राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील चाणक्य अजित डोवाल या धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी राजकीय क्षेत्रातले चाणक्य गृहमंत्री अमित शहा हे दुसरे धुरंधर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Xtreme Today
01-08-2026 16:11:26
395268484
राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील चाणक्य अजित डोवाल या धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी राजकीय क्षेत्रातले चाणक्य गृहमंत्री अमित शहा हे दुसरे धुरंधर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गुरुवारी पुण्यात 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान

पुणे (विशेष प्रतिनिधी) - लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि आपले संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरिता समर्पित ठेवत आजही राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे कार्य करत आहेत, अशा अजित डोवाल यांना मिळाला याचा मनापासून आनंद आहे. विशेष आनंद हा आहे की, एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते, त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांना गुरुवारी पुण्यात अत्यंत दिमाखदार सोहळ्यात 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' (Lokmanya Tilak National Award) प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. पुण्यात महाराष्ट्र मंडळ, स्वारगेट महर्षी नगर येथील मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील 'चाणक्य' संबोधले. 2014 साली पंतप्रधान मोदी यांनी अजित डोवाल यांना आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केले. त्यानंतर अजित डोवाल यांनी देशाच्या सुरक्षेचं डॉक्टरिन होतं, ते पूर्णपणे बदलण्याचे काम केले. अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेची रणनीती, कूटनीती तयार केली. आता भारत हा मार खाणारा देश राहिलेला नाही, तर मोदींच्या नेतृत्वाखाली घरात घुसून मारणारा देश झाला आहे. हा महत्त्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये अजित डोवाल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे एक अतिशय महत्त्वाचे वाक्य आहे. ते असे म्हणतात की, 'There is no silver medal in national security. If you win, you make history. If you lose, you become history.' अशा पद्धतीने अतिशय परखडपणे आपले मत मांडणारे अजित डोवाल आहेत. ज्याप्रकारे त्यांनी वेळोवेळी आपला जीव धोक्यात घालून या देशासाठी कार्य केले, आज खरोखर त्यांच्यासारख्या व्यक्तीला, ज्यांनी कधीही पदक आणि पुरस्काराचा विचार केला नाही, अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळत आहे, ही आपल्या सगळ्यांकरिता आनंदाची गोष्ट आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित डोवाल यांना हा पुरस्कार मिळत आहे याचा मला आज अतिशय आनंद असल्याची भावना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना व्यक्त केली. 'मी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे मनस्वी आभार मानतो की त्यांनी हा पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) अजित डोवाल यांना जाहीर केला. तसेच हा पुरस्कार देण्यासाठी मला इथे बोलावलं. यासाठी देखील मी लोकमान्य टिळक स्वराज्य संघाला धन्यवाद देतो. पुरस्कार हा लोकांच्या कार्याला प्रेरणा देण्याचे एक माध्यम आहे. एखादी व्यक्ती समाजातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य करते, तेव्हा तो केवळ तिथेच थांबून न राहता त्याच्या हातूतून आणखी भव्यदिव्यं काम होणं अपेक्षित राहतं. मात्र, जेव्हा समाजाकडून कृतज्ञता भाव व्यक्त होतो, तेव्हा त्या माणसाचं मनोबल वाढत असतं. शिवाय समाजाचे ते दातृत्व आणि कर्तव्य असले पाहिजे. अजित डोवाल यांना हा पुरस्कार मिळत आहे, याचा मला आज अतिशय आनंद असल्याची भावना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना व्यक्त केली. भाषणाच्या सुरवातीला अमित शाहांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीतून स्वराज्य निर्माण केलं. पुढे लोकमान्य टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंड सुरु केलं. लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. ते कर्मयोगी होते. निर्भीड पत्रकार होते. तसेच स्वातंत्र सेनानी होते, त्यांची तुलना कोणाशीच करणे शक्य नाही. असेही देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
आजचा हा सोहळा केवळ एक पुरस्कार वितरण सोहळा नसून राष्ट्रभक्ती, धैर्य, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारा एक ऐतिहासिक प्रसंग आहे, पुरस्कार वितरणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. तर या कार्यक्रमावेळी बोलताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अजित डोवाल यांच्यासह मोदी शाहा यांच्या कामाचं देखील कौतुक केलं आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं असं म्हटलं आहे. एका सक्षम नेतृत्वाच्या हस्ते राष्ट्राच्या सुरक्षेला समर्पित अशा असाधारण व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होणे हा खरोखरच भारताच्या शक्ती, संकल्प आणि आत्मविश्वासाचा सुवर्णक्षण आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणावेळी म्हटलं.
आजचा हा सोहळा केवळ एक पुरस्कार वितरण सोहळा नसून राष्ट्रभक्ती, धैर्य, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारा एक ऐतिहासिक प्रसंग आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने दिला जाणारा हा प्रतिष्ठित सन्मान आज अशा व्यक्तिमत्त्वाला प्रदान केला जात आहे, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्राची सुरक्षा आणि सेवेसाठी समर्पित केले आहे. आजचा हा प्रसंग आणखी एका कारणामुळे विशेष ठरतो. देशाचे कणखर, निर्णायक आणि दूरदर्शी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. एका सक्षम नेतृत्वाच्या हस्ते राष्ट्राच्या सुरक्षेला समर्पित अशा असाधारण व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होणे हा खरोखरच भारताच्या शक्ती, संकल्प आणि आत्मविश्वासाचा सुवर्णक्षण आहे.
आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी आणि सक्षम नेतृत्वाखाली भारताने जागतिक मंचावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, संरक्षण तंत्रज्ञान, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात भारत नवीन उंची गाठत आहे. देशाच्या या गौरवशाली प्रवासाला अधिक मजबूती देण्यासाठी गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह आणि देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आदरणीय अजित डोवाल प्रभावीपणे काम करत आहेत. अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करणे आणि सीमांचे रक्षण करणे तसेच राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे, या सर्व क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाने भारताला अधिक सुरक्षित आणि सशक्त राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अजित डोवाल यांचे जीवन राष्ट्रसेवेचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. भारतीय पोलीस सेवा, गुप्तचर यंत्रणा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांनी अनेक कठीण परिस्थितींमध्ये अद्वितीय नेतृत्व, धैर्य आणि रणनीतिक कौशल्याचा परिचय दिला आहे. डोवाल यांच्या योगदानाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला नवी ताकद दिली आहे असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.
लोकमान्य टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला होता. आज त्याच स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी अजित डोवाल यांच्यासारखे समर्पित अधिकारी पार पाडत आहे, म्हणूनच हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून राष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेचाही सन्मान आहे. लोकमान्य टिळक पुरस्काराची गौरवशाली परंपरा देशातील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करत आली आहे. आज या गौरवशाली परंपरेत अजित डोवालांचे नाव जोडले जाणे संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या प्रेरणादायी आयोजनाबद्दल मी रोहित टिळक आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करते. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक सुदृढ झाली आहे. भारताची एक नागरिक म्हणून मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो, असंही सुनेत्रा पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.