xtreme2day 30-06-2026 20:58:09 356650006
भारताचे नवी वाहतूक संस्कृती! वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे रेल्वे प्रवास सुखद होणार; मुंबई - बंगळुरू, हावडा कामाख्यानंतर नवी दिल्ली-मुंबई-पुणेदरम्यान सुरू होण्याची शक्यता! (संजय जोशी याजकडून) नवी दिल्ली/पुणे - नवी दिल्ली ते पुणे, मुंबई ते अहमदाबाद, नवी दिल्ली ते श्रीनगर आणि नवी दिल्ली ते सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमध्ये बुलेट ट्रेनसह दोन वंदे भारत मार्ग उपलब्ध होतील. पुण्यात दोन हाय-स्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित आहेत. मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद मार्गाला मंजुरी मिळाली आहे. आता पुण्यातून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली तर पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसनंतर स्लीपरचा विस्तार करण्यात येत आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास वेगवान आणि आरामदायी बनू शकतो. सध्या एका मार्गावर ट्रेन सुरू असून दुसरा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे भारतातील रेल्वे प्रवासाचं चित्रचं बदललं आहे. वेगवान प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे. आता वंदे भारत स्लीपरसाठी मोठ्या वेगाने काम सुरू आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज वंदे भारत स्लीपरमुळे आरामदायी आणि वेगवान प्रवास शक्य झाला आहे. रात्री लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुखद करण्याच्या हेतूने या स्लीपर ट्रेनची सुरुवात करण्यात आली होती. आरामदायी आसने, बर्थसह सोयीसुविधा उपयुक्त असलेले डबे या ट्रेनमध्ये आहेत. विमान प्रवासासारखा प्रिमियम प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 2025मध्ये सुरू झाली होती. पूर्व आणि ईशान्य भारताला जोडणारी ही ट्रेन हावडा ते कामख्यापर्यंत धावते. याच ट्रेनच्या धर्तीवर भविष्यातील वंदे भारत स्लीपर ट्रेनसुद्धा तयार करण्यात येणार आहेत. या सेमी-हाय-स्पीड ट्रेनमुळे रेल्वे प्रवास वेगवान आणि सुखद झाला आहे. यानंतर आता मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही ट्रेन सध्या तयार असून काही दिवसांपूर्वी ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एखाद्या लक्झरी हॉटेल प्रमाणे वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये सेवा उपलब्ध असल्याचं दिसून आलं होतं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मार्गाला हिरवा कंदील दाखवला असून लवकरच तारीख जाहीर होण्याची अपेक्षा आहे. ट्रेनचं वेळापत्रक आणि तिकीटांचे दर अजून जाहीर केले नाहीत. यानंतर नवी दिल्ली आणि मुंबईदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणाऱ्या ट्रेनमुळे मोठा फायदा होऊ शकतो. त्यानंतर नवी दिल्ली ते अहमदाबाद मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी दिल्ली ते हावडादरम्यान रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. हा लांब पल्ल्याचा प्रवास वेगवान करण्यासाठी या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु करण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याशिवाय नवी दिल्ली ते चेन्नई या मार्गावर वंदे भारत स्लीपरमुळे प्रवासाचा एक वेगवान पर्याय उपलब्ध होऊ शकतो.