"ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी"च्या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले
Xtreme Today
24-07-2026 20:56:52
553871335
"ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी"च्या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले
(संजय जोशी याजकडून)
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. राज्यभरातून तसेच इतर राज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येत आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी मोठ्या भक्तिभावाने दाखल झाले आहेत.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि निवासाची विशेष व्यवस्था केली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा नदी घाट आणि प्रमुख मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
"ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी"च्या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते आणि दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात.
आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी
आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या वर्षी आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ ला आहे. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.
कोणत्या तरी विशिष्ट वारीला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो, उदा. श्रीविष्णूची एकादशी. वर्षभरात २४ वेळा येणार्या एकादशींच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आणि निरनिराळ्या ठिकाणांहून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते ! त्यांना ही प्रेरणा त्यांच्या पांडुरंगावर असलेल्या श्रद्धेमुळेच मिळत असते. त्यांच्या या श्रद्धेला ‘अंधश्रद्धा’ म्हणता येणार नाही. समाजाच्या सर्व स्तरांतून बायाबापड्या, मुले, तरुण, वृद्ध आपल्या दुर्दम्य इच्छेने या भक्तीप्रवाहात सामील होतात. यात भाविकता आहे. जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे. वारकऱ्यांना पुढील वर्षभर पुरेल, इतका आनंद देण्याचे सामर्थ्य या वारीत आहे.
वारकरी इतक्या आत्मीयतेने पांडुरंगाकडे का ओढले जातात आणि त्यांना इतका आनंद का होतो ? याविषयी सांगतांना संत तुकाराम महाराज म्हणतात,
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ।। १ ।।
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ।। ध्रु. ।।
कोण्या काळें सुखा । ऐशा कोण पावता ।। २ ।।
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ।। ३ ।।
तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिले ।। ४।।
– संत तुकाराम गाथा, अभंग २०८९
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘अरे पुंडलिका ! तू खरोखरच धन्य आहेस; कारण तू येथील भूतलावरील लोकांना सुख देण्याकरता या वैकुंठीच्या पांडुरंगाला पंढरपूरला आणून त्याला या विटेवर उभे केले आहेस. यावरून तुझे सामर्थ्य आणि तुझ्या तपस्येचा अंदाज येतो. एवढेच नव्हे, तर तू भगवान श्रीकृष्णाचा द्वापरयुगातील गोपी गोपाळांचा परिवार या कलियुगातील पंढरपूरला आणून संत आणि भक्त यांच्याद्वारे येथेही रासक्रीडेचा आनंद सर्वांना देत आहेस. तुझ्यामुळे जग धन्य झाले. तू वैकुंठच पृथ्वीवर आणलेस.’
त्यामुळे वारकऱ्यांना पृथ्वीवरील या वैकुंठाला जातांना अतीव आनंद होत असतो. वारीत ‘तृण आणि पाषाण तेही जीव मानावे’, असे मानणाऱ्या संतांच्या भूमिकेत राहून (ते जीव दुखवू नयेत; म्हणून) अनवाणी चालणारे हे वारकरी भगव्या पताका घेऊन अस्सल मराठमोळ्या रंगाची उधळण करत; चिपळ्या, टाळ आणि मृदंग यांच्या नादात मोठ्या आनंदाने नाचत हरिपाठ म्हणत जात असतात. त्यामुळे सभोवतालचे सर्व वातावरण भक्तीमय होऊन जाते. सर्वांचा अहंकार नाहीसा होऊन ते आनंदात डुंबून जातात. भक्ती हा भारतीय समाजाचा गाभा आहे. महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी अन् भाविक वर्षभर जमवलेला पै-पैसा व्यय (खर्च) करून वारीला येतात. ते अत्यल्प सामान घेऊन, हातांत टाळ आणि मुखात ‘माऊली’च्या नामाचा गजर करत अत्यंत आनंदात वाटचाल करत असतात.
या आनंदाच्या आस्वादनामुळे बहिणाबाई आपले चरित्र लिहू शकली आणि चोखामेळा पांडुरंगाशी एकरूप होऊ शकला. भगवान श्रीकृष्ण भागवतात म्हणतात, ‘मला भोळ्या भक्तांची अतिशय आवड आहे. ती गोडी तुला काय सांगू ? ते नसतील, तर कुणी कितीही सुखाचे उपचार केले, तरी ते मला आवडत नाहीत. अशा भोळ्या भक्तांना मी उत्तम ‘भागवत’, म्हणजे ‘भक्त’ समजतो. मी भगवंत असूनही त्यांचे पाय धरतो. अशा भक्तांच्या भेटीसाठी मी निःसंशय अत्यंत उत्कंठित असतो. असा भक्त सावधचित्त असतो. असा हा माझा निष्कपट आणि भाव असलेला भोळा भक्त कुठेही असला, तरी मी त्याच्याकडे धाव घेतो. असा भक्त दुर्लभ असतो. उद्धवा, तुला काय सांगू ! मी अशा भोळ्या भक्ताला स्वतः विकला जातो आणि त्याला आपलासा करून टाकतो. मला माझ्याहूनही माझ्या भक्तांचे मोल अधिक आहे; म्हणून तर मी त्यांना वश राहून कधीही त्यांच्या शब्दाचे उल्लंघन करत नाही.’ असं संत एकनाथ महाराज यांच्या भागवतात म्हटले आहे.
‘भजन, नामस्मरण आणि कीर्तन यांच्या माध्यमातून परमेश्वराला प्राप्त करणे’, हा वारकरी पंथाचा सरळसोपा मार्ग आहे. भागवत संप्रदायात याला ‘नवविधा भक्ती’ म्हणतात.
प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते !
भगवंताचे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत.
प्रमुख संतांच्या निर्वाणानंतर त्यांच्या नावाने पालख्या आणि दिंड्या नेण्याचा प्रघात हैबतबाबा अरफळकर यांनी चालू केला. हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या दरबारी सरदार होते. त्यांनी सर्वप्रथम ज्ञानेश्वरांच्या पादुका गळ्यात बांधून पायी दिंडी काढली. ते लष्करी शिस्तीचे होते. त्यांचे तत्कालीन राजे अन् सरदार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला एक भव्य दिव्य स्वरूप मिळवून दिले. हत्ती, घोडे, पालखी इत्यादी व्यवस्था त्यांनी माऊलींच्या पालखीला करवली. महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पालख्या आजही मोठ्या दिमाखात आणि शिस्तीत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोचतात.’ पद्मपुराण आणि स्कंदपुराण यांतील उल्लेखावरून ‘पंढरपूर हे देवस्थान प्राचीन काळापासून प्रतिष्ठित होते’, असे दिसते. तेव्हापासून लोक पंढरपूरला दर्शनासाठी येत होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.