ओडिशा आणि छत्तीसगडच्या भूमीवर 'सुपर एनाकोंडा'
Xtreme Today
03-08-2026 22:51:28
15809377
ओडिशा आणि छत्तीसगडच्या भूमीवर 'सुपर एनाकोंडा'
लोखंड रुळांवरून सरकणारा एक असा महाकाय अजगर, ज्याचे तोंड एका ठिकाणी तर शेपूट तब्बल दोन किलोमीटर दूर! विचार करा, असा २ किलोमीटर लांबीचा 'सुपर एनाकोंडा' जेव्हा रुळांवरून धडाडत धावतो, तेव्हा तो दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!
भारतीय रेल्वेने ओडिशा आणि छत्तीसगडच्या भूमीवर असाच एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक चमत्कार घडवून दाखवला आहे. पण या महाकाय ट्रेनला चालवण्यामागे भारतीय अभियंत्यांनी एका अशा तांत्रिक आव्हानावर मात केली आहे, जे ऐकून तुम्हाला आपल्या देशाच्या बुद्धिमत्तेचा प्रचंड अभिमान वाटेल.
नक्की काय आहे हा 'सुपर एनाकोंडा'?
जेव्हा तीन वेगवेगळ्या मालगाड्या एकमेकांना जोडल्या जातात आणि तब्बल १७७ डबे (वैगन्स) एकाच रांगेत उभे राहतात, तेव्हा तयार होतो हा सुपर एनाकोंडा! ६ शक्तिशाली इलेक्ट्रिक इंजिने (एकूण ३६,००० हॉर्सपावर) आणि १५,००० टन कोळसा एकाच फेरीत वाहून नेण्याची क्षमता असलेली ही सुमारे २.१ किलोमीटर लांबीची ट्रेन आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) लाजबुरा ते राऊरकेला दरम्यान हा प्रयोग यशस्वीपणे पार पाडला. अमेरिका किंवा चीनसारख्या देशांत अशा लांब गाड्या चालतात, पण भारताने अत्यंत कमी खर्चात स्वदेशी तंत्रज्ञानाने हे करून दाखवले.
पण यात सर्वात मोठे आव्हान काय होते?
ट्रेन चालवताना सर्वात मोठी अडचण येते ती विजेच्या पुरवठ्याची! तुम्ही रस्त्यावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक लोकल किंवा मालगाड्या पाहिल्या असतील. ट्रेनच्या टपावर एक व्ही (V) आकाराचा लोखंडी सांगाडा असतो जो वरच्या विजेच्या तारेला स्पर्श करत चालतो. याला तांत्रिक भाषेत 'पॅन्टोग्राफ' म्हणतात. याच पॅन्टोग्राफद्वारे तारेतील वीज इंजिनमध्ये येते आणि ट्रेन धावते.
आता मूळ गंमत इथे आहे! रेल्वेच्या मुख्य विजेच्या तारेमध्ये ठिकठिकाणी थोडे अंतर असे असते जिथे वीज नसते. त्याला 'न्यूट्रल सेक्शन' म्हणतात. हे दोन वेगवेगळ्या पॉवर ग्रिड्सना जोडणारे असे काही मीटरचे क्षेत्र असते जिथे वीज नसते.
सामान्य ट्रेनमध्ये एकच इंजिन असते, त्यामुळे ड्रायव्हर त्या ठराविक जागेवरून जाताना इंजिनचा वीज पुरवठा काही सेकंदांसाठी बंद करतो आणि ट्रेन पुढे निघून जाते. पण सुपर एनाकोंडामध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल ६ इंजिने होती आणि ती संपूर्ण २ किलोमीटरच्या अंतरावर पसरलेली होती!
आता विचार करा, जर ट्रेन २ किलोमीटर लांब असेल, तर पहिले इंजिन न्यूट्रल सेक्शन पार करून पुढे निघून जाईल, पण दुसरे किंवा चौथे इंजिन नेमके त्याच न्यूट्रल सेक्शनमध्ये (जिथे वीज नाही) अडकू शकते!
इतकेच नाही, जर सर्व ६ इंजिनांच्या ड्रायव्हर्सनी एकाच सेकंदाला वीज चालू-बंद केली नाही, तर काही इंजिने ट्रेनला पुढे ओढतील आणि काही बंद पडल्यामुळे मागे खेचतील. यामुळे प्रचंड धक्के बसून दोन किलोमीटर लांब असलेली ट्रेन मधोमध तुटून मोठा अपघात झाला असता!
मग भारतीय अभियंत्यांनी यावर कशी मात केली?
परदेशी कंपन्या या समस्येवर उपाय म्हणून अब्जावधी रुपयांचे महागडे रिमोट कंट्रोल तंत्रज्ञान विकतात. पण आपल्या भारतीय तंत्रज्ञांनी 'डीपीडब्ल्यूसीएस' (DPWCS) नावाचे स्वदेशी वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले.
या तंत्रज्ञानामुळे ट्रेनच्या सर्वात पुढच्या इंजिनमध्ये बसलेला मुख्य ड्रायव्हर जशी बटणे दाबेल, अगदी त्याच मायक्रोसेकंदाला वायरलेस संदेशांद्वारे मागे असलेल्या उर्वरित ५ इंजिनांमधील सिस्टीम आपोआप काम करते.
जेव्हा ट्रेन न्यूट्रल सेक्शनमधून जात असे, तेव्हा प्रत्येक इंजिन आपापल्या जागी योग्य वेळी वीज पुरवठा बंद आणि सुरू करत असे. सर्व ६ इंजिने एकाच मेंदूने, अचूक ताळमेळाने आणि एकाच वेगाने काम करत राहतात.
या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे काय फायदा झाला?
एरवी तीन मालगाड्या वेगवेगळ्या सोडण्यासाठी जो वेळ, ट्रॅक आणि वीज लागली असती, ती आता एकाच फेरीत वाचली. कोळशाची वाहतूक निम्म्या वेळेत होऊ लागली आणि ट्रॅकची क्षमता वाढली. भारताच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी हा प्रयोग अत्यंत मोलाचा ठरत आहे.
आपल्या भारतीय अभियंत्यांच्या या युक्तीबद्दल आणि कौशल्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा!
©संतोष कारखानीस
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.