पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी
xtreme2day
04-05-2026 22:21:39
376528616
ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोलकाता (विशेष प्रतिनिधी) - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पाणी पाजत भाजपाने तेथे सत्ता खेचून आणली आहे. दुसरीकडे काहीही झालं तरी आम्हीच निवडणूक जिंकणार असं म्हणणाऱ्या तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत तृणमूलचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. या पक्षाच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या निवडणुकीत विजय होणार की पराभव? याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. पश्चिम बंगालमध्ये एकूण 293 जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी 208 जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. तर तृणमूल काँग्रेसचा फक्त 79 जागांवर विजय झाला आहे. काँग्रेसला दोन जागा तर डाव्या पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. एमआयएम पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर या मतदारसंघाचा निकाल समोर आला असून ममता बॅनर्जी यांना जबर धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांचा या मतदारसंघातून पराभव झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल 15 हजार मतांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले आहे. मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून या जागेवरून कधी ममता बॅनर्जी आघाडीवर जात होत्या. तर कधी सुवेंदू अधिकारी मसुंडी मारताना दिसत होत्या. अजूनही त्या जागेवरची मतमजोणी चालूच होती. आता तेथील निकाल स्पष्ट झाला आहे. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनाच पराभवाला समोरे जावे लागल्याने तृणमूलासाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.सुवेंदू अधिकारी या जागेवरून 15114 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यांना एकूण 73463 मतं मिळाली आहेत. या विजयानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ममता बॅनर्जी यांना पराभूत करणे फार महत्त्वाचे होते. हिंदू मतदारांनी मला विजयापर्यंत नेलं. आमच्या मेहनतीला फळ लागले आहे, अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, आजपासून बंगाल भयमुक्त झाला आहे. आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. बंगालमध्ये परिवर्तन झाले आहे. बंगालच्या या विजयासाठी हजारो कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना अत्याचार सहन केले आहेत. या कार्यकर्त्यांना त्रासाचा सामना करावा लागला. आज भाजपच्या विजयाचे श्रेय या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देत आहे. हा विजय मी बंगालच्या जनतेला समर्पित करत आहे. पश्चिम बंगालसह देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. बंगालमध्ये भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या जवळ आहे. या प्रचंड यशानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालमधील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो लोकांना होणार आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, बंगालच्या पावन भूमिवर नवीन सूर्योदय झाला आहे. ही अशी पहाट आहे ज्याची अनेक पिढ्यांनी वाट पाहिली आहे. भाजपने जिंकलेल्या जागा हा केवळ आकडा नाही. या विजयाने हिंसा आणि भीतीचे राजकारण मुळापासून उखडून टाकले. आजपासून बंगालच्या भविष्याची यात्रा सुरू झाली, यात विकास, अतुट विश्वास आणि नवी आशा सोबत चालेल. मी आज प्रत्येक बंगालीला आश्वासन देतो ती तुमच्यासाठी भाजप दिवसरात्र एक करेल. रोजगार मिळेल, महिलांना सुरक्षा मिळेल.
पहिल्याच कॅबिनेटमध्ये आयुषमान भारत योजनेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. तसेच घुसखोरांविरोधात कारवाई केली जाईल. आज आम्ही रविंद्रनाथ टागोर यांना नमन करतो, आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करू. भाजप बंगालमध्ये भयमुक्त वातावरण तयार करेल ही मोदींची गॅरंटी आहे. बंगालची निवडणूक एक आणखी कारणामुळे खास आहे. बंगाल निवडणुकीवेळी हिंसा व्हायची आणि निर्दोष लोकांचा मृत्यू व्हायचा. यावेळी बंगालमध्ये शांतीपूर्ण मतदान झाले. निवडणुकीत एकाही निर्दोष नागरिकाचा मृत्यू झाला नाही. ‘आज बंगालने परिवर्तनाच्या भागात प्रवेश केला आहे. मी बंगालच्या राजकीय पक्षांना आग्रह करतो की, बंगालमध्ये गेल्या दशकात कितीतरी लोकांचे आयुष्य बरबाद झाले. आजपासून निवडणुकीबाबत बिघडलेले वातावरण सुधारले पाहिजे. आज भाजपचा विजय झाला आहे, त्यामुळे बदल झाला पाहिजे. माझी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे ही हिंसाचार संपवून टाकू, सर्वांनी बंगालची सेवा करण्यासाठी सर्वांनी काम करूयात.’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की आजचा दिवस हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा आहे. आता विकासाची गंगा गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत वाहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस या देशाची संस्कृती समजूच शकली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की आमच्यासाठी भारत आणि भारतीयता हेच सर्वकाही आहे. भाजप कधीही घराणेशाहीचं राजकारण करत नाही तर तळागाळातील राजकारण करतं, असा हल्लाबोल यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी समाजवादी पार्टीवर देखील निशाणा साधला. त्यांनी समाजवादी पार्टीला महिलाविरोधी म्हटलं आहे. तुम्ही काहीही करा तुमचं पाप धुतलं जाणार नाही असंही यावेळी मोदी यांनी समाजवादी पार्टीला म्हटलं.आज संपूर्ण देशात असं एकही राज्य राहिलं नाही जिथे कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे. हा फक्त राजकीय बदल नाही तर हा विचारांमधील बदल आहे. हा विजय आपल्याला हेच सांगतोय की विकसित भारत कोणत्या दिशेने पुढे जाऊ इच्छित आहे. आज भारताला विकास हवा आहे. भारताला संधी हवी आहे. मात्र दुर्दैवाने काँग्रेस नेमकी याच्या उलट दिशेनं जात आहे. आता विकासाची गंगा गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत वाहत राहील असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.