्यासाठी ' राष्ट्रीय स्तरावर पत्रकार कल्याण महामंडळ असले पाहिजे. त्यावर अनुभवी ज्येष्ठ पत्रकारांची नियुक्ती केली जावी."अशी मागणीवजा सूचना त्यांनी केली.

 

 

असोसिएशनचा कारभार पारदर्शी -

 

असोसिएशनचे विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस संजयकुमार जोशी असोसिएशनच्या कामाचा आढावा घेताना म्हणाले, " ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारे आपले ट्रस्ट आहे. भारतीय स्तरावर पत्रकार इतर कर्मचाऱ्यांसाठी आपले एकमेव असोसिएशन आहे, तसेच मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि ऑनलाईन मीडिया यामध्ये बारा वर्षाचा अनुभव असलेल्या माध्यमकर्मी यांनाही असोसिएशनमध्ये सभासद करण्यात येते. पत्रकारांचा जो हक्क आहे ते अधिस्विकृती पत्र, आरोग्य विषयक प्रश्न, मुंबई व पुण्यासारख्या ठिकाणी विश्रामगृह, त्यांना स्वमालकिची घरे, देश स्तरावर सर्व राज्यातील जेष्ठ पत्रकारांना सरसकट सन्मान मानधन इत्यादी प्रश्नावर आपण काम करत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, " पत्रकारांच्या मुलांसाठी जर्नालिझम व औद्योगिक दृष्टिकोनातून कुशल प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, संगणक प्रशिक्षण आदींचे विद्यापीठ आणि इतर महत्त्वाच्या संस्थांचे कोर्सेस आपण सुरू करत आहोत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ज्येष्ठ पत्रकारांना आर्थिक स्रोत उभे करण्यासाठी अल्कलाईन वॉटर, एसबीआय लाईफ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून काही योजना पत्रकारांसाठी प्राथमिक स्थरावर राबवत आहोत. जेणेकरून ज्येष्ठ पत्रकारांचा समाजातील आणि पर्यायाने स्वतःच्या कुटुंबातील सन्मान वाढीसाठी आर्थिक दृष्टिकोनातून मोठा आधार लागू शकेल." आपल्या असोशिएनचा कारभार अत्यंत पारदर्शीपणे राखण्यासाठी सर्व स्तरावर कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

मुद्रण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय संधी - 

 

असोशिएशनचे नवनिर्मिती व विकास संचालक तथा पुणे जिल्हा सचिव शिरीष शिवणगीकर यांनी 'मुद्रण क्षेत्रातील वाढत्या आंतरराष्ट्रीय संधी' याविषयी आपला अनुभव कथन केला.  केनिया, मंगोलिया, द.अफ्रिका या सारख्या देशांमधून सरकारी माध्यमातून छपाई, मुद्रित शोधक, भाषांतरकार इत्यादी कामासाठी संधी उपलब्ध आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी अशी परदेशातील कामे चालू आहेत. आपण स्वतः देखील आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून ही कामे घेत आहोत. जेणेकरून मुद्रित क्षेत्रातील सर्व प्रकारची कामे व संधी आपल्याला उपलब्ध होतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

 

 

शैक्षणिक सुविधा लवकरच - 

 

असोशिएशनचे शिक्षण आणि विकास संचालक प्रा.भूषण ओझर्डे यांनी असोशिएशनच्या प्रस्तावित शैक्षणिक उपकमांची माहिती दिली.  ते म्हणाले, "पिंपरी चिंचवड येथील निगडी प्राधिकरण येथे हे केंद्र सुरू होत असून लवकरच सर्व अभ्यासक्रम सुरू होतील," पत्रकारांनी त्यांच्या मुलांसाठी या संधीचा लाभ घ्यावा,"असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

ग्रामीण पत्रकारितेवर  दुष्काळाचे सावट - 

 

उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष यशवंत पावशे यांनी मुद्रण पत्रकारिता संपत असल्याची खंत व्यक्त करून ती टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. "सध्या ग्रामीण भागात दुष्काळाचे गंभीर सावट असल्याने वृत्तपत्र छापणे कमी व जाहिरातींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पत्रकार अडचणीत सापडला आहे, अशा कठीण प्रसंगी ग्रामीण पत्रकारांना 'सीनिअर जर्नालिस्ट असोशिएशन' आधार वाटू लागली आहे." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

असोशिएशनचे उत्तर महाराष्ट्र सचिव सुनिल गिते यांनीही ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे पत्रकारिता अडचणीत आल्याचे सांगत सरकारने पत्रकारांसाठी कल्याण महामंडळ स्थापन करावे, या मागणीचे समर्थन केले.

 

सीनिअर जर्नालिस्ट असोशिएशनचे नासिक जिल्हाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी सदस्य संख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून नोंदणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे नमुद केले.

 

असोशिएशनच्या कोकण विभागाचे उद्योजक संतोष पाटील यांनी पत्रकारांसाठी मुंबई पुण्यासह राज्यातील पत्रकारांसाठी "अल्कलाईन वॉटर " वितरणासाठी अल्पदरात उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले.या शिवाय स्टार्टअप उद्योजकांसाठी मार्गदशन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

अनेकांनी मांडलेल्या विचारानंतर असोशिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, " जेष्ठ पत्रकारांचा सन्मान वाढावा, त्यांचे पेन्शन, अधिस्विकृती पत्र, आरोग्य विषयक प्रश्न, स्वतःची घरे, मुलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण या माध्यमातून असोशिएशन प्रयत्नशील आहे. केरळच्या धर्तीवर पत्रकारांना घरे व पेन्शन मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहेत. अल्कानईन वॉटरचे वितरक व्हावे, पत्रकारांच्या मुलांसाठी अल्पदरात हे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. मुंबई व पुण्यात संघटनेचे कार्यालय सुरु झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शैक्षणिक इन्स्टिट्यूट सुरू होत आहे. या संधीचा पत्रकारांनी लाभ घ्यावा."

 

 

 

उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर

 

सीनिअर जर्नालिस्ट असोशिएशनच्या मुंबईत महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी होणार होते. त्यासाठी राज्यातील असोशिएशनचे सदस्य पत्रकार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतू, उपमुख्यमंत्री शिंदे कार्यक्रम स्थळी पोहचत असतानाच त्यांना राष्ट्रपती भवनातून फोन आल्याने अचानक नवी दिल्लीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी जावे लागले. त्यामुळे उद्घाटनाचा हा कार्यक्रम संस्थगित करण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच सोयीस्कर पुढील तारिख देण्याबाबत असोसिएशनला कळवले आहे. 

 

सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिन 16 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा मानस होता. परंतू, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याचे होणारे हाल आदी प्रश्नांचा या विचारमंथनामध्ये मागोवा घेण्यात आल्यानंतर पुण्यातील नियोजित अधिवेशन येणाऱ्या जानेवारीत दर्पण दिनानिमित्त 6 जानेवारीला घेण्याचे निश्चित करण्यात आले.त्या संदर्भात सर्वांना स्वतंत्रपणे कळविले जाईल. तसेच राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांच्या अधीस्वीकृती आणि सन्मान मानधन या संदर्भातील प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी 16 नोव्हेंबर रोजी सांबरी, जिल्हा रायगड येथे सर्व सभासदांचा मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती