xtreme2day 17-06-2026 20:13:49 165920
‘जेन झी’ पिढीवर संघाचा विश्वास; लोकसंख्या संतुलनाबाबतही व्यक्त केली भूमिका – सुनील आंबेकर पुणे (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुण्यात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात संघाची भूमिका विविध संवेदनशील विषयांवर स्पष्ट केली. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आजच्या तरुण पिढीपासून ते लोकसंख्या संतुलन, संघाची नोंदणी आणि मुस्लिम समाजापर्यंत अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. आजची तरुण पिढी भारताच्या परंपरा, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेशी जोडली जात असल्याचे सांगत आंबेकर म्हणाले की, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या पिढीत आहे. त्यामुळे संघाला ‘जेन झी’ पिढीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. संघाच्या नोंदणीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, संघाच्या कायदेशीर अस्तित्वाबाबत कोणताही वाद नाही. संघाचे सर्व व्यवहार बँकेच्या माध्यमातून पारदर्शकपणे होतात आणि विविध सरकारी यंत्रणाही वेळोवेळी संघाचे सहकार्य घेतात. देशातील कोणतीही व्यक्ती किंवा संघटना लोकशाही मार्गाने आपला आवाज उठवत असेल, तर ती लोकशाहीची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. मजबूत लोकशाही व्यवस्थेत अशा आंदोलनांची दखल घेण्याची क्षमता असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदू-मुस्लिम संबंधांविषयी बोलताना आंबेकर यांनी सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेवर भर दिला. भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानऐवजी इंडोनेशियाच्या सांस्कृतिक आदर्शाकडे पाहावे, असेही त्यांनी सुचविले. भारतासमोर भविष्यातील आव्हानांचा विचार करता लोकसंख्या संतुलन हा महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणतीही सक्ती न करता प्रत्येक कुटुंबाने आपल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, ही संघाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना आंबेकर यांनी संघाच्या शताब्दी वर्षातील उपक्रमांची माहितीही दिली. यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.