25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा; सुपर अल निनो, महाराष्ट्रासाठी धोक्याचा काळ, भीषण संकट येणार?
xtreme2day
06-05-2026 22:00:59
195283857
25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा; सुपर अल निनो, महाराष्ट्रासाठी धोक्याचा काळ, भीषण संकट येणार?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रासह देशभरात सध्या भीषण उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळत आहेत. 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा असु शकतो. मे महिन्याची सुरुवात काही ठिकाणी पावसाने झाली असली तरी दिवसा कडाक्याच्या उन्हामुळे तापमान सतत वाढत आहे. एप्रिल महिन्यातही उष्णतेने अनेक विक्रम मोडीत काढले असून हवामान विभागाकडून सातत्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जात आहे. असे चित्र केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलाचे मुख्य कारण म्हणजे 'सुपर अल निनो' आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस अल निनोचा एक अतिशय शक्तिशाली पॅटर्न तयार होऊ शकतो, जो गेल्या तीन दशकांतील सर्वात वाईट अल निनोचे परिणाम तयार होण्याची शक्यता आहे.
नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या मते, मे महिना ते जुलै महिन्यादरम्यान अल निनो तयार होण्याची शक्यता सुमारे 60 टक्के आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संस्थेने देखील अलीकडेच म्हटलंय की, अल निनोची स्थिती मे महिना ते जुलै महिना या कालावधी दरम्यान कधीही निर्माण होऊ शकते. जागतिक हवामान संस्थेने (WMO) सांगितलंय की, सुरुवातीच्या दिवसाचे संकेत दर्शवतात की ही घटना खूप शक्तिशाली असू शकते आणि काही लोक याला 'सुपर अल निनो' देखील म्हणत आहेत. या हवामान पद्धतीचा सर्वाधिक परिणाम भारत यासारख्या आशियाई देशांवर होईल. सुपर अल निनो हे अल निनोचे एक अतिशय शक्तिशाली रूप आहे. जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा 2 अंश डिग्री किंवा त्याहून अधिक वाढते, तेव्हा ही स्थिती निर्माण होते. ही एक दुर्मीळ हवामान घटना आहे जी जगभरातील हवामानात विनाशकारी बदल घडवून आणते. अशी स्थिती अनेक दशकांतून एकदाच पाहायला मिळते. यावर्षी ज्या सुपर अल निनोची शक्यता वर्तवली जात आहे, ती स्थिती सुमारे 30 वर्षांनंतर पुन्हा येईल. या काळात समुद्रावरील वारे कमकुवत होतात किंवा आपली दिशा बदलतात, ज्यामुळे गरम पाणी संपूर्ण प्रशांत क्षेत्रात पसरते. 1982-83, 1997-98 आणि 2015-16 मध्ये सुपर अल निनोच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. शास्त्रज्ञांनी वर्ष 2026 मध्येही ही स्थिती येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. भारतात यामुळे मान्सून कमकुवत होतो, परिणामी पाऊस कमी पडतो आणि भीषण दुष्काळाची शक्यता वाढते. याचा थेट परिणाम कृषी उत्पादनावर होऊन महागाई वाढू शकते.
25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ महत्त्वाचा आहे. या काळादरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे हवामान खात्याने सांगितले आहे. नवतपा म्हणजे नऊ दिवस वातावरणात प्रचंड उष्णता जाणवते. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी हा काळ सुरू होतो. यंदा नवतपाची सुरुवात 25 मेपासून ते 2 जून रोजीपर्यंत आहे. या नऊ दिवसांत भीषण उष्णतेपासून (Heatwave) स्वतःचा बचाव कसा करावा लागतो. नवतपादरम्यान उन्हाळा अधिक रौद्र रुप धारण करतो. वर्ष 2026मध्ये नवतपा कालावधीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी न घेतल्यास याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नवतपा हा वर्षातील तो काळ आहे जेव्हा वातावरणात उष्णता अत्यंत तीव्र असते. या काळात सामान्य दिवसांपेक्षा तापमान खूप जास्त असते आणि हवेतील आर्द्रता कमी होते. उष्णतेचा शरीरावर वेगाने परिणाम होऊ शकतो, यामुळेच नवतपाचा काळ अधिक धोकादायक मानला जातो तसेच उष्माघाताचाही धोका वाढतो.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.