Xtreme Today 21-07-2026 20:11:08 8990402
जंतरमंतरवर पुन्हा युवकांचे आंदोलन पेटले; 'गुंडागर्दी नही चलेगी' घोषणांनी परिसर दणाणला, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि इतर विरोधी पक्षाचे नेते दिपके यांच्या भेटीला नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - आज जंतरमंतरवर पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. गुंडागर्दी नही चलेगी…च्या घोषणा देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे वातावरण पुन्हा तापलं. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात काल पुन्हा आंदोलन सुरू झालं. रात्रभर हे आंदोलन सुरू होतं. आज सकाळीही आंदोलन सुरू होतं. पण दुपारनंतर हे आंदोलन अधिकच पेटलं. दुपारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आंदोलनस्थळी आले. त्यांनी मोदींच्या निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्याचवेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही आंदोलनस्थळी येऊन अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला. दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. काल राजधानीत मोठ्या घडामोडी घडल्या. सीजेपीचे आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले होते. संसदेपासून 150 मीटर अंतरावर या आंदोलकांना रोखण्यात आलं. काल रात्री हे आंदोलक पुन्हा जंतर-मंतरवर परतले. रात्री आंदोलनास्थळावर मुसळधार पाऊस कोसळला. पोलिसांनी वीज पुरवठा देखील खंडीत केला. पण तरीही आंदोलक मागे हटले नाहीत. आज सकाळपासून पुन्हा विद्यार्थी जमायला सुरुवात झाली आहे. आज देखील संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केंद्रातील मंत्र्यांनी इथं येऊन चर्चा करावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. कालच्या पेक्षा अधिक विद्यार्थी आज दिल्लीत येतील असा दावा आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. काल संसद भवनाकडे मार्च काढून निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं होते. गेल्या 23 दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतरमंतरवर सुरू आहे. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण मोडीत काढल्याने आंदोलक काल अधिकच आक्रमक झाले. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अनेक विद्यार्थी या आंदोलनात जखमी झाले. मुलींनाही प्रचंड मार लागला. अनेकांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे जंतरमंतरवरची परिस्थिती हाताबाहेर गेली होती. आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावं. आम्ही कुठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका अभिजीत दीपके यांनी घेतली आहे. ज्यांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, त्यांना जंतर-मंतरवर जमण्याचं आवाहन दीपके यांनी केलं आहे. जंतर-मंतर परिसरात सोनम वांगचूक यांनी हे आमरण उपोषण सुरु केलं होतं. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आलेलं. शनिवारी पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर हे आंदोलन चिघळलं.