Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका; 60 आमदाराच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता

xtreme2day   03-06-2026 21:20:40   172035599

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका; 60 आमदाराच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता

 

कोलकाता (पॉलिटिकल प्रतिनिधी) - पश्चिम बंगालच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या निवडून आलेल्या 80 आमदारांपैकी 60 आमदारांनी वेगळ्या गटाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालचे विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी या 60 आमदारांच्या गटाला मान्यतादेखील दिली आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेता म्हणून मंजुरी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटाला मान्यता दिली आहे. तसेच त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीलादेखील मान्यता दिली आहे.

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी केवळ २० आमदार आहेत. पक्ष वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या हालचाली सुरू आहेत. बॅनर्जी यांनी २८ वर्षांपूर्वी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हातातून जाण्याची चिन्हं आहेत. अशा स्थितीत ममता बॅनर्जी पक्ष वाचवण्यासाठी जोर लावत आहेत. ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपान साहा यांना निलंबित केल्यानंतर पक्षात फूट पडली आहे. या दोन आमदारांमागे ६० आमदार उभे राहिले आहेत. 

 

 

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालचे राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. कारण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बंड पुकारलेल्या 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. ही बातमी ताजी असतानाच तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. दुसरीकडे विधानसभेचे अध्यक्ष रविंद्रनाथ बोस यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिलेली आहे. ममता बॅनर्जी यांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते घोषित केलं. त्यानंतर पक्षात बंडखोरी झाली. ८० पैकी ६० आमदारांनी चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते मानण्यास नकार दिला. यानंतर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात ६० आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष रविंद्रनाथ बोस यांची भेट घेऊन आम्हीच खरे तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला. ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी बंडखोर आमदारांकडून करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी मागणी मान्य केल्यानं ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. 

 

 

विधानसभेच्या अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाची चावी दिलेली आहे. तृणमूल काँग्रेसच्या या गटात चार उपविरोधी पक्षनेते आहेत. जावेद खान, शबीना यास्नीन, संदीपन साहा अशी त्यांची नावं आहेत. आमदार अखरुजमा विधानसभेत तृणमूल काँग्रेसचे प्रमुख व्हिप असतील. विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील तृणमूलला खरी तृणमूल म्हणून मान्यता दिलेली आहे. ममता बॅनर्जी यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना पक्षातून आधीच निलंबित केलेलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पक्षातील बंडाची स्थिती लक्षात घेता ममता बॅनर्जी यांनी मोठी कारवाई केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सगळ्या समित्या, पक्षाशी संबंधित सर्व संघटना, संस्था तत्काळ विसर्जित करण्यात आल्या आहेत. सगळ्या समित्या, आघाड्या, संस्था यांची पुनर्बांधणी करण्यात येईल, असं तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. गहन विचार मंथनानंतर तृणमूल काँग्रेसच्या सगळ्या समित्या, संघटना तत्काळ विसर्जित करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती पक्षानं एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. 'पक्ष प्रत्येक स्तरावर आत्मपरीक्षण, संघटनात्मक मूल्यांकनाची एक व्यापक प्रक्रिया राबवेल. या प्रक्रियेच्या निष्कर्षांच्या आधारे मुख्य संघटना आणि पक्षाशी संबंधित अन्य संस्था, समित्या यांची संघटनात्मक फेररचना करण्यात येईल. योग्य वेळी त्यांची घोषणा केली जाईल,' असं तृणमूल काँग्रेसनं पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

 

पश्चिम बंगालमधील या घडामोडी पाहता आगामी काळात ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील गटालाच खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असल्याची मान्यता मिळेल की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या निकालानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन शाह यांना पक्षातून निलंबीत केलं होतं. त्यामुळे आता हे प्रकरण गुंतागुंतीचं बनलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती