xtreme2day 11-07-2026 22:24:32 273280861
यंदा दिवे घाटातील रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे पालखी सोहळ्यासमोर अनेक अडचणी; वारकऱ्यांची प्रशासनाबद्दल नाराजी पुणे (विशेष प्रतिनिधी) - चैतन्य मूर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत श्री मुक्ताई यांची पालखी दरवर्षी पुण्यातून दिवे घाट मार्गे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. मात्र यंदा दिवे घाट पार करताना वारकऱ्यांसमोर यंदा घाटातील रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे पालखी सोहळ्यासमोर अनेक अडथळे चढउतार दिसून आले. त्यामुळे वारकऱ्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, समक्ष श्री सूर्यनारायणाने चैतन्य मूर्ती संतश्रेष्ठ श्री माऊलींच्या स्वागतासाठी जणू , स्वतःभोवती छानसे रिंगण घालून आश्चर्यचकित केल्याचे चित्र पाहायला मिळाले. वारीच्या वाटीवर एक चक्रावणारे दृश्य दिसले ज्यामुळे सगळेच थक्क झाले. पुणे-सासवड मार्गावरील वडकी परिसरात सूर्याभोवती मोठे कडे असल्याचे दृश्य अनेक वारकरी आणि नागरिकांनी पाहिले. या अनोख्या दृश्यामुळे काही काळ परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. हे दृश्य पाहण्यासाठी वारकऱ्यांची पाऊले थांबली. अनेकांनी या घटनेचे छायाचित्रण आणि व्हिडीओही केले.मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते ही कोणतीही अद्भुत किंवा अपशकुनाची घटना नसून "सोलर हॅलो" (Solar Halo) म्हणून ओळखली जाणारी एक नैसर्गिक वातावरणीय घटना आहे. वातावरणाच्या वरच्या थरात असलेल्या सिरोस्ट्रॅटस ढगांमध्ये सूक्ष्म बर्फाचे स्फटिक असतात. सूर्यप्रकाश या स्फटिकांमधून जाताना त्याचे अपवर्तन होते आणि त्यामुळे सूर्याभोवती गोलाकार कडे तयार झाल्याचे दिसते. हवामानशास्त्रानुसार अशा प्रकारचे कडे दिसणे हे वातावरणात बदल होत असल्याचे संकेत मानले जातात. काही वेळा अशा घटनांनंतर पुढील २४ ते ४८ तासांत हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, सूर्याभोवती कडे दिसणे म्हणजे निश्चितपणे पाऊस पडणारच, असा कोणताही वैज्ञानिक निष्कर्ष नाही. दिवे घाटातील रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे पालखी सोहळ्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खोदकाम, नादुरुस्त रस्ते आणि डोंगराच्या उतारांवरील असुरक्षित परिस्थितीमुळे वारकरी आणि सेवेकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. पालखी सोहळ्यातील मानाचे बैल पालखीचा रथ ओढतात. मात्र दिवेघाटाचा चढ पार करताना या बैलांवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून वडकी गावातील शेतकरी दरवर्षी आपल्या बैलांची जोड पालखीला लावतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात आहे. यासाठी शेतकरी वर्षभर आपल्या बैलांची विशेष तयारी करतात. दिवेघाटातील चढ सहज पार व्हावा आणि माऊलींची पालखी कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे मार्गस्थ व्हावी, हा या सेवेचा मुख्य उद्देश असतो. माऊलींच्या पालखीला हातभार लावण्याची संधी मिळणे हेच आपले भाग्य असल्याची भावना या शेतकऱ्यांच्या मनात असते. त्यामुळे ही सेवा केवळ परंपरा नसून माऊलींच्या चरणी अर्पण केलेली भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक बनली आहे. तसेच हडपसर ते दिवे घाट पालखी मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था असल्याने वारकऱ्यांना अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले. वाढती गर्दी आणि बिकट परिस्थिती हाताळताना पोलीस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागली. दिवे घाटातील सुरू असलेल्या कामांमुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्नही वारकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा विचार करून पालखी मार्गावरील विकासकामांचे नियोजन अधिक जबाबदारीने करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्ता पार करण्यासाठी उंच ढिगाऱ्यावरुन चढावं लागत आहे. यंदाही दिवे घाटात माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत होत आहे. अनेक संकटे आणि अडथळ्यांवर मात करत हैबतबाबांनी घालून दिलेल्या शिस्तीचे पालन करत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. मात्र भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना वारकरी आणि सेवेकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.