Xtreme Today 27-08-2026 19:30:56 65138808
टीव्ही.. दूरदर्शन हरलं होतं… आज मोबाईल जिंकणार का? जिंकणार कोण.. आज पालकांची एक तक्रार वारंवार ऐकू येते — “मुलांच्या हातातून मोबाईल सुटतच नाही!” पण हे पाहिलं की मला जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतो. १९८० च्या दशकाचा उत्तरार्ध. नवी मुंबईतील ऐरोली येथे आम्ही दर शनिवारी दुपारी लहान मुलांसाठी ‘साने गुरुजी कथामाला’ घेत असू. गोष्टी, खेळ आणि विविध उपक्रमांतून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेत, हा त्यामागचा उद्देश. त्या काळात टीव्ही म्हणजे फक्त ‘दूरदर्शन’. खाजगी वाहिन्यांचा जन्मही झाला नव्हता. आणि एक दिवस दूरदर्शनने घोषणा केली — दर शनिवारी दुपारी मराठी चित्रपट! नेमकी तीच वेळ आमच्या कथामालेची! पालक गोंधळले. “कथामालेची वेळ बदला,” अशी मागणी सुरू झाली. पण आम्ही वेळ बदलली नाही. उलट त्या परिस्थितीकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं — मुलांना दूरदर्शनवरील चित्रपटापेक्षाही कथामालेत यावंसं वाटलं पाहिजे! मग आम्ही आमचे उपक्रम अधिक कल्पक, अधिक जिवंत आणि अधिक मनोरंजक केले. आणि गंमत घडली. दूरदर्शनवर मराठी चित्रपट सुरू राहिले… पण मुलांची कथामालेतील उपस्थिती कमी झाली नाही. ती उत्साहाने येतच राहिली. आज मुलांच्या हातातील मोबाईल पाहिला की मला तो प्रसंग पुन्हा आठवतो. मोबाईलशी केवळ बंदी घालून लढण्याऐवजी, त्यापेक्षा अधिक आकर्षक, आनंददायी आणि अर्थपूर्ण जग आपण मुलांसमोर उभं करू शकतो का? मला वाटतं, आपल्या हिंदुत्ववादी संघटनांनीही हे एक सामाजिक आव्हान म्हणून स्वीकारायला हवं. कारण अशा उपक्रमांतून मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढतानाच त्यांच्यातून उद्याचे कार्यकर्ते आणि नेतृत्वही घडू शकते. प्रश्न मोबाईल किती शक्तिशाली आहे हा नाही; प्रश्न त्याच्यापेक्षा मुलांना अधिक आकर्षित करणारं जग उभं करण्याची ताकद आज आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे का? ©संतोष कारखानीस