Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

देशात ऑनलाइन मतदान लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा योजना निवडणूक आयोगाकडे सध्या नाही; मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका ही भारतीय लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद

Xtreme Today   18-07-2026 21:25:22   255671350

देशात ऑनलाइन मतदान लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा योजना निवडणूक आयोगाकडे सध्या नाही; मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका ही भारतीय लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) -  मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका ही भारतीय लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद आहे, तसेच मतदारयाद्यांच्या सखोल पडताळणी मोहिमेचा (एसआयआर) निवडणूक राजकारणाशी काहीही संबध नाही.‘देशात ऑनलाइन मतदान लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा योजना निवडणूक आयोगाकडे सध्या नाही,’ असे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नमूद केले.

 

 

देशातील प्रत्येक निवडणूक राज्यघटना, निवडणूक कायदे आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतली जाते. अत्यंत पारदर्शक निवडणुका होणाऱ्या अशा जगातील अत्यंत मोजक्या देशांत भारताचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक अधिकाऱ्याने आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाने हे मूलभूत तत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे. निवडणूक प्रक्रियेबद्दल अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे विश्वसनीय वृत्तांकन लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यास आणि मतदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यास मदत करते. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, सुरक्षा आणि विश्वसनीयता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि सर्व निर्णय याच आधारावर घेतले जातात,’ असे ज्ञानेश कुमार यांनी अधोरेखित केले. 

 

 

दिल्लीतील द्वारका परिसरातील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट’ (आयआयआयडीएम) येथे आयोजित अखिल भारतीय माध्यम परिषदेत ज्ञानेश कुमार बोलत होते. सर्व राज्यांतील ३५० पत्रकार या परिषदेला उपस्थित होते. निवडणूक आयोगाचे मनीष गर्ग, आशीष गोयल, राकेशकुमार वर्मा, सीमा खन्ना आदी अधिकारीही उपस्थित होते. ९५ कोटी मतदारसंख्या असलेल्या भारतातील निवडणुका घेणारा निवडणूक आयोग याबाबत जगात अव्वल असून इतक्या प्रचंड संख्येने मतदानाची व मतमोजणीची चोख व्यवस्था सातत्याने करण्याचे आव्हान आयोगाने सातत्याने पेलले आहे. त्यामुळे जगातील ९०पैकी ४५ लोकशाही देशांचे प्रतिनिधी आयोगात येऊन निवडणुका पारदर्शकतेने घेण्याबाबतचे प्रशिक्षण सातत्याने घेतात. आयोगाच्या वतीने सर्व शाळा, विद्यापीठांत मतदान जागृती क्लब स्थापन करण्याची योजना लवकरच अंमलात आणली जाईल,’ असेही त्यांनी सांगितले. भटक्या जमाती व महानगरांतील विस्थापित नागरिकांची जनगणना करणे आव्हानात्मक काम असले, तरी आयोग ते करणारच, असेही त्यांनी सांगितले. ‘एसआयआर व मतदानचोरीबाबत आयोगावर आणि माझ्यावरही व्यक्तिगत हल्ले झाले,’ असे सांगताना ज्ञानेश कुमार म्हणाले की, ‘सूर्य पूर्वेलाच उगवतो या शाश्वत सत्याइतकीच पारदर्शकता या दोन्ही मुद्द्यांबाबत आयोगाने बाळगली. मात्र या मुद्द्यांवर काही जणांनी सूर्य पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला उगवतो, असा प्रचार सुरू केला. प्रत्येक वेळी सूर्य उगवण्याची नवी दिशा समजली की निवडणूक आयुक्त म्हणून आपण राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आदींना बोलावून वैश्विक सत्य समजावून सांगत असू. पारदर्शक एसआयआर प्रक्रियेबाबत आयोगाची भूमिका स्पष्ट आहे व त्यात काहीही बदल होणार नाही.’ असेही त्यांनी सांगितले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती