Xtreme Today 25-07-2026 21:16:47 228037023
E20 पेट्रोल संदर्भात दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी संसदेवर दिली हाक नवी दिल्ली(प्रतिनिधी) - देशात E20, इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवरून वादंग उठले आहे. या पेट्रोलमुळे इंजिन खराब होत असल्याचे आणि मायलेज घटल्याचा आरोप करण्यात येत आहे. दिल्लीतील टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक व्यावसायिकांनी हाच आरोप करत आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी मोर्चाची हाक दिली आहे. येत्या मंगळवारी असोसिएशन संसदेकडे कूच करणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी ऊस हातात घेत केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर सवाल उपस्थित केले आहे. E20 पेट्रोलमुळे अनेक वाहनांचे मायलेज कमी झाले आहे. देखभाल खर्च वाढला आहे. इंजिनाचे कार्यक्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. देशभरातून याविषयीच्या तक्रारी मिळत असल्याचे सम्राट यांनी सांगितले. 2015 पूर्वी तयार करण्यात आलेली वाहनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी डिझाईन केलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे E20 मिश्रित पेट्रोलची अघोषित सक्ती हटवण्याची मागणी त्यांनी केली. वाहनधारकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.