Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

हाहाकार! युरोपमध्ये भीषण उष्णता; त्यात 'सायलेंट किलर'चा धोका, 1300 जणांचा अंत!!

xtreme2day   30-06-2026 20:50:01   658190381

 हाहाकार! युरोपमध्ये भीषण उष्णता; त्यात 'सायलेंट किलर'चा धोका, 1300 जणांचा अंत!! 

पॅरिस (एजन्सी वार्ता) - युरोपमधील २६ देशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. युरोपमध्ये यंदा रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. नैऋत्य युरोपातून सुरू झालेल्या उष्माची झळ आता पूर्व युरोपला बसू लागली आहे. फ्रान्स , इटली, स्पेन, पोलंड, झेक प्रजासत्ताक आणि लिथुआनिया यांच्यासह अनेक देशांमध्ये पारा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. उष्माघातानं युरोपात आतापर्यंत कमीत कमी १३०० जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या फ्रान्समध्ये हा आकडा १००० पेक्षा अधिक जास्त आहे. हा आकडा वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे.

 

हवामान शास्त्रज्ञांच्या ‘वर्ल्ड वेदर अट्रिब्युशन’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अभ्यासानुसार, हवामान बदलाशिवाय युरोपमधील ही विक्रमी उष्णता आणि आर्द्रता निर्माण होणे निव्वळ अशक्य होते. पाच दशकांपूर्वी अशी उष्णतेची लाट येणे अशक्यप्राय गोष्ट होती, मात्र आज २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत अशी लाट येण्याची शक्यता २०० पटीने वाढली आहे.

 

फ्रान्समध्ये उष्णतेची समस्या सर्वाधिक तीव्र आहे. फ्रान्सची सार्वजनिक आरोग्य संस्था सेंट पब्लिक फ्रान्सनं रविवारी २४ जूननंतर देशात जवळपास १ हजारहून अधिक मृत्यूंची नोंद केली आहे. गेल्या आठवड्यातील ३ दिवसांत उष्मा प्रचंड वाढला. तेव्हा प्रामुख्यानं अनेकांचा मृत्यू झाला. मृतांमधील ८५ टक्के जणांचं वय ६५ वर्षांहून अधिक आहे. पॅरिस आणि इले-डी-फ्रान्स परिसरांना सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे घरात होणाऱ्या मृत्यूंचा आकडा ४० टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच लोक रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत. त्यांचा घरातच मृत्यू झाला. फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेनं धोक्याचा इशारा देत मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली आहे. रुग्णालय, नर्सिंग होम्स आणि घरांमध्ये होणाऱ्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी फ्रान्समध्ये अनेकांनी नदी, तलाव आणि जलाशयांचा आधार घेतला. या जलस्रोतांमध्ये बुडून मरण पावलेल्यांची संख्या ७४ इतकी आहे. युरोपमध्ये सध्या आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेने अनेक देशांमधील तापमानाचे जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आलेल्या या ऐतिहासिक उष्णतेच्या लाटेदरम्यान देशात सुमारे एक हजारहून अधिक अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. दुसरीकडे, युरोपमधील इतर देशांनाही या तीव्र उष्णतेचा फटका बसत असून, जर्मनीत यामुळे जंगलांना भीषण आगी लागल्या आहेत, तर बर्लिनमध्ये गर्दीला शांत आणि थंड करण्यासाठी पोलिसांना चक्क वॉटर कॅननचा वापर करावा लागला आहे.

