आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा
आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही

आळंदी, प्रतिनिधी - सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
कृपया प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे.
आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे.
पूरपरिस्थितीत अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू; एकूण ४०८ भाविकांची सुटका
इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, तसेच (एनडीआरएफ) आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली.
बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसेच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
याशिवाय, बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील १५० गायींचीही सुरक्षित सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
प्रशासनामार्फत बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सातत्याने सुरू असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक व भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.