Xtreme Today 10-08-2026 20:01:53 625083644
गणेशोत्सव २०२६ : पुण्यातील ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ देखावा पुणे (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने गणेशोत्सव २०२६ साठी ‘श्री गणेश सुवर्णधाम’ ही संकल्पना जाहीर केली आहे. शहराच्या मध्यवर्ती मंडई परिसरातील ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ‘श्री गणेश सुवर्णधाम’ या भव्य आणि मिस्टिक थीमचे अनावरण केले. रविवारी गणेशोत्सव मंडपात वास्तुपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, पोलीस आयुक्तालय परिमंडळ-१ चे अधिकारी श्री. रावळे यांच्यासह विविध मान्यवर आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त तथा उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या उपस्थितीत हा विधी पार पडणार आहे. यंदाचा वास्तुपूजन सोहळा क्रांती दिनाच्या औचित्यावर गणेशोत्सव मंडपात आयोजित करण्यात आला आहे. पुण्याच्या गणेशोत्सवातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ऐतिहासिक आणि मानाचे स्थान आहे. सामाजिक प्रबोधन, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे विविध उपक्रम राबवून उत्सव साजरा करण्यासाठी हे मंडळ आदर्श मानले जाते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सव २०२६ च्या संकल्पनेविषयी माहिती देताना सांगितले की, यंदाचा वास्तुपूजन सोहळा क्रांती दिनाच्या औचित्यावर होत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ‘क्रांतिकारी बाप्पा’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जगभरातील गणेशभक्त आणि बाप्पाप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ते पुढे म्हणाले की, ‘श्री गणेश सुवर्णधाम’ ही मिस्टिक संकल्पना आम्ही साकारत आहोत. धार्मिक पावित्र्य, शुद्धता आणि पारंपरिक मूल्ये जपत हा गणेशोत्सव अधिक भव्य आणि आकर्षक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. पुनीत बालन यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा उत्सव ‘नो डीजे’ पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. त्याचबरोबर पारंपरिक दहीहंडी उत्सवाचेही आयोजन करण्यात येत आहे. यंदाही पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरांना प्राधान्य देत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.