 

फ्रान्सचं सरासरी तापमान २९.८ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. १९४७ पासून देशात तापमान मोजण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून पहिल्यांदाच इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. फ्रान्सचे ४४ कोटी लोक (देशाची जवळपास संपूर्ण लोकसंख्या) भीषण उकाड्याचा सामना करत आहेत. भीषण उकाड्यामुळे फ्रान्स, इटलीसह अनेक युरोपीय देशांमध्ये एसी, कूलर आणि पंख्यांची मागणी वाढली आहे. युरोपातील बहुतांश घरं भीषण सहन करण्याच्या दृष्टीनं उभारण्यात आलेली नाहीत. ऍमेझॉनसारख्या वेबसाईट्सवर एसी, पंख्यांची मागणी वाढली आहे. टेक्निशियन्सकडे इन्स्टॉलेशन्ससाठी बऱ्याच ऑर्डर येत आहेत. त्या पूर्ण अवघड होऊ लागलं आहे. मॉल्स, दुकानांमधील परिस्थिती अक्षरश: हाताबाहेर गेली आहे. एसी, पंखे घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे.

 

जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन २१ जूननंतर संपूर्ण युरोपात १३०० पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती दिली. हिट स्ट्रेसला बऱ्याचदा सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा गुपचूप जीव घेतो, असं टेड्रोस यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.फ्रान्समध्ये भीषण परिस्थिती; मृतांमध्ये ६५ वर्षांवरील वृद्धांची संख्या जास्तफ्रान्सच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने सांगितले, की उष्णतेच्या लाटेच्या सर्वोच्च बिंदूवर असताना, विशेषतः पॅरिस परिसरातील घरांतून वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या फोन कॉलमध्ये प्रचंड वाढ झाली होती. फ्रान्समध्ये जेव्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली, त्या बुधवारी १,२०० हून अधिक मृत्यू झाले. त्यानंतरच्या पुढील दोन दिवसांत हा आकडा दररोज १,४००च्या पार गेला. उष्णतेच्या लाटेपूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात फ्रान्समध्ये दररोज सरासरी ९०० ते एक हजार मृत्यू होत असत. बर्लिनमध्ये शनिवारी उष्णतेशी संबंधित आजारांमुळे अचानक रुग्णवाहिकांच्या फेऱ्यांमध्ये ५०० ने वाढ झाली. या कडक उन्हापासून नागरिक आणि पर्यटकांना दिलासा देण्यासाठी बर्लिन पोलिसांनी एक अनोखा मार्ग शोधला. आंदोलकांना पांगवण्यासाठी वापरले जाणारे दोन मोठे वॉटर कॅनन पोलिसांनी ब्रँडेनबर्ग गेटसमोर उभे केले आणि तिथल्या गर्दीवर थंड पाण्याचा फवारा उडवला. या तीव्र उष्णतेचा फटका जर्मनीच्या दळणवळण व्यवस्थेलाही बसला आहे. अनेक महामार्गांवरील काँक्रीटचे रस्ते उन्हाने तडकले आहेत. लाइपझिश शहरात डांबर आणि काँक्रीट वितळल्याने ट्रॅकचे नुकसान झाले असून, सोमवार सकाळपर्यंत ट्राम सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आग्नेय युरोपमधील ग्रीसमध्ये नागरी संरक्षण संस्थेने पाच क्षेत्रांमध्ये जंगलांना वणवे लागण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. उत्तर युरोपमधील डेन्मार्कमध्ये शनिवारी तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेल्यानंतर रविवारी तिथे ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळ झाले. रविवारी सकाळपर्यंत देशभरात १,१५६ वेळा विजा कोसळल्याची नोंद झाली. उष्णतेची लाट युरोपच्या पूर्व भागाकडे सरकल्याने रविवारी जर्मनीच्या कुबशुट्झ भागात रात्रीच्या किमान तापमानाचा २९.४ अंश सेल्सिअस हा नवा विक्रम नोंदवला गेला. याच्या काही तास आधीच म्यॉकर्न-ड्रिविट्झ येथे दिवसाचे तापमान ४१.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तीव्र उष्णतेमुळे पूर्व जर्मनीतील गोहरिशहाइडे येथील मोठ्या जंगलाला वणवा लागला. हे जंगल दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत दारूगोळ्याने दूषित असल्याने, तिथे लागलेली आग नियंत्रणात आणणे अग्निशामक दलासाठी अत्यंत धोकादायक बनले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती